यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ३४

राजकारण हे वारांगनेसारखे अस्थिर व चंचल मानले जाते. राजकारणात समाज विज्ञानशास्त्रासारखी स्थिर मूल्ये तुलनेने फार थोडी असतात. भारतात जरी राज्ये झाली-गेली. राजवटी आल्या-गेल्या. राजेलोकांत सत्तास्पर्धा झाल्या तरी शतकानुशतके समाज हा परिवर्तनाकडे वळला नाही. रूढी व परंपरा घट्ट व मठ्ठ राहिल्या. अजूनही पूर्वींच्या कित्येक रूढी पुन्हा येत आहेत. वाडवडिलार्जित पद्धतीने वागणे हा येथील स्वभाव होता व ग्रामीण भागात हाच अद्याप जारी आहे. राजकारणी माणसाला बहुमताप्रमाणेच वागावे लागते. पण समाजसुधारकांचे कार्य लोकमान्य होत नाही. दुर्घट असते.

वरील सनातनी प्रवृत्तींना जोरदार धक्का प्रथम दिला तो खेड्यापाड्यांपर्यंत जाऊन पोहोचला. तो मोठा धक्का व तो तीव्र आघात सत्यशोधक चळवळीने केला. या चळवळीचा संक्षिप्त उल्लेख चव्हाण ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रात चार पाच ठिकाणी करतात. यामुळे त्या गत चळवळीचे व्यंग-पुराणात्मक स्वरूप समजून येते. प्रस्तुत लेखकाला सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळ निर्दोष होती असे मुळीच म्हणायचे नाही. चव्हाणांनी जे दोष व दुर्गुण या चळवळीतील म्हणून खास दाखविले आहेत, ते होतेच.

प्रस्तुत लेखकाचे आडनाव चव्हाणच. परंतु यशवंतराव आमच्या जिल्ह्यात व वाईत सतत वावरत असून, त्यांच्या समीप जाण्याचे कारण पडले नाही. चव्हाणांचे एक पत्र मला आले. त्यात ते म्हणतात की- ‘तुम्ही जिल्ह्यातील असून तुमची माझी ओळख कशी नाही?’ वास्तविक चव्हाण यशवंतराव आमच्या नात्यातील लोकांच्या संबंधित पदरातील होते. दिल्ली येते १९८२ साली चव्हाण इंदिरा काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी शेहेचाळीस मिनिटे विविध चर्चा करण्याचा अमूल्य योग प्राप्त झाला. अर्था ही राजकीय भेट नव्हती. मी महर्षी शिंदे यांच्या आचार-विचार प्रवाहातील होतो व आहे म्हणून त्यांच्याप्रमाणे ‘समाजकारण’ हा माझा विषय झाला आहे. अर्थात समाजकारण करणा-यांना अज्ञात राहूनच जीवन जगावे लागते. राजकारणात चटकन माणूस वर येतो, पण अस्पृश्योद्धार व तत्सम अप्रिय वाटणारी कार्ये करणारी माणसे उपेक्षितच राहात असत. शिंदे उपेक्षितच राहिले.

चव्हाणांचे समाजकारण हा उपेक्षित विषय समाजावून घेण्यासाठी व देण्यासाठी त्यांच्यापाशी दिल्लीला झालेली बातचीत आधारार्थ घ्यावयाची आहे. ‘कृष्णाकाठ’ आत्मचरित्राचा तर मुख्य आधार आहेच. होऊन गेलेल्या सत्यशोधक चळवळीविषयी यशवंतराव चव्हाण म्हणाले की, ‘जशी चळवळ झाली तशी पुन्हा होणार नाही.’ देवराष्ट्रे या खेडेगावात ते असताना या चळवळीचा सुगावा त्यांना लागला नव्हता. त्यांच्या बाळपणीही ती नव्हती. क-हाड (जि. सातारा) येथे ते डुबल आळीत रहावयास आले त्यावेळी ‘महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये काही नवे प्रवाह आणि नव्या शक्ती काम करीत होत्या.’ ‘चव्हाणआंना वरील चळवळीचा सुगावा डुबल आळीत रहावयास आल्यानंतर लागला. तो पुढीलप्रमाणे होता- ‘बहुजनसमाजाच्या उन्नतीसाठई सत्यशोधक चळवळ किंवा पुढे तिला राजकारणामध्ये ब्राह्मणेतर चळवळ असे स्वरूप आले, ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी बहुजन समाजातील मुलामुलींनी शिक्षण घेतले पाहिजे, वाचन केले पाहिजे. अशा त-हेचे मानसिक व वैचारिक वातावरण त्यावेळी तेथे होते.’ (पृ. २८)

महाराष्ट्राच्या आधुनिक समाजकारणाच्या इतिहासात ‘समाजविज्ञान’ याही दृष्टीने सत्यशोधक चळवळ महत्त्वाची होती. युगानुयुगे बौद्धिकदृष्ट्या झोपलेला स्त्री-पुरूष बहुसंख्य समाज जागा होऊन शिक्षणाच्या मार्गाला लागला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org