यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ८२

६ ‘वाचकांच्या पत्रव्यवहारातील यशवंतराव चव्हाण’

१) सामाजिक सुधारणांचा इतिहास

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे विविध समाजस्थरांत साधुसंत झाले, त्याप्रमाणेच अनेक सुधारक भिन्न भिन्न थरात झाले. परमहंस सभेनंतर लोकहितवादी, म. फुले, आगरकर, रानडे, शइंदे कर्वे, माटे वगैरे अनेकमार्गी समाजसुधारणेचे शकट पुढे नेणारे कर्ते पुरूष होऊन गेले. यांची चरित्रे उपलब्ध असली तरी राममोहन रॉय यांच्यापासून कालक्रमानुसार सर्व सामाजिक व धर्मपर सुधारणांचा विवेचक इतिहास मराठीत उपलब्ध नाही. फक्त स्फुट लेखन होत असते. सामाजिक सुधारणा आधी का राजकीय आधी का राजकीय सुधारणा आधी, हा वितंडवाद स्वातंत्र्य आल्यावर ओघानेच नाहिसा झाला; व सामाजिक सुधारणांचे मूल्य देशांत पटू लागले आहे. नव्या काळाला धरून सामाजिक सुधारणांच्या नव्या स्वरूपाची गरज वाढली आहे. तरी नैतिक धैर्य बाळगून लोकोद्धार्थ त्यागाने फुले-आगरकर वगैरेनी सामाजिक सुधारणांचा बिकट काळात पुरस्कार केला. त्याचा सुपरिणाम आज समाजावर दिसतो. विद्यावृद्धी, स्त्री स्वातंत्र्य व अस्पृश्यता निवारण वगैरे क्षेत्रात जी प्रगती झाली आहे, त्याची फळे आज समाजाला प्राप्त झाली आहेत.

रा. ब. कै. बोले यांचा पुतळा उभारण्यासाठी मुद्दाम दिल्लीहून माननीय यशवंतराव चव्हाण मुंबईस आले होते. त्यांनी जे मननीय भाषण केले, त्यातही सामाजिक सुधारेच्या इतिहासाची गरज प्रसिद्धपणे मांडिली होती. ‘मराठी साहित्य व संस्कृति मंडळ’ किंवा ‘साहित्य परिषद’ यासारख्या संस्थांना हा उपेक्षित उपक्रम हाती घेता येईल; व अनुदानाचाही प्रश्न सुलभ होईल. सामाजिक सुधारणांची गरज आता मुस्लीम बांधवांतही भासू लागली आहे. जातिसंस्था इतक्या घट्ट राहिल्या नाहीत. जातिभेद म्हणजे उच्चनीच भाव बाळगिण्याची पद्धत संत व सुधारकांच्या प्रयत्नामुळे फारच कमी झाली आहे. जातिसंस्थांचा पुरस्कार फारसा कोणी करीत नाही. आंतरजातिय विवाह वाढत आहेत. मराठाही समाजात पुनर्विवाह निषिद्ध मानला असला तरी आता सामाजिक आडकाठी त्याही वर्गात राहिली नाही. अस्पृश्यता ही शहरांत दिसत नसली, तरी खेड्यात आहे. ग्रामीण विभागांत हरिजन व बौद्ध समाजावर अन्याय होतात. विकेंद्रित पंचायत राज्यांतून त्यांना म्हणावे असे प्रतिनिधित्व नाही. अशा परिस्थितीत सयाजीराव – शाहू व शिंदे – आंबेडकर यांनी आपुलकीने हरिजनोद्धारार्थ केलेले प्रयत्न व त्यांचे विचार ग्रामीण बहुजन समाजाला सक्रीय समजले पाहिजेत. यासाठी समग्र सामाजिक सुधारणांचा चिकित्सक इतिहास उपलब्ध झाल्यास, जरूर त्या विचारक्रांतीस पूरक ठरेल. म. गांधींचा सर्वधर्मसमभाव ही देखील एकपरी सामाजिक सुधारणा आहे. तरी जातिय दंगली राजकीय व तात्कालिक पूजास्थान संदर्भावरून होतात. दंगली झाल्यावर त्या कोणासच आवडत नाहीत. हिंदुमुसलमान ऐक्य हादेखील सामाजिक सुधारणांचा भाग आहे. सर्वधर्म ऐक्य यावर राममोहन व गांधी यांच्यासारख्या थोर भारतीय पुढा-यांनी जोर दिला होता; सामाजिक सुधारणांना आध्यात्मिक समतेचा पाया देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नव्या पिढीला या सर्व विचारांचे समन्वयपूर्वक दर्शन व्हावे, म्हणून माननीय यशवंतराव चव्हाण यांनी मुंबईत मांडलेली सामाजिक सुधारणेच्या इतिहासाच्या गरजेची कल्पना व सूचना व्यवहारांत आणली जावी.

रा. ना. चव्हाण, वाई
(महाराष्ट्र टाइम्स २२.०६.१९७०)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org