यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ९३

१९५७ साली साज-या झालेल्या वाई नगरपालिकेच्या शतसांवत्सरिक महोत्सवात माझ्या आजोबांना (ना. कृ. चव्हाण) पदक देऊन ‘साहेबांच्या’ हस्ते गौरवण्यात आले. माझे आजोबा १९२६ ते १९२९ पर्यंत वाईचे बहुजन समाजातून आलेल पहिले नगराध्यक्ष होते. या घटनेचा मला सतत अभिमान असे. १९५८ साली मी हायस्कूलमध्ये जाऊ लागलो. ब्राह्मसमाज इमारतीत भरणारे ‘महर्षि शिंदे विद्या मंदिर’ चे उद्घाटन सुद्धा ११ मे १९५६ रोजी साहेबाच्याच हस्ते झाले होते. स्वामी विवेकानंद संस्थेचे गु. बापूजी साळुंखे यांचे हे हायस्कूल होते व याचा अभिमान मी सतत बाळगला.

मनात अप्रूप असलेले ‘साहेब’ पुढे भारताचे संरक्षण मंत्री झाले. त्यावेळी मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात होतो. ‘सह्याद्री हिमालयाच्या मदतीस धावला’ असे जवळजवळ सर्व वृत्तपत्रातून छापून आले होते. एन्. सी. सी. तील आम्ही विद्यार्थी यागोष्टीने भारावून गेलो. त्यानंतर वृत्तपत्रांतून, दिवाळी अंकातून अधून मधून येणारे लेख वाचत असे. पुढे ‘साहेबांची’ चढती कमानच पाहण्यास मिळाली. ते आमच्या जिल्ह्यातील असल्याने प्रत्यक्ष ओळक नसतांना सुद्धा त्यांच्याविषयी अभिमान वाटायचा. मन ते भारताचे पंतप्रधान व्हावेत, अशी भावना व्यक्त करायचे.

पुढे नोकरीत असताना १९८० मार्च मध्ये माझी बदली औरंगाबादहून दिल्लीत शाखाधिकारी म्हणून झाली. प्रथमच मी महाराष्ट्र राज्याबाहेर जात होतो. तेथे आपले कोणीच ओळखीचे नाही म्हणून मी काळजीत होतो. मी सहजच ‘साहेबांना’ पत्र लिहावे म्हणून पत्र लिहिले. त्यावेळी मी नुकतेच त्यांचे ‘भूमिका’ हे पुस्तक वाचले होते. आदर, प्रेम व जिव्हाळा वाटत होता. हे सर्व एकतर्फी होते. एवढ्या उत्तुंग व्यक्तीस आपण पत्र लिहितोय याचे भान असून सुद्धां धाडस केले आणि आश्चर्य असे की त्यांचे त्वरीत उत्तर आले. ते पत्र सोबत परिशिष्ठात जोडले आहे. एका सामान्य माणसास या असामान्य माणसे पत्राचे उत्तर द्यावे याचे आश्चर्य वाटले. परंतु त्या पत्राने माझा आदर वाढला, कोणीतरी आपले आहे या भावनेतच मी दिल्लीला जाण्याची तयारी केली. तेथील पूर्वीचे शाखाधिकारी वाळिंबे हे वाईकर म्हणजे माझ्या गांवचेच असल्याचे समजले. दिल्लीत गेल्यावर त्यांना भेटलो. त्यांनी आशिर्वाद दिला. सौ. वेणूताईंची ओळख करून दिली. काही अडचणी आल्यावर कळवा. संकोच बाळगू नका. चांगले काम करा असे सांगितले. आपल्या वडिलांचीसुद्धा त्यांना चांगली माहिती आहे, हे जाणविल्याने मी फारच सुखावलो. शाखेत आल्यावर ते आपले सेव्हिंग्ज खातेदार आहे हे समजल्यामुळे अभिमानात भर पडली.

दिल्लीत त्यावेळी बँकेचे चेअरमन श्री. वि. श्री. दामले, सातारहून शाखाभेटी साठी आले होते. भेटीत मराठी खासदारांना भेटण्याचा त्यांचा शिरस्ता होता. त्यामुळे त्यांना घेऊन मी ठरलेल्यावेळी ‘साहेबांच्या’ कडे गेलो. इतर गप्पा होताना किसनवीरांचा विषय निघाला. साहेबांची नयन भरून आले. ‘माझा डावा हात निकामा झाला’ असे उद्गार काढले. आम्ही दोघेही सद्गतीत झालो. केवढे मित्र प्रेम, माया अशी माणसे क्वचितच पहायला मिळतात.

दिल्लीत रूळत असतांनाच एकदिवशी मी राहत असलेले घर चोरांनी फोडले. मला कळल्यानंतर मी त्वरीत घरी आलो. चोरांनी फक्त कुलूप तोडले होते. तपासाअंती काही गेलेले नव्हते हे समजले. कदाचित त्यांना जिन्यांत कोणाचीतरी चाहूल लागल्यामुळे त्यांनी पोबारा केला असावा. तोपर्यंत बँकेतील सहकारी हजर झाले. त्यांनी पोलीस तक्रार करा असे सुचविले. मी ‘साहेबांना’ फोन केला, त्यांना कल्पना देऊन काहीच चोरीला गेले नाही असे सांगितले. त्यांनी शांत रहा. पोलीस तक्रार करू नका. तुम्हाला उगाच हेलपाटे मारावे लागतील. एवढा वेळ तुमच्याकडे आहे कां? मालकाकडून लोखंडी गेट बसवून घ्या. काजळी घ्या. असा व्यवहारी सल्ला दिला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org