यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ३१

उपसंहार

फुले – शाहू – आंबेडकर यांना सामाजिक जातिवर्ण व्यवस्थेचा विपरीत परिणाम अनुभविण्यास मिळाला. चव्हाण याला अपवाद नव्हते. उदा. चव्हाणांचे मित्र कै. हे. भ. राघुअण्णा लिमये यांच्याबरोबर ग्रामीण भागात दौ-यावर गेले होते. दोघांचा मुक्काम जुन्या मताच्या ब्राह्मण कुटुंबात झाला. पण जेवण प्रसंगी तेथे चव्हाणांचे पान बाहेर मांडले व राघुअण्णा यांचे पान आत वाढले. राघुअण्णा उठून चव्हाणांच्या शेजारी येऊन बसले (पृ. ८६). त्यांच्या मनात राष्ट्रीय भावना होत्या. गांधींच्या चळवळीत सर्वत्र खांद्याला खादां लावून एकत्र लढले. यामुळेही येथील जातिभेद बोथट होण्यास मदत मिळाली. पण ह्या वरील घटनेमुळे चव्हाणांच्या मनात कित्येक विचार येऊन गेले असतील. सत्यशोधक चळवळ का झाली; याची कारणेही त्यांच्या मनापुढे उभी राहिली असतील. काही असो-नसो, पण त्यांनी यानंतरही स्वत:ला सत्यशोधकीय ब्राह्मणेतर चळवळीतील म्हणून कधीच संबोधून घेतले नाही. पण यादृष्टीने अप्रत्यक्षपणे त्यांनी फुले व शाहूनंतर महाराष्ट्र पुढे रेटला. शाहू महाराजांनंतर जनतेला मिळालेले पात्र व मुत्सद्दी नेतृत्व म्हणजे यशवंतरावच होत. नाहीतर दुसरे कोण? ‘शाहू-फुले’ ही सामाजिक –धार्मिक नेतृत्वे होती व चव्हाम राष्ट्रीय नेतृत्व पुढील काळानुसार होऊन गेले. त्यांनी सत्ता गौण मानली नाही. सत्तेवर येऊ व दुस-यांना आणून त्यांनी शैक्षणिक, सहकारी वगैरे क्षेत्रात महाराष्ट्र समाज पुढे आणला. ओघाने ब्राह्मणेतर मराठे समाज व दलित समाज देखील पुढे आणला. संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर आता मराठ्यांचे राज्य होणार, ही ब्राह्मणी भिती खोटी पाडली. दिल्लीला खासदार असताना दलितांच्या राखीव जागा सवलतींची मुदत आणखी दहा वर्षे वाढविण्याच्या ठरावाला पाठिंबा दिला. मराठा महासंघाच्या या संबंधाच्या उलट्या धोरणाला मान्यता दिली नाही. महाराष्ट्राचा गुजराथ झाला नाही; यांचे श्रेयही त्यांना द्यावे लागते. महाराष्ट्र राज्यात धर्मांतरित बौद्धांनाही सवलती अद्याप कायम ठेवल्या आहेत. चव्हाणांशी समक्ष बातचीत झाली तेव्हा सवलती इतक्यात काढल्यास दलित मागे रहातील असे ते म्हणाले.

आर. एस. एस. चे सांप्रदायिक धोरण त्यांना मान्य नव्हते. आर. एस. एस. च्या पुण्यात भरलेल्या शिबीरात दत्तो वामन व गोळवलकर तत्समाशी एक संवाद झाला. दत्तो वामन पोतदार म्हणाले की ‘कलेक्टर वगैरे सनदी नोकर होण्यासाठी जी परीक्षा लागते, त्यात उत्तीर्ण होणारे ब्राह्मण तयार होईल व नोकरशाहीतील उच्च जागा पटकावतील तर ब्राह्मणी सत्ता होईल. सैन्यातही उच्च जागेवर ब्राह्मण जात असतात.’ दत्तो वामन यांनी हे जे मत व्यक्त केले, ते मी अंत:करणातील कप्प्यात ठेवले आहे; ठेवित आहे; असे चव्हाणांनी आम्हांस सांगितले. आर. एस. एस. बद्दलचे कै. चव्हाणांचे प्रतिकूल मत त्यांच्या आत्मचरित्रात पृ. २१८ वर सापडते.

चव्हाणांना मी म्हणालो की- “वरिष्ठ सुशिक्षित घरासाठी तुम्ही खूप केले. पण त्यांना एवढे करूनही बरे वाटत नाही.” त्यावेळी यशवंतराव म्हणाले की – “त्यांना बरे कसे वाटेल?”

चव्हाणांनी महाराष्ट्रावर राखलेली पक्कड वरील मध्यम वर्गाला जातिय वाटे व आतून असह्य होई. काही असो नसो!

दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानात पंचेचाळीस मिनिटे आम्ही खुली खाजगीत चर्चा केली. ह्या राजकीय भेटीगाठी नव्हत्या. चव्हाणांनी केलेले निकोप समाजकारण सर्वानांच मार्गदर्शक होणारे आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org