साहेब यशवंतरावजी चव्हाण-५

‘कणा- कणानं आणि क्षणा- क्षणानं
ज्यांच्यासाठी देहत्याग करावा,
अशी ध्येयं आणि कामं- या देशात पुष्कळ आहेत!’
मला माझ्या आयुष्याचं सार समजलं,
सूर सापडला-
(तंबोरे झंकारतात)

आई मला नेहमी म्हणायची:
“आपण गरीब असलो, तरी आपली श्रीमंती
वागण्या- बोलण्यात आहे! रीतीरिवाजात आहे!!
ती कायम ठेव-“
ह्या विचारानं, आम्हाला जीवनाचं तत्वज्ञान मिळालं-
माझी आई सुसंस्कृत होती.
म्हणायची: “वेळ पडलीच तर,
आपण उपाशी रहावं-
पण, आल्या- गेल्य़ाला पोटभर खाऊ घालावं!”
ती राम- कथा सांगायची-
हल्ली मी जितका जास्त विचार करतो,
तितकं वाटतं:
“त्या कथेचा प्राण सीता आहे
तिला ‘रामायण’ न म्हणता,
‘सीतायन’ म्हणावं- ‘सीतायज्ञ’ म्हणावं!”
गीतेचा अर्थ आईनं मला एका साध्या,
सोप्या, सरळ वाक्यात सांगितला:
“किसने द्येव अर्जुनाला सांगत्यात:
तू आपला मी- पना सोड-
आन् जे तू केलं पायजेलाएस,
त्ये तू करत -हा!”

आमची खरी शाळा आमची आई होती.
एकदा आमची आजी, आई आणि मी-
आम्ही तिघं मिळून पंढरपूरला जायला निघालो:
कराडपासून पंढरपूर ८० मैल
बैलगाडी छोटी- जेमतेम दोघं बसू शकतील एवढी!
म्हणून, एकानं पायी चालायचं-
आणि फक्त दोघांनी गाडीत बसायचं ठरलं.
आजी होती साठीच्या पुढं,
म्हटलं, “तू बस गाडीत!” तर-
“मला रे काय जालंया?”
तिनं आपला चालायचा वाटा उचलला,
तिची प्रकृती काटक होती.
आठवडयाभरात आम्ही पंढरपूरला पोचलो-
तो ‘ही’ गर्दी, एवढी गर्दी त्यापूर्वी मी कधीच पाहिली नव्हती!
चार तास आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो.
गर्दीनं घामाघूम झालो होतो!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org