साहेब यशवंतरावजी चव्हाण-२०

’४२ चा लढा उंबरठयावर आला असताना मी लग्न केलं... तर्क आणि
जीवन हातात घालून चालतातच, असं नाही!

७ ऑगस्टला नेहरूंनी ‘छोडो भारत’ चा ठराव मुंबईच्या गोवालिया टॅंक
मैदानावरच्या सभेत मांडला... गांधीजी म्हणाले:
“हा शेवटचा लढा आहे- Do or die
‘जिंकू किंवा मरू!’ असाच लोकांचा निर्धार होता!...  ९ ऑगस्टला जनता रस्त्यावर आली, कारण,
पहाटेच ब्रिटिशांनी महत्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल,
मौलाना अबुल कलाम आझाद- सगळया नेत्यांना अटक करून अज्ञात स्थळी नेलेलं होतं!
लाठीमार, श्रुधूर, दगडफेक...
चवताळलेल्या मुंबापुरीचं हेही रूप पाहून घ्यावं... चौपाटीपर्यंत चालत गेलो!
‘आता भोळेपणानं तुरूंगातजायचं नाही... भूमीगत राहून चळवळीची कामं करायची,’ असा मनोमन निश्चय केला-
एखादा विचार जादूनं सगळीकडं पसरावा, तसा ‘Quit lndia’ चा नारा देशाच्या काना-कोप-यात पोचला होता!
तीन-चार दिवस पायी, सायकलनं, रेल्वेनं प्रवास केला. पुण्यामध्ये पण मुंबईसारखीच निदर्शनं झाली.
मी तिस-या वर्गाच्या डब्यात बसून कराडला निघालो... पण, पहाटे मुद्दामच शिरवडयाला उतरलो.
तिथून मसूर जवळ; पण तिथल्या सगळया कार्यकर्त्यांना अटक झाल्याचं समजलं. मग ठरवलं:
‘मसूरला न जाता, इंदोलीला जावं!’ छोटीशी बॅग घेऊन पायीच निघालो-
उजाडल्यावर, मला कुणीतरी पाह्यलं आणि ओळखलं: “इकडं कुठं चाललात?”
“जास्त चर्चा करू नका. यायचं असेल, तर माझ्याबरोबर या-“
अनोखळी असूनही त्यानं माझी बॅग घेतली. मी त्याला म्हणालो:
“माझ्याबरोबर इंदोलीला चल-“
कृष्णा ओलांडून त्यानं मला पेर्ल्याला नेलं! पेर्ल्याहून सातारा ओलांडून
इंदोलीला आलो... दिनकरराव निकमांना निरोप धाडला. ते एकदोन मित्रांना घेऊन आले.
आंदोलनाचा कार्यक्रम त्यांनाही हवाच होता!
३-४ दिवस चालून मी इतका दमलो होतो की, १० तास अखंड झोपलो.
असा आमचा भूमीगत जीवनक्रम सुरू झाला!
वेणूबाईला पत्र लिहून तिची क्षमा मागितली: मी एका वादळात तुझ्यासह घुसत आहे!
कदाचित्, तुझ्यावरही संकट येईल. धीरांन वाग!”

आठ दिवसात, शंकरराव बेलापु-यांच्या फटफटीवर मागं बसून कवठं, तांबवं, येळगाव घेतलं...
किसनवीरांना निरोप धाडला, तर-“भूमीगत यशवंतराव आलेत हो!” (हशा)
अशी हाळी देऊन त्यांनी गाव गोळा केला. यापूर्वी आम्ही कुणीच under-ground  काम केलं नव्हतं ना!
मात्र मग ते म्हणाले: (खासगीत) “आता इथं थांबायचं नाही-“
तालुक्याचे ठाणेदार फौजफाटा घेऊन आले असतील, असं त्यांना वाटलं...
पण, ते दुस-या दिवशी आले (हशा) पोलिस खात्याची ही खास परंपरा आहे. (मोठा हशा)
कराडचा मोर्चा २४ ऑगस्टला ठरला. आसपासच्या खेडयातनं हजारो लोक मामलेदार कचेरीवर जमले...
दादासाहेब उंडाळकरांना अटक झाली. तरीही- “आपला विजय झाला!”
ह्या भावनेनं लोक घरोघर परत गेले. ब्रिटिशांच्या दडपशाहीला न घाबरता एवढया मोठया संख्येनं लोक जमले,
हेच पुढचं पाऊल होतं...

मग, मी कार्यकर्त्यांना ५-६ कलमी कार्यक्रम दिला. कॉंग्रेसच्या मूळ धोरणाशी सुसंगत, ब्रिटिश सत्तेचं वर्चस्व कमी करणारा, तिची भीती नाहीशी करणारा-

“शेतक-यांची संघटना जर आपण बांधू शकलो, तर ‘करबंदी’ सारखी मोठी चळवळसुद्धा आपण हाती घेऊ शकू!”
असा विचार करून मी चळवळ संघटित करू लागलो.

किरवेगावाच्या शेजारी, विठठ्लबुवा मावशीकर, सुपन्याचे बाबा शिंदे- अशा अनेक भूमीगत कार्यकर्त्यांची बैठक घेतली... अवती भवती पिकांची दाटी, समोर संगमाचा डोह- ही जागा चर्चेसाठी निवांत होती! इथंच आम्ही पाटण्याच्या मोर्चाची तयारी केली.

कराडनंतर पाटणचा मोर्चा यशस्वी झाला!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org