एकीकडे जागृत आणि चोखंदळ मतदारांची संख्या सतत वाढत असताना सामान्य लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले गेल्यामुळे विभाजनापूर्वीच्या अविभक्त काँग्रेसला घरघर लागावी, यात आश्चर्यजनक असे काहीच नव्हते. असंतोषाने खदखदत असलेल्या जनतेला असह्य यातना सहन कराव्या लागत आहेत, त्याबद्दल आपण आस्था दाखविली नाही, तर विभाजनही निरर्थक ठरेल. काँग्रेस कार्यकर्त्यांना वास्तव परिस्थिती ध्यानात घ्यावीच लागेल. लोकांच्या आकांक्षांशी निगडित असलेला कार्यक्रम तातडीने अमलात आणण्याचा आपल्याला कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.
नव्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये कोणते बदल करणे आवश्यक आहे, ते समजावून घेण्याची जरुरी आहे. अधिक वैचारिक स्पष्टता आणि कार्यक्रमांच्या पातळीवर अधिक एकवाक्यता यांच्या आधारावर आपल्याला नवी आत्मजाणीव करून घेतली पाहिजे, हे गेल्या महिन्यांतील घटनांवरून दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाला भिन्नभिन्न विचारसरणींच्या कार्यकर्त्यांच्या घोळक्यांचे जे स्वरूप आले आहे, ते नाहीसे करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी आपल्याला पुन्हा वचनपूर्तीच्या राजकारणाला वाहून घेतले पाहिजे. तसेच वास्तवाचे भान राखणारे नेतृत्वही बळकट करावयास हवे. अखेरीस कोणताही खराखुरा राष्ट्रिय पक्ष हा विचार आणि पुरोगामी कृती यांचे साधन असते आणि बळकट आधार म्हणून त्याला कार्य करावे लागते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या आणि तो एकात्म करण्याच्या कार्यात काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक भूमिका बजावलेली आहे. आता त्याला त्यापेक्षाही अवघड कार्य करावयाचे आहे. आणि ते म्हणजे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचे आणि आपल्या स्वातंत्र्याला खरा अर्थ आणि आशय मिळवून देण्याचे.
आज देशात सर्वत्र हिंसाचाराचे वातावरण पसरल्याचे आपल्याला दिसत आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे जागोजागचे प्रश्न हाताळता येण्यासारखे असले, तरी हिंसाचाराची प्रवृत्ती ही फार मोठ्या समाजघटकाला जाणवत असलेल्या वैफल्याचा प्रकट अविष्कार आहे, ही गोष्ट आपल्या नजरेआड करून चालणार नाही. लोकांना ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, त्याची झळ तरुणांना बसत आहे. कारण त्यांना रोजगार पुरविण्याबाबत आपल्याला यश आलेले नाही. त्यामुळे हा फार मोठा जनसमूह पूर्णबेकारीचे किंवा अर्धबेकारीचे जीवन कंठत असून त्याला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण यांसारख्या आपल्या प्राथमिक गरजाही भागविणे शक्य होत नाही. त्यामुळे देशाचे स्थैर्य आणि प्रगती यासंबंधी त्याला आस्था वाटत नाही. म्हणून बेकारांना रोजगार पुरविणे यावर आपल्या विचारांचा आणि साधनसंपत्तीचा सर्वाधिक भर असायला हवा.
शिक्षित युवकांमधील बेकारी ही आणखी एक गंभीर समस्या आहे. अर्थव्यवस्थेचा जलद विकास, ग्रामीण आणि नागरी विभागांमध्ये साधन-संपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर आणि उद्योगीकरणाच्या गतीस चालना या कार्यक्रमांद्वारेच आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडता येईल. ग्रामीण व नागरी विभागांमध्ये स्वयंरोजगाराची सुविधा जास्तींत जास्त उपलब्ध करून देणे, हा बेकारीचा प्रश्न सोडविण्याचा एक मार्ग होऊ शकतो.
शेतीवर आधारित उद्योगांना आणि छोट्या कुटिरोद्योगांना नव्याने चालना देण्यात आली पाहिजे. याचा अर्थ असा आहे, की बेकारीची समस्या सोडविण्यासाठी आपल्याला प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहेत. खरे म्हणजे या कार्यक्रमाला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे. प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला तरी रोजगार पुरविला जाईल आणि त्यायोगे त्याला दरमहा किमान शंभर रुपये मिळतील, हे आपले अगदी नजीकचे उद्दिष्ट असल्याचे आपण केरळमधील आपल्या निवडणूक जाहिरनाम्यामध्ये आश्वासन दिले आहे. अन्न, निवारा, वस्त्र, शिक्षण आणि आरोग्य या जीवनावश्यक गरजांच्या बाबतींत लोकांची किमान गरज भागविण्याच्या प्रयत्नांतील हे पहिले पाऊल ठरेल. काँग्रेस पक्षाची ही भूमिका लोकांना मान्य आहे, हे केरळमधील निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झालेले आहे. सर्वसामान्य माणसाच्या उन्नतीसाठी झटणा-या पुरोगामी शक्तींच्या पाठीशी केरळीय जनता उभी आहे आणि तिची लोकशाही मूल्यांवर दृढ श्रद्धा आहे, याचाच हा प्रत्यय आहे.