या खोड्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्याच्या दृष्टीने हेच गुण उपकारक ठरणार आहेत. वस्तुत: काँग्रेस ही जनतेच्या केवळ राजकीय महत्त्वाकांक्षांचेच प्रतिनिधित्व करीत नाही. आजच नव्हे, तर गेल्या ८०-१०० वर्षांत ती आपल्या नवयुगाकडील वाटचालीच्या पोटतिडकीचे, आधुनिक जगाचे, अद्ययावत झालेल्या नवसमाजाच्या निर्मितीच्या आपल्या स्वप्नाचे प्रतिनिधित्व करीत आलेली आहे. आपली ध्येये हीच आहेत. पण केवळ घोषणा देत राहिल्याने काही ही ध्येये प्रत्यक्षात उतरवता येणार नाहीत. मी स्वत:च ही घोषणा करीत असतानाच मला याची पूर्ण जाणीव आहे. ध्येयाचा हा ध्रुवतारा गाठण्यासाठी आपल्याला बांधिलकीच्या राजकारणाच्या भूमिकेवरून विचार करावा लागणार आहे. मौलिक व पायाभूत गोष्टींचा मागोवा घेतल्यानेच हे साधता येईल. एका तत्त्वावर मी सदैव श्रद्धा ठेवत आलो आहे. आजच्या क्षणी निष्ठेविषयीच आणीबाणी निर्माण झाली आहे, असे लोक बोलतात. काही लोक 'आपण नाना मार्ग फुटलेल्या चौकात संभ्रमित अवस्थेत उभे आहो', असे या परिस्थितीचे वर्णन करतात. सध्या आपल्याला राजकीय दृष्ट्या कठीण काळातून मार्गक्रमण करावे लागत आहे, हे खास. आणि म्हणूनच या देशाच्या भवितव्यतेच्या दृष्टीनेच काँग्रेसने विचार करायला हवा आहे. मग आम्ही करावे काय?
ब्रिजच्या खेळातल्या एका अत्यंत वेधक नियमाचा मी निरंतर मागोवा घेत आलेलो आहे. त्या खेळात असा नियम आहे, की जेव्हा तुम्ही संशयग्रस्त व्हाल, तेव्हा हुकूम खेळावा. मला वाटते, हाच नियम राजकारणाच्याही डावाला उत्तम प्रकारे लागू पडतो. कारण हाही डाव मूलभूत राजनीतीचाच आहे. संकटग्रस्त परिस्थितीत अडकल्यासारखे वाटेल, तेव्हा पायाभूत तत्त्वांचाच विचार करा. आणि काँग्रेसच्या दृष्टीने पायाभूत गोष्ट कोणती? तिच्या सदस्यांच्या दृष्टीने सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहोचून तिच्याशी तादात्म्य साधणे, हीच मूलभूत गोष्ट होय. तत्त्वप्रणाली बाजूला ठेवून लोकांच्याच भूमिकेवर आरूढ होणे, त्यांच्याशी तदाकार होणे, हाच महत्त्वाचा निकष होय.
निर्धन बहुजनसमाज, लहान लहान कुळे, औद्योगिक कामगारवर्ग तसेच या देशातील तरुण यांच्या प्रेरणा व महत्त्वाकांक्षा यांच्याशी तादात्म्य साधता येईल, अशाच कार्यक्रमाच्या दृष्टीने आपल्याला विचार करायला हवा, (असे आम्ही इतिवृत्तात म्हटले आहे.) दुस-या, तिस-या व चवथ्या दशकांत आपण जे काही केले, तेच आपण करीत राहिलो, जनतेशी तादात्म्य साधण्याच्या मूलभूत नियमांचा मागोवा घेऊन व पक्षाला असलेला बहुजनसमाजाचा आधार पुनरुज्जीवित करून, तो आपण सुदृढ केला, तर काँग्रेसला भवितव्यतेविषयी कसल्याही प्रकारची भीती वाटण्याचे कारण पडेल, असे मला वाटत नाही.
दुस-याही एका क्षेत्राकडे आपण खास लक्ष पुरवणे इष्ट ठरेल. तरुण मनाला प्रेरणा देऊन व आकर्षित करून स्वत:च्या ध्येयपूर्तीसाठी त्यांचा उपयोग करून घेण्याचे जे सामर्थ्य काँग्रेसमध्ये आहे, तेही आपण लक्षात घ्यायला हवे. पक्षाच्या उच्चनीच सर्वच थरांकडे तरुणांचा पुनरुज्जीवन देऊ शकणारा ओघ अव्याहत चालू नसेल, तर कोणत्याही राजकीय पक्षाला उज्ज्वल भविष्याची आशा बाळगायला नको, हे निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. देशाचे भवितव्य घडविण्याच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावू इच्छिणा-या काँग्रेसने वरील कार्यक्षेत्राकडे दुर्लक्ष करून भागण्यासारखे नाही. म्हणूनच काँग्रेस संघटनेने तरुणांसमोर विधायक कार्यक्रम ठेवण्याच्या आवश्यकतेवर आणि आपल्याबरोबर देशाच्या पुनर्रचनेच्या कार्यात सहभागी होण्याची ओढ त्यांना लागावी, म्हणून स्फूर्तिदायक पण प्रत्यक्ष लाभदायी अशी उद्दिष्टे त्यांच्यापुढे ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला पाहिजे.