साहेब यशवंतरावजी चव्हाण-१९

तिकडं युध्द चाललंच होतं-
पॅरिस पडलं, जर्मनीनं फ्रान्स गिळंकृत केला, आणि मी कष्टी झालो!
इतिहासाच्या अभ्यासानं निर्माण झालेले
बौद्धिक आणि भावनात्मक ऋणानुबंध हे असे मनस्वी असतात!
फ्रेंच राज्यक्रांती करणारा फ्रान्स हिटलरनं घशात घातला,
म्हणून मी व्यथित झालो;
Liberty, fraternity आणि equality
हा महामंत्र जगाला देणारा फ्रान्स गुलाम झाला,
म्हणून मी शोकसागरात बुडालो!
आणि तिकडे काकासाहेब गाडगीळ मात्र
तुरूंगातल्या कम्युनिस्टांना चिडविण्यासाठी म्हणायचे:
‘आठ दिवसात फ्रान्स पडला,
आता १५ दिवसात मॉस्कोवर हिटलरचं स्वस्तिक झळकणार!  लावता पैज?’
इतका आंधळा कम्युनिस्ट व्देष मी कधी केला नाही. आंधळी व्यक्तिपूजा,
आणि आंधळा व्देष- माझ्या स्वभावातच नसावा!

महात्मा गांधींनी असहकार चळवळीचं नेतृत्व स्वीकारलं, आणि
प्रतिकात्मक अशा वैयक्तिक सत्याग्रहासाठी
आचार्य विनोबा भावे, यांचं नाव घोषित केलं...
व्यंकटराव पवार जेलमध्ये गेले,
आणि मी सातारा जिल्हा कॉंग्रेसचा अध्यक्ष झालो.
वैयक्तिक सत्याग्रहात
कराडला वालचंद गांधींचं नाव मंजूर झालं;
पण ते मला म्हणाले:
‘जेलमंदी मी जाईन, पर भाशन तमेच कर जो!’
म्हटलं, “छान आहे! सत्याग्रह वालचंद करणार
आणि भाषण मी करायचं! विनोदच आहे!!’ (हशा)
माझं भाषण झालं,
वालचंदनी युध्दविरोधी घोषणा दिल्या,
पोलिलांनी त्यांना अटक केली; मी पोलिसांना विचारलं:
“माझ्या भाषणात आणि त्यांच्या घोषणात काय फरक होता?”
“इतक्या खोलीत कोण जातो?” (मोठा हशा)
“याला पकडा म्हटलं की, त्याला पकडायचं- बस्स” (आणखी हशा)
हेच पोटार्थी नोकरशाहीचं वैशिष्टय... लॉ- कॉलेजसमोर,
मी ‘अध्यात्म-भवन’ मध्ये रहायचो.
आमचा मित्र अयाचित, आर. एस. एस. कडे झुकला!
मी पक्का आरेसेस-विरोधी
बिडेश कुलकर्णी आले की, म्हणायचे:
“काय खाकसार! करायची का चर्चा?”
हैदराबादचे एकांगी खाकसार,
आणि हे संघवाले- सारखेच झापडबंद!
त्यामुळे ‘खाकसार’ ही टोपी, त्यांना फिट्ट बसायची!

मी एल्. एल्. बी. झालो-
आईला खूप आनंद झाला; म्हणाली,
“आता लगीन करून घे बाबा-“
फलटणच्या रघुनाथराव मो-यांची कन्या
वेणूबाई सांगून आली; तिच्या चेह-यावर
मला विलक्षण सौम्य अशी प्रसन्नता दिसली!
मी आईला होकार कळवला-
२ जून’ ४२ ला आमचं लग्न झालं...
माझ्या अंत:करणाच्या गाभा-यात, एक तेजस्वी निरांजन प्रज्वलित झालं,
त्यांनच माझं पुढचं सगळं वैयक्तिक जीवन उजळून निघालं!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org