यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : १७

अभिप्राय
डॉ. बाबा आढाव
७३, नाना पेठ, पुणे – ४११००२

नामदार यशवंतराव चव्हाणांच्या विचार कर्तृत्वाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर मोठा परिणाम झालेला आहे. आर्थिक क्षेत्रात कृषि औद्योगिकता व सहकार यांचा पाया यशवंतरावांनी घातला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. राज्यकर्ते या नात्याने छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज या नामावळीत त्यांचे नांव सहजपणे पुढे येते. राजकारणांत चव्हाण राष्ट्रीय पातळींवर भारताच्या उपपंतप्रधानपदापर्यंत पोचले. चीनच्या आक्रमणानंतर चव्हाण देशाचे संरक्षणमंत्री बनले. महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या संरक्षणाला असे वृत्त प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडून चव्हाण दिल्लीला जाताना पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर त्यांचे भाषण झाले. मंत्रीपदाचे ओझे त्यादिवशी पाठीवर नव्हते. त्याचा उल्लेख करून ते अत्यंत मनमोकळेपणाने बोलले. शिनिवारवाड्याच्या इतिहासात पेशवे दिल्लीच्या बादशहाच्या मदतीला गेल्याची नोंद आहे. पुढे पानिपत झाले. या घटनेचा उल्लेख त्यावेळी अनेकांनी केला. चव्हाणांना पानिपतचा अनुभव घ्यावा लागला नाही. परंतु राजकारणी हिमालयाच्या अत्यूच्च शिखरावर पोचलेल्या चव्हाणांची पुढील वाटचाल अडथळ्यांच्या शर्यतीसारखी झालेली दिसते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू १९६४ साली गेले. त्यानंतर अल्पकाळ लालबहादूर शास्त्रींनी पंतप्रधानपद भूषविले. त्यानंतर इंदिरा गांधी नेहरूंचा जमाना सुरू झाला.

१९७४-७५ ची आणीबाणी- कराडच्या प्रीतीसंगमावर झालेल्या साहित्य संमेलनातील खडाखडी-अशा अनेक आठवणी आहेत. राजकीय अंगाने चव्हाणांच्या वाटचालीचा वेध अनेकांनी घेतला आहे. चव्हाणांच्या सामाजिक विचारसरणीचा वेध त्यांचे समकालीन वाईच्या रा. ना. चव्हाणांनी वेळोवेळी घेतला आहे. ती एक प्रकारची बखरच म्हणावी लागेल. चव्हाणांनी फक्त यशवंतरावांच्या भूमिकेची समीक्षा केलेली नाही तर महाराष्ट्रातील सत्यशोधक, ब्राह्मणेतर, दलित, स्त्रीमुक्ती, प्रार्थना, समाज, ब्राह्मणेतर समाज, आर्य समाज अशा अनेकविध चळवळींचा परामर्श जिव्हाळ्याने घेतला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org