साहेब यशवंतरावजी चव्हाण-३१

८० सालच्या निवडणुकीत मी कराडहून निवडून आलो. शरद पवारांच्या दिण्डित सामील झाल्याबद्दल मला अटक झाली.
(खिन्न हसून) स्वातंत्र्य काळातली ती पहिली अटक होती....

ह्याच वेळी, महाराष्ट्रातून माझं नेतृत्व संपविण्याचा डाव खेळला गेला.... ज्यांना मी मोठं केलं, तेच माझ्यावर उलटले. ज्यांची साथ मिळेल असं वाटलं होतं- त्यांचीही साथ मिळाली नाही...
याच सुमारास, माझा मुलासारखा वाढवलेला पुतण्या राजा मोटार-अपघातात दगावला. मनाच्या अशा खिन्न अवस्थेत मी कॉंग्रेस (आय्) मध्ये परत आलो. (क्षणामात्र स्तब्धता)
लहानपणी मी गावच्या 'सोनहिरा' ओढयात पोहण्यासाठी अंग झोकून दिलं.... कृष्णा-कोयनेत पोहण्याचा अनुभव गाठीशी होता.... पण, 'सोनहि-या' च्या अरूंद पात्रात मात्र मी बुडू लागलो.... दोघा-तिघांनी मला वाचवलं! पण, बाहेर काढल्यावर ते कुचेष्टेनं म्हणाले,
"आमचा सोनहिरा कृष्णा-कोयनेपेक्षा जबरदस्त आहे!"

(उसासून) राजकारणाच्या मोठया, मुख्य प्रवाहात मी बराच काळ पोहू शकलो; पण, छोटया ओढ्यात पोहणा-या छोटया माणसांनी शेवटी माझ्यावर मात केली....
८२ साली आठव्या वित्त आयोगाचं अध्यक्षपक्ष माझ्याकडे आलं.
(झटकून मूड बदलून)

(हसून) राजकारणात नको इतकं नाटय असतं, आणि क्रीडा-नाटय क्षेत्रातही नको तितकं राजकारण असतं! नाटय-कलेबद्दल लहानपणापासून प्रेम-म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्र सरकारनं नाटकावरचा करमणूक-कर रद्द केला.
('प्रभू पदास-' ही नांदी ऐकू येते.)

दिल्लीच्या नाटयसंमेलनात 'पंडितराज जगन्नाथ' हे नाटक पहायला यायचं पं. नेहरूंनी कबूल केलं होतं. पहिला अंक संपला आणि कुणी म्हणालं:
'पंडितजी काही येत नाहीत!'

तडक उठलो आणि त्यांच्या निवासस्थानी गेलो. नेहरू कार्यव्यग्र होतेच. तरीही त्यांना म्हणालो,
"आज तिथं दिल्ली प्रशासनातला एकूण एक मराठी अधिकारी जमलाय्- Your  presence  for  five  minutes  will  convince  them  that  there  is  no  animus  against  Maharashtra  in  Delhi !"
animus  म्हणजे आकस, पूर्वग्रह-हा शब्द चिंतामणराव देशमुखांनी' ५३ साली राजीनामा देताना वापरला होता.
पाच मिनिटांसाठी आलेले पंडितजी पाऊण तास थांबले- दिल्लीच्या 'आयफॅक्स' नाट्यगृहात स्टेजवर बाजूच्या गल्लीतनं जावं लागतं; म्हणून आम्ही त्या दाराकडे पहात होतो; तर पंडितजी समोरून उडी मारून रंगमंचावर चढले!!

त्यांच्या आधी त्यांचा 'कमाणडो' वर आला आणि लवंगिकेच्या मागे जाऊन उभा राहिला! पंडितजी भडकलेच:
" पहले उसे वहॉं से हटाओ!"
त्यांनी प्रत्येक कलाकाराची ओळख करून घेतली, सगळयांनाच आनंद झाला...

मी भाषेवर प्रेम करणारा माणूस आहे. साहित्यिकांना 'शब्दबंधू' मानतो! (ठणकावून) पण, संकुचित अर्थानं मात्र मी भाषेचा अभिमानी नाही. ज्ञानासाठी मातृभाषाच भली, एवढंच मला म्हणायचं आहे.
जीवन आणि समाज यांच्यातलं जिवंत नाटय पकडणारी लोकाभिमुख कलाकृती हेच खरं नाटय... रंगभूमीचे तीन मूलभूत घटक नाटककार, नट आणि प्रेक्षक-यातला एक जरी लंगडा पडला, तरी नाटक पडतं.
साहित्याविषयी मला अपार आस्था आहे. फावल्या वेळात मी आणि वेणूबाई जुन्या कवींबरोबरच नव्या, उमलत्या कवींचे संग्रह वाचीत असू. इचलकरंजीच्या साहित्य संमेलनात सुधाकर गायधनी या नव्या कवीच्या 'देवदूत' मधल्या चार ओळी मी महानोर यांना ऐकवल्या:

'अंगावर चिंध्या पांघरून आम्ही सोनं विकायला बसलो,
तर गि-हाईक फिरकता फिरकेना
सोनं अंगावर घेऊन आम्ही  चिंध्या विकू लागलो,
तर गर्दी अजिबात आवरेना!'

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org