पाकिस्तानचे आक्रमण हे केवळ भारताच्या विशिष्ट भूभागावरचे आक्रमण नव्हते. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या भारताच्या राष्ट्रीय जीवनाच्या मूलभूत मूल्यांवरच हे आक्रमण करण्यात आले होते, म्हणून आपण कशासाठी लढत आहोत, हे नीट समजावून घेतले पाहिजे. आपण कोणाविरुद्ध लढत आहोत, याचाही बोध व्हावयास हवा.
एक हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका चिनी युद्धवेत्त्याने - चीनमध्ये असे अनेक युद्धवेत्ते होऊन गेले - अत्यंत मार्मिकपणे असे म्हटले आहे, की 'तुम्हांला शत्रूचा पराभव करावयाचा असेल, तर प्रथम शत्रू समजावून घ्या.' म्हणून आपणही आपला शत्रू कशासाठी आपले शत्रुत्व करीत आहे, हे जाणून घेतले पाहिजे.
चीनला केवळ दक्षिण आणि आग्नेय आशियामध्येच नव्हे, तर संपूर्ण आशियाई-आफ्रिका देशांमध्ये राजकीय वर्चस्व प्रस्थापित करावयाचे आहे. त्या दृष्टीने भारत हा आपल्या मार्गातील मुख्य अडसर आहे, असे त्याला वाटते. कारण चीनच्या विचारसरणीपेक्षा भिन्न विचारसरणी भारताने अंगिकारली आहे. चीनच्या विचारसरणीला आपण खराखुरा पर्याय शोधून काढला आहे.
आज आपल्याला ज्या दोन देशांशी मुकाबला करावा लागत आहे, त्या दोन्ही देशांत हुकूमशाही आहे. पाकिस्तानात धर्माधिष्ठित हुकूमशाही आहे, तर चीनची साम्यवादी हुकूमशाही आहे. या दोन्ही हुकूमशाही राजवटींना भारताचे खरे सामर्थ्य कळूच शकत नाही. भारत हा एक दुर्बल देश आहे, असेच ते मानतात. लोकशाहीचे सामर्थ्य काय असते, हे त्यांना उमगून येत नाही. त्यात त्यांचाही काही दोष नाही. गेल्या जुलै-ऑगस्टमधील परिस्थिती ध्यानात घ्या. त्यावेळी भारतापुढे अनेक अडचणी होत्या. अन्नधान्यांची टंचाई होती. ठिकठिकाणी निदर्शने होत होती. पंजाबमध्ये संत फत्तेसिंगांनी आमरण उपोषणाची धमकी दिली होती. मुंबईत हरताळ आणि संप घडून येत होते. दिल्लीत संसदेवर मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. भारताचे विघटन होते, की काय, अशी भीती वाटावी, अशी त्या वेळची परिस्थिती होती. आपल्याला लोकशाही पचली आहे किंवा नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. काय होणार आहे, हे कोणीच सांगू शकत नव्हते. ६ सप्टेंबरला भारतीय सैन्याने लाहोरची दिशा धरली आणि परिस्थिती एकदम बदलली. निदर्शने आणि हरताळ यांची भाषा ऐकू येईनाशी झाली. निदर्शनाची आणि उपोषणाची भाषा बंद पडली. हा खरा लोकशाहीचा अर्थ आहे, म्हणून आपण देशाची बांधणी करताना आपल्याला प्रिय असलेल्या मूल्यांचेही जतन करीत आहोत. भारताचे हे खरे चित्र आपण नेहमीच आपल्या डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. दुर्दैवाने पाकिस्तानला या चित्राचा अर्थ कळूच शकला नाही.
आपण चीनकडून एक धडा शिकलो, तो पाकिस्ताननेही ध्यानात घेतला पाहिजे. चीन आणि भारत मित्रभावाने नांदतील, असे आपण १९६२ पर्यंत गृहीत धरून चाललो होतो. १९५८-५९ मध्ये चौ एन-लाय मुंबईला आले होते, त्यावेळी मी द्वैभाषिक मुंबई राज्याचा मुख्यमंत्री होतो. मी त्यांच्या स्वागताला गेलो, तेव्हा मी त्यांच्यावर प्रेमपूर्ण पुष्पहारांचा वर्षाव केला. त्यांनी आपला हात उंचावून म्हटले, 'हिंदी चिनी भाई भाई !' मीही तसेच म्हटले. त्यांची ती घोषणा खरी आहे, अशीच आपली कल्पना झाली. तसे होणे स्वाभाविकही होते. कारण हातात पुष्पगुच्छ आणि अंत:करणात मैत्री ठेवून आपण मित्रांचे स्वागत करीत असतो. परंतु नंतर आपल्याला कळून आले, 'भाई भाई' म्हणविणा-या या लोकांच्या हातांत तलवारी आहेत आणि हृदयात विष आहे.