यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ९२

परिशिष्ठ क्र. ३
माझ्या आठवणीतील ‘साहेब’
श्री. रमेश चव्हाण

संपादक
मी एक वाईकर आहे याचा मला अभिमान आहे. पुरातन काळापासून हे एक विद्याकेंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. हे क्षेत्राचे गांव असून सुद्धा अतिशय उपक्रमशिल असे आहे. माझ्या लहानपणी गणपती घाटावर, मंडईत वेगवेगळ्या सभा होत. मोठमोठे पुढारी, वक्ते येत. एकदिवशी शाळेतून घरी आलो तो घरांत, आजूबाजूच्या खेड्यातून आलेली बापे-पुरूष मंडळी जमलेली दिसती. चौकशीअंती मंडईत यशवंतराव चव्हाण यांची सभा असल्याचे समजले. मी यशवंतराव चव्हाण यांना पाहिलेले नव्हते. त्यामुळे पहाण्याची उत्सुकता होती. भाषण ऐकण्याचेय समजण्याचे ते वय नव्हते. पण याआधी भाऊराव पाटील, दादासाहेब जगताप, मानसिंगराव जगताप, किसनवीर, नाना पाटील, एस्. एम्. जोशी, प्र. के. अत्रे, विठ्ठलराव जगताप, कृष्णराव भाऊराव बाबर इत्यादी पुढारी पाहिले होते. त्यात आईने ते सरकार आहेत अशी पुस्ती जोडल्याने मी त्यांना बघण्यासाठी गेलो. १९५६ चे सालाचा डिसेंबर महिना असावा कारण थंडी फार होती व आईने दिलेली कानटोपी मी घालून गेलो होतो. खूप गर्दीत घुसून मी स्टेजजवळ गेलो. भारतीय बैठक, लोड अशी बसण्याची व्यवस्था होती. खुर्च्या वगैरे नव्हत्या. त्यावेळी स्टेजवर यशवंतराव चव्हाम आले. सर्वांना नमस्कार करून खाली बसले. त्यांच्या सोबत किसनवीर व तर्कतीर्थ होते. सर्वात ते उठून दिसत होते. पांढरे शुभ्र धोतर, खादीचा नेहरू शर्ट, पांढरे स्वच्छ अर्धे जाकीट व डोक्यावर तिरकी गांधी टोपी, पायात कोल्हापूरी चपला ही त्यांची वेषभूषा समोरच्यावर छाप पाडत असे. चष्मा त्यावेही नव्हता. भाषणाच्यावेळी उभे राहून ते बोलत होते. त्यावेळी समोरचा माईक एका हाताने धरून ठेवला होता व अधून मधून उजवा हात वर करत, त्यावेळी मुठ आवळलेली दिसे. भाषणाकडे माझे लक्ष नव्हते व कळतही नव्हते. असे ‘सरकार’ मी मनात साठवून घरी रात्री उशिरा आलो.

त्यानंतर थोड्याच अवधीनंतर आमच्या घराशेजारील द्रविड यांच्या वाड्यात ‘एकलव्य’ वसतिगृह (विद्यार्थिगृह) चे उद्घाटन यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते झाले. त्यावेळी घरातील टेबल, टेबलक्लॉथ व पाण्याचा तांब्या भांडे द्रविडांच्या वाड्यात नेला होता. समारंभ संपल्यानंतर या वस्तू घरी आणण्याची जबाबदारी आईने माझ्यावर सोपविल्यामुळे मी सतरंजीवर अगदी पुढे बसलो. त्यावेळी त्यांना ‘साहेब’ म्हणून संबोधितात हे कळले. मग पुढे मी सुद्धा ‘साहेब’ असाच उल्लेख करू लागलो. त्यावेळी तर्कतीर्थ त्यांच्या शेजारी होते.

शाळेत येणा-या ‘मन्वतर’; ‘सकाळ’ ‘प्रभात’ या वृत्तपत्रातून मला ‘साहेबां’ विषयी गोष्टी कळल्या. ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते मूळचे क-हाडचे आहेत वगैरे. त्यावेळी मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य व्हावे म्हणून चळवळ चालली होती. अनेक सभा होत, वक्ते बोलत. प्रतापगडांवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू येणार म्हणून सर्व शाळेतील मुलांनी वाई-पांचगणी रस्त्यावर दोहोबाजूस उभे राहून स्वागत करण्याचा कार्यक्रम होता. १९५७ मधील दिवाळी नंतरचा तो दिवस होता. सकाळीच आम्ही सर्व मुले गु. धायगुडे मास्तर यांच्या सोबत गेलो. परगांवावरून फार माणसे आली होती. पण ते ‘मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा अधून मधून देत होते. गर्दी मरणाची होती. मी प्रथमच एवढे पोलीस पहात होतो. आळी आळीतून हिंडून कार्यकर्ते भाकरी-झुणका वगैरे गोळा करत होते. त्यांचे नेतृत्व प्र. के. अत्रे, एस्. एम्. जोशी करत होते. आम्ही या सर्व गर्दीतून वाट काढत वाई, पांचगणी रस्त्यावर आलो. हातात छोटे तिरंगी ध्वज होते. पंतप्रधानांची गाडी येत असल्याची वर्दी मिळाली. एवढ्यांतच समोरून गाड्यांचा ताफा आला आणि गेला. भुरकन जाताना ‘साहेब व नेहरूंना आम्ही पाहिले. पण समाधान झाले नाही. म्हणून थांबलो. परत येतांना मात्र ते पांचगणी – वाई रस्त्यावर दत्तदेवळाजवळ थांबले. श्री. देवधर यांनी नेहरूंना सुताचा हार घातला, त्यावेळी पुनरपि ‘साहेबांना’ पाहिले. ते वातावरण, गर्दी, घाटातील रस्त्यावर नागमोडी पसरलेला जनसागर अजूनही आठवतो. त्यागर्दीचा उलगडा पुढे मोठे झाल्यावर १ मे १९६० रोजी झाला, कारण मुंबई महाराष्ट्रास मिळाली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org