विद्यार्थिवर्गाचा उल्लेख मात्र आम्ही मुद्दामच टाळला आहे. कारण पक्षीय राजकारणाच्या आखाड्यात विद्यार्थिवर्गाला ओढू नये, असेच काँग्रेसने अव्याहत मानलेले आहे. मूलभूत राजकारण, सामाजिक व आर्थिक विचारसरणींतील मौलिक आशय यांपासून मात्र त्यांना वंचित करता येत नाही. भावी काळात आपल्यावर अटळपणाने पडणा-या दायित्वाची धुरा योग्य वेळी सांभाळता यावी, या दृष्टीने विद्यार्थ्यांनी चालू काळातील सामाजिक व आर्थिक विचारप्रवाहांचा अद्ययावत मागोवा घेत राहावे, हे स्वाभाविकच आहे. पण त्यांनी एखाद्या राजकीय पक्षाशी नाते जोडण्याच्या मुद्द्यावर मात्र आम्हांला असेच वाटते, की समग्र विद्यार्थिवर्गाने अशा प्रकारच्या पक्षीय राजकारणाच्या जाळ्यात न गुरफटणेच अधिक इष्ट. आम्ही विद्यार्थ्यांचा निर्देश केला नाही, तो याच कारणामुळे. तरुणांचा उल्लेख आम्ही खासच केला आहे. देश वा पक्ष, तरुणांना नाही, तर दुस-या कोणाला आवाहन करू शकेल? तरुणांविना देशालाही उज्ज्वल भवितव्य नाही व पक्षालाही नाही. नव्या रक्ताची भरती अखंडित होत राहिली पाहिजे, एका पिढीमागून दुस-या पिढीचा पाठिंबा अव्याहत लाभला पाहिजे, हा मूलभूत धडा भूतकाळातील अनुभवांतून आपण घ्यायलाच हवा.
दुस-या, तिस-या व चवथ्या दशकांत चळवळींची व लढ्यांची परंपरा अव्याहतपणे सुरू होती. स्वाभाविकच काँग्रेसच्या उच्चनीच थरांत तरुणांचा अव्याहत प्रवाह मिसळत राहिला. पण चवथ्या व पाचव्या दशकांपासून मात्र देशभक्तीच्या भावनेने उत्स्फूर्त झालेल्या चळवळी वा लढे झालेच नाहीत. आता चळवळी होतात, त्या जातिनिष्ठ हेव्यादाव्यांमुळे, भाषिक स्वार्थपरतेपायी वा प्रादेशिक उद्दिष्टांसाठी. असल्या चळवळींतील व्यक्तींची भरती आपल्याला करता येत नाही. परंतु काँग्रेसच्या उच्चनीच थरांत भरती करता येईल, अशा थोड्या इतर प्रकारच्याही युवकांच्या चळवळी निश्चितच आहेत. तरुण पिढीला तुम्ही योग्य प्रकारे आवाहन कराल आणि, त्यांची गरज इतरांना आहे, अशी भावना त्यांच्या मनात जागृत कराल; देशाच्या पुनर्रचनेसाठी आपण जे जे काही करीत आहोत, त्यात भाग घेण्याची संधी त्यांना मिळू शकेल, अशी त्यांची खात्री पटवाल; तर काँग्रेसला आपल्या भवितव्यतेविषयी काहीच काळजी उरणार नाही.
स्वातंत्र्योत्तर काळातील नवी पिढी आता ऐन उमेदीत आहे. आपल्या देशात एक नवी प्रौढ पिढी उदयाला आलेली असून तिला वीस वर्षांपूर्वी आपण काय केले, याची यथातथ्य माहिती मुळीच नाही. आणि आमचा लढा अशा स्वरूपाचा होता आणि आम्ही इतका इतका त्याग केला, असे त्यांना सांगितले, तरी त्याची मुळीच छाप त्यांच्यावर पडण्यासारखी नाही. कारण आपण लावलेला हातभार ते गृहीतच धरून चालतात आणि ते स्वाभाविकच आहे. प्रत्येक नवी पिढी पूर्वीच्या पिढीच्याच खांद्यावर आरुढ होत असते. आपण त्यांच्यासाठी इतके इतके केले, एवढेच नव्हे, तर भावी काळात आपण त्यांच्यासाठी काय काय करणार आहोत, हेही त्यांना सांगावे लागेल. जेव्हा जेव्हा माझी तरुण पिढीशी गाठ पडते, तेव्हा मी त्यांना सांगत असतो: 'स्वातंत्र्यसंग्रामात लढलेल्या स्वाभिमानी पिढीचे आम्ही घटक आहोत. आमचा वाटा आम्ही उचललेला आहे. आम्ही स्वातंत्र्यसंग्रामातले सैनिक आहोत, याचा आम्हाला आनंद वाटतो. आता पुढे सरसावून परिस्थितीचे आव्हान स्वीकारणे, स्वातंत्र्य दृढमूल करणे आणि हा लढा अधिकाधिक पुढे चालू ठेवणे, हे तुमचे कर्तव्य आहे.' तुम्ही त्यांना योग्य प्रकारे आवाहन कराल, तर तरुण पिढी तुमच्याकडे वळेल, याविषयी मला मुळीच संशय नाही. आपल्या युवकांच्या संदर्भात आपण ही भूमिका स्वीकारू, तर काँग्रेसचा धिक्कार होण्याचे काहीच भय नाही. आणि यासाठीच आम्ही तरुणांचा खास उल्लेख केलेला आहे.
(म्हणूनच वरील विवेचनाच्या आधारे हा ठराव पुढील अंतिम आवाहन करीत आहे.) आपण फुटीरपणाच्या राजकारणाच्या दृष्टीने विचार करता कामा नये, निंदेच्या दृष्टीनेही राजकारणाचा विचार करू नये. वैयक्तिक टीका करून शीलावर शिंतोडे उडवण्याचेही धोरण ठेवू नये. सुनिश्चित अभिवचने देऊन त्यांसाठी बांधिलकीच्या राजकारणाच्याच दृष्टीने विचार करण्याचा प्रयत्न आपण करू या. आपण हे करू, तर आपला देश व लोकशाही समाजवाद स्वत:चे संरक्षण स्वत:च करू शकतील, याविषयी मला मुळीच शंका नाही.