यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ४५

म. गांधी- टिळक यांच्यापूर्वीची काँग्रेस आय., सी. एस. च्या जागा हिंदी लोकांना मिळाव्यात, पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व मिळावे अशा जुजबी मागण्या (ब्राह्मणेतरांप्रमाणे) मागीत होती. म. फुले व त्यांचे अनुयायी बहुजनसमाजाच्या दृष्टीने सामाजिक आचार-विचार करीत होते व पुढे काँग्रेसमध्ये जाऊन यशवंतरावांना हेच करावे लागले व त्यांना ते पुष्कळसे गोडीत केले हे सांगावयाचे आहे. मात्र यशवंतरावांना सरकारवजा ब्राह्मणेतर पुढा-यांशी देखील लढावे लागले. लढा ब्रिटिशांशींदेखील होताच, पण ब्रिटिशांच्या पाठीराख्यांशीही होता. तरूणपणी चव्हाण प्रत्यक्ष जिल्ह्यात कार्य करू लागले तेव्हा जिल्हा, खानबहाद्दूर कूपर यांच्या नेतृत्वाखाली होता आणि प्रतिष्ठित मराठा पुढारी ‘कूपरशाही’ मान्य करते झाले होते. ही विस्मयकारक बाब होती. यातून जिल्ह्याला त्यांनी बाहेर काढले.

शेतकरी समाजाचे जिव्हाळ्याचे प्रश्न वेगळे होते. चव्हाण सांगतात, ‘शहरातल्या पांढरपेशा वर्गातील कार्यकर्त्यांना व पुढा-यांना राजकीय स्वातत्र्य प्रिय होते. पण त्यातून उद्भवणारे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न त्यांना नको होते.’ काँग्रेस शहरातील वकील, इनामदार, सावकार वगैरेंच्या ताब्यात होती. जरी खुद्द सत्यशोधकी ब्राह्मणेतर पक्षात यशवंतराव पुढारी म्हणून गेले नाहीत तरी त्यासमान कार्य त्यांना काँग्रेसमध्ये राहून करणे अटळ झाले व त्यांनी ते त्यांच्या जिल्ह्यात व नंतर महाराष्ट्रातही केले. फक्त हे लोकांचे कार्य करण्याचे त्यांचे माध्यम ‘काँग्रेसपक्ष’ हे होते. फरक जो होता तो एवढाच. चव्हाणांनी द्वेष वगळला. जे हक्क तुम्ही परकीय इंग्रजांकडून मागता, ते हक्क व सवलती शेतकरी, कष्टकरी वर्गालाही मिळाव्यात व त्या वेळची काँग्रेस अशी खटपट करीत नव्हती. म्हणून फुले व शाहू काळात राष्ट्रीय प्रवाहापासून शूद्रातिशूद्र दूर होते. चव्हाणांच्या काळात म. गांधीमुळे शेतकरी व ग्रामीण समाज काँग्रेसमध्ये जाऊ लागला.

जोतिबांच्या मानवतावादी प्रेरणा लोकांच्या लक्षात याव्यात यासाठी नवमानवतावादी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यामागे लागून १९४७ साली ‘ज्योतिनिबंध’ मी लिहून घेऊन प्रकाशात आणला. चिपळूणकरांनी मागे फुल्यांच्या मानवतावादी प्रेरणा लक्षात न घेता विपर्यासच जास्त केला होता! तर्कतीर्थांनी यथायोग्यपणे चिपळूणकरांचे खंडण करून ज्योतिबांच्या मानवतावादाचे मंडण केले. दिल्लीत झालेल्या चर्चेत चव्हाण यासंबंधाने मला म्हणाले की- “तुम्ही एवढे कार्य चांगले केले.” वैयक्तिक संदर्भाचा हा उल्लेख येथे करीत आहे. याचे कारण म. फुले यांच्याबद्दलचा चव्हाणांचा परमादर स्पष्ट व्हावा. एवढ्यासाठीच म. गांधींनी तर फुले महात्म्याला ‘खार महात्मा’ म्हणून संबोधिले. “हिंदुस्थानच्या सर्व भागातला शेतकरी समाज आता विचारपूर्वक स्वातंत्र्यसंग्रामाच्या पाठीशी येऊ लागला होता. महात्मा गांधींची ही मोठी देणगी होती.” (पृ. ९७)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org