चव्हाणांना प्रत्यक्ष काँग्रेसचे कार्य करू लागल्यावरही सामाजिक अनुभव आले. शेतकरी वर्गाची अवस्था त्यांना ज्ञात होती? शिंदे-जेधे यामुळे ग्रामीण शेतकरी वर्ग काँग्रेस – गांधी लढ्यात गेला. तसेच यशवंतरावांमुळेही जाऊन तेथे स्थिरावला. हे संक्रमण होण्यासाठी अनेकांची शक्ती उपयोगात आली. ‘शेतकरी मंडळींनी तुमच्या या चळवळीत का यावे? तुम्ही शेतकरी मंडळीकडे जाऊन त्यांचे प्रश्न काय आहेत, हे कधी बोललात किंवा चर्चा केली आहे का?’ (पृ. ६९) बंधू गणपतराव यांच्या जनसंपर्कामुळे देखील यशवंतरावांना शेतकरी बहुजन समाजाची अवस्था चांगली ज्ञात होण्यास मदत झाली. पूर्वी सत्यशोधक चळवळीत भाग घेणा-या गणपतरावांनी यशवंतरावांच्या राष्ट्रीय चळवळीस पुढे मोठा पाठिंबाच दिला. पण गणपतरावांचीही पूर्वी एक बाजू होती; तिला कारणे होती.
मित्रवर्य राघुअण्णा लिमये यांच्याबरोबर यशवंतराव कोकणात गेले होते. राघुअण्णा यांच्या नातेवाईकांकडे चव्हाणांना जेवणाचा प्रसंग आला. चव्हाण जन्माने ‘मराठा’ होते. चव्हाणांना बाहेर बसून जेवावे लागले! राघुअण्णा या चव्हाणंच्या मित्रालादेखील पंक्तिभेद मान्य नव्हता. शेवटी चव्हाण व राघुअण्णा बाहेर बसून जेवले! चव्हाण या संबंधाने लिहितात की – ‘एक वेळ माझ्या मनात आले की, मी या घरात आलो नसतो तर बरे झाले असते.’ (पृ. ८६) राघुअण्णांच्या मूळ कोकणातील घराचा अनुभव होता. पण राघुअण्णा लिमये यांना पंक्तिभेद मान्य नव्हता. पुढे रत्नागिरीस जाऊन या दोघांनी सावरकरांची भेट घेतली. रत्नागिरीच्या या मुक्कामात राघुअण्णा यांचा नातलग नव्या मनूतला होता. तेथे चव्हाणांचा पंक्तिभेद आढळला नाही. जास्त सनातनी व थोडेच सुधारक प्रत्येक समाजात होते. ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांना जसे अनुभव आले तसेच पुढे चव्हाणांना मुळीच आले नाहीत असे नाही! पण चव्हाणांनी ब्राह्मण विरोधी पवित्रा घेतला नाही. त्यांची सहनशक्ती अर्थात मोठी ठरली. संयमी होते. त्यांच्या एकात्मक समाजकारणाचा हा अपूर्व पैलू आहे.
अर्थात ‘कृष्णाकाठ’ आत्मचरित्रावर आधारीत असलेला हा लेख म्हणजे ‘परीक्षण’ मुळीच नव्हे. तसा माझा अधिकारही नाही. विषय आहे तो यशवंतरावांच्या समाजकराणाचा. यशवंतरावांचे समाजकारण व्यापक होते. कोणाचा द्वेष नव्हता. भेद नव्हता.
‘महाराष्ट्रात सत्यशोधक विचाराची एक चळवळ १९२२-२३ सालपर्यंत झाली. त्यावेळी तिच्यामध्ये मूळ ज्योतिबा फुल्यांच्या प्रेरणा कार्य करीत होत्या. जिल्ह्यातल्या जुन्या कार्यकर्त्या मंडळींशी बोलले की याची थोडीफार कल्पना येत असे. त्यानंतरही सत्यशोधक विचाराचा प्रसार करणारे केशवराव विचारे यांच्यासारखी निष्ठावान मंडळी काम करीत होती आणि यांना या सामाजिक प्रेरणा अजूनही महत्त्वाच्या वाटत होत्या. पण सत्यशोधक समाजाच्या पाठीमागच्या या सामाजिक प्रेरणा कुठेतरी मध्येच गळून पडल्या असाव्यात आणि मुख्यत: जो प्रवाह शिल्लक राहिला, तो ब्राह्मणेतर चळवळीचा. सरकारी नोक-यांमध्ये महत्त्वाचा हिस्सा असावा. राजकीय सत्ता जी थोडी फार होती किंवा मिळेल अशी आशा होती, तीमध्ये योग्य तो वाटा मिळावा ही त्या चळवळीची ध्येये होती असे दिसते.’ (पृ. ९२)
महर्षी शिंदे हे म. फुल्यांच्या मूळ प्रेरणा संरक्षित व वर्धमान व्हाव्यात यासाठी जन्मभर खपले. पण त्या प्रेरणा मागे पडल्या हे मात्र खरे.