यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ४३

चिपळूणकर-टिळक यांच्या प्रतिगामी समाजकारणामुळे ‘जवळकर’ यांची निर्मिती झाली व ‘देशाचे दुश्मन’ हे पुस्तक निघाले. जवळकर यांनी देखील पुढे सत्याग्रहात भाग घेतला व स्वातंत्र्य सैनिक झाले. चव्हाणांचा ‘कृष्णाकाठ’ ही दुसरी बाजू मांडीत नाही.

जसजसा बहुजन समाज काँग्रेसमध्ये जाऊ लागला तसतसा केसरी पक्ष हिंदुत्ववादी होऊन काँग्रेसपासून महाराष्ट्रात वेगळा झाला. चिपळूणकर-टिळकांची पडती बाजू चव्हाणांना मान्य आहे किंवा होती असे नव्हे. पण त्यांचा स्वभाव लोकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणारा व संघर्ष टाळणारा होता. टिळकभक्ती व ब्राह्मण समाजाविषयी आदर व सहानुभूती यामुळे चव्हाणांनी जो विरोध पूर्वी ज्योतिराव व शाहू यांना झाला तो संपूर्णत: होता. जो बदल झाला, जे समाजपरिवर्तन झाले ते स्वत:च चव्हाण सांगतात. एम. एन. रॉय यांच्या प्रभावळीतील तर्कतीर्थ व ह. रा. महाजनी वगैरे अनेक पुरोगामी साह्यक मित्र जे चव्हाणांना पुढे भेटले ते समाजकारणात पुरोगामी होते. बदलत्या काळात सर्वच ब्राह्मण समाजाला दोषी ठरवणे अन्यायाचे होते. ज्योतिराव व डॉ. आंबेडकर व शाहू महाराज यांना देखील उदारमतवादी ब्राह्मणांचे साह्य झाले. राजारामशास्त्री भागवत यांनी शाहूंचा पक्ष घेतला. आता सर्वांनी नवा सारासार विचार केलाच पाहिजे. हा चव्हाणांत आढळतो. यामुळेही उच्चभ्रूंमध्ये चव्हाण लोकप्रिय होऊन त्यांना जवळचे वाटले.

स्वत: काँग्रेस पूर्वीप्रमाणे सोवळी राहिली नाही. ‘तीस सालच्या चळवळीचे एक वैशिष्ट्य असे आहे की, या चळवळीत ग्रामीण समाजाला प्रतिनिधी-वर्ग मोठ्या प्रमाणात जेलमध्ये गेला’ (पृ. ९२) याचे काही श्रेय विठ्ठल रामजी शिंदे आणि केसवराव जेधे यांना दिले पाहिजे. (पृ. ९२) पुढील विवेकचनातही बरेचसे श्रेय या दोघांना यशवंतरावांनी दिले. जेध्यांनी अस्पृश्यता निवारण व काँग्रेस प्रवेश यासबंधीची स्फूर्ती महर्षी शिंद्यांकडून घेतली. पण जेधे व शिंदे यांच्यामधील फरक सांगून महर्षी शिंदे यांचे ओझरते दर्शन ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र देते. ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना वेगळी झाली तेव्हापासूनच त्यातील त्रुटी शिंदे निर्भिडपणे सांगत होते. चळवळ जातीयतेवर न आधारता ती प्रतिगाम्यांच्या विरूद्ध पुरोगामी अशी तात्त्विक पायावर चालवावी असे शिंदे सांगत असत व त्यांनी जे तत्त्वनिष्ठ राहून केलेले सर्व कार्य दलित, स्त्री-शूद्रातिशूद्र बहुजनांच्या उद्धारार्थच होते.

‘त्यांची (शिंद्यांची) बैठक समाजसुधारकांची आणि काहीशी आध्यात्मिक अशी होती.’ चव्हाणांच्या पृ. ९२ वरील या विधानाबद्दल शिंद्यांच्या सहवासात वाढलेल्या मला खुलासा करणे भाग आहे. शिंदे पूर्ण आध्यात्मिक होते; तरी समाजकारण व राजकारण यांना अध्यात्माची बैठक असावी अशा मताचे होते. अध्यात्म हाच पाया समजत. अध्यात्म वेगळे-स्वतंत्र व समाजकारण व राजकारण वगैरे क्षेत्रे भिन्न भिन्न समजत नसत. अवघ्या प्रपंचाला अध्यात्माची बैठक त्यांना मंजूर होती व अध्यात्म स्वर्गात किंवा मूर्तात नसून ते प्रत्येक व्यक्तीच्या आत असते असा त्यांचा एकमय दृष्टिकोन होता. म. गांधी यांच्याबद्दल विठ्ठल रामजींना आमरण आदर होता. याचे मूळ कारण वरील दोघांचा आध्यात्मिक धर्म (स्वभाव) होय. शुष्क वादावादीच्या भरीस न पडता विरोधकांना जिंकणे,आपलेसे करणे, त्यांना स्वपक्षात घेणे, पूर्वीचे विसरून जाणे इत्यादी गुणांमुळे चव्हाणांनी सर्वच विरोधकांना बोथट केले व महाराष्ट्र समाजिकदृष्ट्या एकजिनशी केला. चव्हाणांचे समाजकारण समजण्यासाठी वरील परिच्छेद दिला आहे. अर्थात चव्हाणांच्या समाजकारणाबद्दल आता जास्त महत्त्व वाटते. म्हणून हा विचारप्रपंच केला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org