चव्हाण तुळजापूरला व प्रतापगडावरही जात असत. यात देवभोळेपणाचा भाग नसतो. आंतरिक समाधान लाभते. तरी कुठल्याही दगडाच्या मूर्तीत ईश्वर आहे असे कधी ते मानीत नसत. बुद्धिवादाने ईश्वर सिद्ध करता येत नाही. तसेच तो नाही हेही सिद्ध करता येत नाही. समाजपुरूष जेथे नतमस्तक होत आला. तेथे चव्हाण नतमस्तक होते व हे त्यांना श्रेयस्कर वाटे. चव्हाण धर्मसुधारकांत किंवा समाजसुधारकांत मोडत नव्हते. ‘फुले-शाहू-शिंदे’ व त्याच्यात यादृष्टीने मनस्वी अंतर होते. चव्हाणांची धर्ममते त्यांच्या सामाजिक सर्वसंग्राहक प्रयत्नांच्या आड येत नसत. ही घरची खाजगी ठरत. राजकारणात ते सांप्रदायिकतेचा पुरस्कार करीत नव्हते. निधर्मी राजकारण व निधर्मी भारत यांचे ते अभिमानी होते असे त्यांची जी काही निवडणुकीतील व्यख्याने वाईस ऐकण्यास मिळाली. त्यावरून सांगता येते. चव्हाणांचे धार्मिक वर्तन घरीदारी परंपरेचे होते. तरी त्यांचे समाजकारण पुरोगामी होते. निधर्मी समाजाकारणाचे ते भोक्ते होते. आगरकरांच्या परंपरेतील यशवंतराव अज्ञेयवादी नव्हते. ‘लोकमान्य टिळक यांच्यावर लिहिलेल्या माझ्या (यशवंतरावांच्या) एका निबंधाला पहिले बक्षीस (शाळेमध्ये) मिळाले होते.’ (पृ. ६१) टिळकांकडे त्यांचा ओढा अधिक होता. नंतर तो महात्मा गांधीकडे जास्त वळला. टिळकांपेक्षा गांधींची धर्म व समाज यासंबंधीची मते जास्ती प्रागतिक होती. टिळकांच्या राजकारणापेक्षा गांधीचे राजकारण जहाल व सर्वांना म्हणजे बहुजनसमाजाला घेऊन चालणारे होते. टिळकांपेक्षा जे जास्त ग्रामाभिमुख होते. चव्हाण हे गांधी-नेहरू काळात जास्तीच गांधीवादी झाले. सातारा जिल्ह्यातर्फे ते राष्ट्रीय राजकारण करू लागले. हा भाग किंवा समग्र चरित्र सांगावयाचे नाही. त्यांच्या शाळेतील शिक्षक देखील क-हाडात राष्ट्रीय वृत्तीचे होते. पण टिळक काळात राष्ट्रीय व स्वराज्यवादी चळवळ खेड्यांपाड्यात पोचली नव्हती. सातारा जिल्ह्यात सत्यशोधक चळवळ मात्र खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली होती. नंतर म. गांदी यांची असहकारवादी चळवळ खेड्यापाड्यांत पोहोचली.
चव्हाणांचे परिवर्तन हे सार्वजनिक होते. सत्यशोधक हे ब्राह्मणेतर चळवळ व राष्ट्रीय गांधी चळवळ यांतून फक्त चव्हाणांनीच गांधी काँग्रेस पक्ष घेतला असे नसून १९२९ पासून ब्राह्मणेतर बहुतेक पुढारी व ‘सत्यशोधक वीर’ काँग्रेसमध्ये गेले. १९३४-३५ नंतर ही राजकीय संक्रमणाची प्रक्रिया फारच पूर्ण झाली. बागल, जेदे, नाना पाटील, महर्षी शिंदे, तुळशीदास जाधव वगैरे मोठमोठे व लहानसहान बहुतेक सत्यशोधक ब्राह्मणेतर पुढारी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेले. याचे एक बाह्य कारण गांधी हे स्वत: ब्राह्मणेतर होते व त्यांनी बहुजन समाजाला अभयदान देऊन भेटीगाठी घेऊन विश्वासात घेतले. टिळक काळात हे झाले नाही. म्हणून ‘सार्वजनिक सभा’ व ‘राष्ट्रीय सभा’ ब्राह्मणी होती, हे पाहून म. फुले यांनी यासंबंधाने कडाडून टीका केली होती.
चव्हाणांच्या शब्दातच ‘चव्हाण’ सांगण्याचा येथे प्रयत्न केला आहे. १९१९ सालानंतर (लखनौ काँग्रेसच्या अधिवेशनानंतर) महर्षी शिंदे यांनी ‘राष्ट्रीय मराठा संघ’ काढला होता. यावेळी व अगोदर महर्षी शिंदे ‘टिळकाईट’ होते. दिल्लीच्या चव्हाणांच्या बरोबरच्या बोलण्यात मी त्यांना सांगितले की, ‘महर्षी शिंदे १९१७ पासून (स्पष्टपणे १९१९ – २० नंतर) बहुजनसमाजाने राष्ट्रीय प्रवाहापासून दूर राहू नये असा प्रयत्न चालवीत होते.’ हे ऐकून चव्हाणांना आश्चर्य वाटले! जणू काय ही माहिती त्यांना नवी वाटली. एकटे यशवंतराव फक्त टिळकभक्त होते असे नव्हे, तर भारतातील बहुजन समाजातील अनेक टिळकांचे चाहते होते. भक्त होते व आता अमाप आहेत. सक्ती शिक्षणाला विरोध, स्त्री शिक्षणाला विरोध, सती वयाच्या बिलाला विरोध, समाजिक परिषदेला विरोध, (BRAHMO) ब्राह्मो व प्रार्थना आणि सत्यशोधक समाजांना विरोध यामुळे नेमस्तांचा व ब्राह्मणेतर चळवळीचा विरोध टिळकांनी स्वत:च ओढवून घेतला. वेदोक्त प्रकरणातही जुन्यांची बाजू टिळकांनी घेतली. त्यामुळे स्वत: कर्मवीर शिंदे परम टिळकभक्त असूनही, टिळकांपासून शेवटी दूर झाले. आगरकर, रँ. परांजपे, गोखले, रानडे वगैरेंना टिळकांनी केलेला विरोध यामुळे लोकमान्यांची देशभक्ती वगैरे अक सद्गुण मान्य असूनही त्यांना महाराष्ट्रात विरोध सहन करावा लागला. अस्पृश्यता निवारण्याच्या जाहिरनाम्यावर ऐनवेळी सही केली नाही. म्हणून डॉ. आंबेडकरांनी लो. टिळकांना धारेवर धरले. हे आंबेडकरांच्या साऊथबरो साक्षीत आढळते.