यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ३२

२. यशवंतरावांचे समाजकारण

राजकारण म्हणजे निकोप समाजकारण. चव्हाणांचे समाजकारण निरोगी कसे होते, हे दर्शवायचे आहे यामुळेच चव्हाण पुढे आले. मात्र विवेचनाचा हा उद्देश साधताना राजकारण व समाजकारण यांची संपूर्ण ताटातूट करावयाची नाही.

पुष्कळ पुढारी शहरी वातावरणातून पुढे आलेले आढळतात. सत्तेवर येऊन विराजमान झालेल्या लोकांना बहुसंख्य ग्रामीण जीवनाचा अनुभव नसतो. गरीबी म्हणजे काय असते, याचीही कल्पना फार थोड्यांना असते. यामुळे सर्वसामान्यांच्या दु:खाची, प्रश्नाची व अडचणींची कल्पना उच्चभ्रूंना नसते.

आजच्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे हे यशवंतरावांचे जन्मगाव. ‘इतिहास-भूगोल’ असा क्रम वापरला जातो. पण भूगोल अगोदर नैसर्गिकपणे असतो. मग भूगोलातील कारणे तेथील प्रादेशिक इतिहास बनण्यास कारणीभूत ठरतात. यादृष्टीने यशवंतरावांनी त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रात अगोदर परिसराचा भूगोल दिला आहे. भौगोलिक माहितीनंतर इतिहास निवेदिला आहे. या ग्रामीण पार्श्वभूमीमध्ये त्यांच्या ठायी सर्वसामान्य जनतेविषयी पुढे जी कणव व कैवार दिसून आला त्याची बीजे आढळतात. यशवंतराव अर्थात जनतेचे, रयतेचे होते. कार्य व कीर्ती टिकाऊ असते. यशवंतरावाशिवाय महाराष्ट्र आता पोरका वाटतो.

यशवंतरावांची निश्चित जन्मतारीख त्यांना अवगत नव्हती. ती त्यांनी सांगी वांगीवरून निश्चित केली. या बाबीवरून देखील सर्वसामान्य रयत (प्रजा) किती मागास होती याची कल्पना येते. शिक्षणाने समाज आता बराच पुढे आला आहे. जोतिरावांनादेखील त्यांची जन्मतारीख निश्चित ठाऊक नव्हती. ते १८२७ च्या सुमारास जन्मले असे त्यांच्या अगदी पहिल्या त्रोटक चरित्रात नमूद केलेले स्वच्छ आढळते. यशवंतरावांच्या मानाने जोतिबांच्या काळात शेतकरी-समाज फारच मागे होता. दोघेही अतिसामान्य शेतकरी- समाजातून पुढे आले. “सामान्य शेतक-याच्या आयुष्यात वाट्याला येणा-या ज्या गोष्टी असतात. त्या सर्व आमच्यही वाट्याला आल्या होत्या...” “सणगर, धनगर, मुसलमान, रामोशी यांचा शेजार हा माझ्या आयुष्यातील एक विशेष ठेवा आहे असे मी नेहमीच मानत आलो आहे..” (पृ. २५)

रामोशी समाज हा पश्चिम महाराष्ट्रात शिवकालापासून महत्त्वाचा गणला जात असे. यशवंतरावांनी देवराष्ट्रे या गावातील रामोशी समाजाचा आवर्जून उल्लेख केला आहे व हा समाज अस्पृश्य मानला जात नसे, असाही अनुभव त्यांनी सांगितला आहे.

यशवंतरावांचे विविध समाजांच्या संबंधाचे निरीक्षण व परीक्षण मोठे महत्त्वाचे व आताही अभ्यसनीय ठरते.

यशवंतराव ब्राह्मण समाजासंबंधी उलटा पवित्रा घेणारे नव्हते. हे या लेखातील विवेचनावरून वाचकांना पुढे सांगावयाचे आहे  व हा त्यांचा राजकारणात गुणच ठरला. तरी त्यांनी त्यांच्या देवराष्ट्र खेडेगावातील उच्चभ्रूसंबंधाने जो स्वानुभव प्रगट केला आहे. नव्हे हळूच सूचित केला आहे. तो त्या काळात तर प्रातिनिधीक व सार्वजनिक होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org