यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ३३

“गावात मध्यम स्थितीपासून ते उत्तम स्थितीत असलेली दहा-पंधरा ब्राह्मण कुटुंबेही होती. त्यांची काहीशी जमिनदारी होती. मुलेबाळे शिक्षाणासाठी बाहेरगावी जात. परंतु माझ्या लाहनपणी या मंडळींबद्दल गावात एक प्रकारचा आदर असल्याचे मी पाहिले होते. पण या आदराच्या पदराखाली झाकलेले असे एक अंतर होते, त्याची जाणीव नंतर मला पुढे होऊ लागली.” (पृ. २०)

यशवंतरावांचे भाऊ गणपतराव यांचेप्रमाणे प्रत्यक्ष सत्यशोधक म्हणून यशवंतराव कधीच पुढे नव्हते तरी जोतिबा फुल्यांना जसे अनुभव आले, तसे चव्हाणांनाही काही आले.

सातारा जिल्ह्यात चव्हाणांच्या पूर्ववयात जो ब्राह्मण समाजाविरूद्ध उठाव झाला त्याचे कारण खुद्द चव्हाणांच्या अनुभवातही मिळू शकते. तो काळ आता राहिला नाही ही बाब वेगळी. चव्हाणांचा एक नमूद करण्यासारखा विशेष असा की, त्यांना स्वत:ला अनुभवास आलेली विषमता, सामाजिक पक्षपात वगैरे तत्सम बाबी ते प्रतिक्रियात्मक भाषेत मांडीत नाहीत. उलट, कोमल शब्दात या नाजूक बाबी अधूनमधून नमूद करतात. या मुद्दाम शोधाव्या लागतात.

म. फुले, डॉ. आंबेडकर यांचा बंडखोर मार्ग न स्वीकारता मवाळ-नेमस्त व प्रागतिक मार्गाचे ते सामाजिक क्षेत्रात भोक्ते होते. आक्रमक नव्हते. बंडखोर नव्हते.

चव्हाण म्हणजे राजकारण असा सरळ अर्थ होता; त्यांच्यावर ‘गांधी-नेहरू’ यांच्या राजकारणाचा परिणाम तरूण वयात झाला. गांधी टोपी त्यांनी शेवटपर्यंत धारण केली. त्यांच्यासारखी काही प्रमाणात तिरकी टोपी घालणे व तत्समान खादी पोषाख करण्याचे अनुकरण लहानसहान पुढा-यंनी केले. त्यांच्या राजकारणाला साथ दिली. पण त्यांचे समाजकारणाचे स्वरूप अभ्यासले नाही. त्यांचे समाजकारण म्हणजे एक ‘चव्हाण मार्ग’ होता. हा मुत्सद्दीपणाचा ठरला. चव्हाणांचा पूर्वार्धातील काळ कसा होता?

इंग्रजांचे शासन होते. तालुक्यातील मामलेदाराला खेड्यापाड्यातील लोक भिऊन वागत. गावात मामलेदार आला म्हणजे त्याचा केवढा दरारा! शासनाविरूद्ध आवाज उठविण्याच्या मार्गाला फारसे कोणी लागत नव्हते. शासनाला धरूनच ग्रामीण समाज चाले. ग्रामीण समाजाचे समाजकारण असे चाले.

चव्हामआंनी बी. ए. होऊन एल्. एल्. बी. अखेरपर्यंतचे शिक्षण घेतले किंवा त्यांना मिळू शकले हे आजही आश्चर्याचे वाटते. क-हाडला त्यांचे स्थालांतर होऊन तेथील टिळक हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. या बाबीला फार सामाजिक महत्त्व द्यावे लागते. ज्याकाळात टिळकांच्या समाजाकारणाला (सनातनी मतांना) मागे पुढे महाराष्ट्रात तीव्र विरोध झाला. असा जरी तो काळ होता, तरी लोकमान्यांविषयी त्यांची जी आदराची बुद्धी क-हाडात निर्माण झाली ती कायम राहिली. लोकमान्यांवर त्यांनी कधीच टीका केली नही. उलट पुण्यातील लोकमान्य स्मारक प्रयत्नांना भरघोस मदत देण्यासाठी त्यांनी त्यांची सत्ता वापरली व टिळकांनंतर अखिल भारतीय नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्रात चव्हाणांएवढा दुस-या कोणीच मिळविला नाही हे सर्वच मान्य करतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org