यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ११

सामाजिक सार्वजनिक धोरणाची आखणी

यशवंतराव चव्हाण यांनी राजकारण व सत्ताकारण यांच्याबरोबरच समाजकारण देखील केले. हा मुद्दा रा. ना. चव्हाण यांनी प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे. रा. ना. चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाजकारणाच्या उदाहरणाची व सामाजिक विचारांची अनेक तथ्ये नोंदविली आहेत. अशा तथ्यांची यादीच या पुस्तकात आली आहे. या तथ्यांवरून असे दिसते की, यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक सार्वजनिक धोरणाची आखणी केली होती ती पुढीलप्रमाणे १) यशवंतराव हरिजन वस्तीत शाळा चालविण्यासाठी शिक्षक म्हणून जात होते. शिवाय वि. रा. शिंदे यांच्या अटी मान्य करून शिंदे यांना क-हाडला चव्हाण यांनी आमंत्रण दिले होते. २) महारवतनांचे स्वरूप बदलण्यासाठी त्या समाजातून १९३७ मध्ये आंदोलन केले गेले (महार वतन बिल). तेव्हा महारवतनाचे स्वरूप बदलण्याची बाजू केवळ यशवंतराव चव्हाण व आत्माराम बापू या दोघांनी घेतली होती. तेव्हा काँग्रेसने आंदोलकांची बाजू घेतली नाही. १९५८ मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन बाँबे इन्फिरिअर व्हिलेज वॉन्टस अबॉलिश अँक्ट पास केला. ३) ऑक्टोबर १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह बौद्धधर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर हिंदू अनुसूचित जातींना संविधानातील तरतुदीनुसार दिल्या जाणा-या सवलती नवबौद्धांना द्यावयाच्या की नाही यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कडाक्याची चर्चा झाली होती. यशवंतराव चव्हाण व इतर तीन सदस्य सवलती चालू ठेवण्याच्या बाजूचे होते. चव्हाण यांचे असे मत होते की, धर्मबद्दल झाला म्हणून मागासलेपण जात नाही. या प्रश्नावर मुख्यमंत्रिच अल्पमतांमध्ये असा विचित्र प्रसंग प्रथमच निर्माण झाला होता (नेहरूनी सवलती पुढे चालू ठेवण्याचा आदेश दिला व सवलती पुढे चालू राहिल्या.) ४) पंचायत राज्याची स्थापना झाल्यानंतर जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी निवडताना सर्व जातिजमातींना विशेषत: मागासवर्गीय जातींना योग्य प्रतिनिधित्व मिळावे असा यशवंतराव चव्हाण यांचा खास आग्रह होता. मागासवर्गीय जमातीचा अध्यक्ष होऊ शकत नाही अशा जिल्ह्यात अध्यक्ष सोडून अन्य पदाधिका-यांमध्ये संख्या कायद्यात बदल करून वाढविण्यात आली. ती संख्या चार वरून पाचवर नेण्यात आली होती. पुणे महानगरपालिकेचे महापौर पद भाऊसाहेब चव्हाण यांना देल (नवबौद्ध). ५) रूपवते यांना विश्वकोशाचे उपसंपादक केले होते. या तथ्य घटकांवरून असे दिसते की यशवंतराव चव्हाण यांनी कायद्यात बदल केला, राखीव जागा नवबौद्ध समाजाला पुढे चालू ठेवण्याची काम भूमिका घेतली, पंचायत राज्याच्या संरचनेत मागास जातींना सहभागी करून घेतले व साहित्य आणि संस्कृती मंडळांची सत्ताही दिली. याशिवाय चव्हाण यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर चरित्र लिहायचे होते, असेही तथ्य नोंदिविले आहे.

जातियविषमता चव्हाण यांनी अनुभवली होती. कोकण विभागातील पंक्तिभेदाचा अनुभव यशवंतराव चव्हाण यांना आला होता. शिक्षणातील मराठी- संस्कृत भाषा भेद त्यांनी अनुभवला होता. उच्च जातिय शास्त्रीनी चव्हाण यांना स्पष्टपणे म्हटले होते की, मी अब्राह्मणांना संस्कृत ही देववाणी शिकविणार नाही. यामुळे चव्हाण यांना इच्छा असूनही संस्कृत शिकता आले नाही. त्यामुळे चव्हाण मराठई व अर्धमागधी शिकले. आईबरोबर त्यांनी पंढरपूर येथे भक्त-ईश्वर यांच्यामधील मध्यस्थाची आरेरावीही अनुभवली होती. देवराष्ट्र गावांत उच्चजातीना अधिक मिळणा-या प्रतिष्ठेचे व भेदभावपूर्ण वर्तनांचेही निरीक्षण चव्हाण यांनी नोंदविले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या संदर्भातील अशा अनेक मुद्यांचे विश्लेषण रा. ना. चव्हाण यांनी केले आहे. यावरून यशवंतराव चव्हाण यांना शैक्षणिक – सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात जातियविषमता आहे हा मुद्दा समजलेला होता. किंबहुना मराठा जातीतील व्यक्तीला हा अनुभव येतो. त्यामुळे मराठा ही जात देखील जातियविषमतेमुळे अशुद्ध व अपवित्र मानली जात होती, असा अनुभव त्यांचा होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org