साहेब यशवंतरावजी चव्हाण-२९

त्यांच्याबरोबर ताश्कंदला जायचा योग आला. करार झाल्यानंतरची मेजवानी चालू होता. बॅण्डवर वाजत असलेल्या रशियन गाण्याचा अर्थ मी शेजारच्या मुत्सद्याला विचारला, तर तो म्हणाला,

"वोल्गा नदीची थोरवी सांगणारं हे गाणं आहे."
मला माझ्या कराडच्या कृष्णामायची सय आली.
('संथ वाहते कृष्णामाई' हे गाणं ऐकू येतं)  
प्रदेशात प्रवास करताना केव्हाही नदी लागली, आणि कृष्णामाईच्या आठवणीनं उर दाटून आला नाही, असं कधी काही झालं नाही....
कृष्णाकाठीच तर नाना फडणवीसांची कुशाग्र बुध्दि आणि धनाजी जाधवांची पराक्रमी तलवार तळपली होती! नदीच्या काठीच तर मानवी संस्कृती स्थिरावली, बहरली.... जीवन म्हणजे पाणी! माणसांचे जीवन म्हणजे खळखळणारा जल-प्रवाह... कधी उतार, कधी वाकडी वळणं तर कधी कठडयावरून  धबधब्यासारखं कोसळणं...(क्षणमात्र स्तब्धता)
त्याआधी घडलं ते असं:
चीनची वारी करून पाकिस्तानच्या अयूबखानचे पॅटन रणगाडे १ सप्टेंबरला काश्मीरवर चालून आले. सूर्य अस्तास चालला होता. अंधार पडण्यापूर्वीच कृती करणं भाग होतं. पंतप्रधानांशी सल्लामसलत करायलाही वेळ नव्हता. सरसेनापती म्हणाले,
"हवाई हल्ला करायची हीच वेळ आहे! या क्षणी निर्णय हवाय्-"
म्हटलं,"ठीक आहे! द्या धडक!!"
मी बेधडक निर्णय दिला.
ह्या निर्णयामुळेच काश्मीर वाचला!
६ सप्टेंबरला भारतीय फौजा लाहोरच्या रोखानं निघाल्या आणि युद्धाचं सगळं रूपच पालटलं... रशियानं मध्यस्थी केली, युध्द समाप्त झालं-
पण, शास्त्रीजी गेले!
घनघोर युद्धात ते शत्रूवर विजय मिळवू शकले, पण काळावर विजय मिळवू शकले नाहीत...
(जय जवान, जय किसान'- घोषणा ऐकू येतात.)
पुन्हा देशासमोर तोच प्रश्न:
"आता कोण?"
व्यक्तिपेक्षा देश आणि पक्ष महत्वाचा मानून मी इंदिराजींना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे माझे काही जवळचे मित्र नाराज झाले; पण हिंदी-भाषिक राज्यातलं राजकरण त्यांना ठाऊक नव्हतं... मी ते जवळून पहात होतो!
श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या...
माझ्याकडे गृहमंत्रीपद आलं:
तीन अक्राळ-विक्राळ समस्या माझ्यासमोर राक्षसासारख्या उभ्या राहिल्या:
-पंजाबमध्ये संत फत्तेसिंगांचं स्वतंत्र पंजाबसाठी आमरण उपोषण;
-गोवध-बंदीसाठी संन्याशांचा मोर्चा; आणि
-विद्यार्थ्यांची उग्र निदर्शनं...
गृहमंत्र्यांचा एकच घास करायला, यातला एकेक प्रश्नदेखील पुरेसा होता; आणि इथं तर, तिन्ही बाजूंनी माझ्यावर मारा होत होता.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मी फोनवरून सांगितलं: "संत फत्तेसिंगांना आधी उपोषण सोडायला सांगा- स्वतंत्र पंजाबचा विचार नंतर करू."
दोन तासांनी टेलिप्रिंटरवर बातमी आली:
"संत फत्ते सिंगांचे उपोषण समाप्त! स्वतंत्र पंजाब मिळणार-"
मी लगेच फोन लावून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं:
"मी मघाशी काय बोललो ते आपण नीट ऐकलं होतं ना?"
(पंजाबी ढंगात) "जी हॉं- मगर साहाब, मुझे पंजाब को बचाना था| अब, सन्त फत्तेसिंगजी की जान बची और पंजाब भी बच गया! अब चाहे तो मुझे फॉंसीपे चढा दो- सिख्खों के पालिटिक्स में ऐसाही चलता है|"
पहिलं वर्षभर तसा इंदिराजींना कॉंन्फिडन्स नव्हता. गुंगी गुडिया म्हणून लोहियांनी त्यांची कुचेष्टाच केली होती!
६७ मध्ये अस्थैर्य वाढू लागलं...
पक्षातही मतभेदाचं पेव फुटलं...
'इण्डिकेट-सिण्डिकेट' दोन्ही गट टोकाला गेले; आणि अखेर- ६९ साली राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या खडकावर आदळून कॉंग्रेस- ऐक्या चं जहज दुभंगलं.
मी चिंतित झालो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org