अर्थ असा, की ध्रुवीकरणाची, संयुक्त आघाडीची ही बडबड अगदीच अवास्तव आहे. व्यक्तिश: मला ती फारच असमंजसपणाची वाटते. आता आपणच सहभागी होऊ शकत नाही, उजव्या, डाव्या व इतर वर्गांत विभागल्या गेलेल्या या राष्ट्रिय पक्षांशी आपण कसलेच नाते जोडू शकत नाही.
मग आपण करायचे काय?
मला वाटते, आपण एकच करू शकतो. व्यक्तींवर नव्हे, तर काँग्रेसची तत्त्वप्रणाली, कार्यक्रम आणि धोरण यांवरच मदार ठेवून सारा मार्ग एकाकीपणे कापण्याचा निश्चय करणे. काँग्रेसला वाचवण्याचा आणि देशालाही वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.
आपण करतो आहोत, त्याचा उदो उदो करण्याचा माझा खटाटोप आहे, असे मात्र कृपा करून समजू नका. आपण आत्मसंतुष्ट बनत आहोत, असे मानू नका. ज्याच्या अंगी आत्मपरीक्षणाची अपरिहार्य, आवश्यक अशी क्षमता नाही, त्याला फारसे उज्ज्वल भविष्यही नाही. पण आत्मपरीक्षणाचीही दृष्टी समतोलच ठेवायला हवी. आत्मपरीक्षण परीक्षणच ठरायला हवे असेल, तर ते विधायकच असायला हवे. ते वस्तुनिष्ठ असले पाहिजे.
पण आज आपल्याला काय आढळते आहे? आत्मपरीक्षणाची अधोगती आत्मनिंदेत, आत्मधिक्कारातच होत आहे. स्वत:वर टीका करतानाही आपण वस्तुनिष्ठ राहायला हवे. आपण धोरणांची चर्चा करू शकतो, धोरणांचे पृथक्करण करून सत्यान्वेषण साधू शकतो, ते अमलात आणण्यातील चुका काढून त्या दूर करू शकतो. पण या घडीला मात्र काँग्रेसचे सगळे चुकले आहे - काँग्रेसचा कार्यक्रम चूक आहे, तिचे नेतृत्व चुकीचे आहे, तिची संघटना चूक आहे, इत्यादी टीका करणे हेच शिष्टमान्य होऊन बसल्याचे माझ्या निदर्शनास येत आहे.
काही तरी चुकते आहे, हे मीही मान्य करतो. पण सारेच काही चुकले आहे, असे म्हणता येईल का आपल्याला? अजूनही काँग्रेसला पाठिंबा देणारे कोट्यवधी लोक आहेतच. ते मूर्ख आहेत, म्हणून का ते काँग्रेसला पाठिंबा देत आहेत? का ते आंधळे आहेत? आजही काँग्रेस संघटनेत व तिच्या कार्यक्रमात काही तरी अत्यंत गतिमान असे आकर्षण आहे. स्वत:चे दोष जाणून घेण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी स्वत:चीच निंदा करण्याची मुळीच गरज नाही. कधी कधी तर आत्मनिंदेची, आत्मधिक्काराची ही वृत्ती इतकी पराकाष्ठेला जाते, की तिला विदूषकी रंग चढतात. मला कोणाही एका व्यक्तीची निंदा करायची नाही. प्रत्येकाची स्वत:ची मते प्रामाणिकच असतात, अशीच माझी श्रद्धा आहे. (पण काल एका व्यक्तीने दोन ठराव मांडलेले आढळले. एक काँग्रेसचे विसर्जन करण्याचा, तर दुसरा काँग्रेस मध्येच उच्चनीच श्रेणी निर्माण करण्याचा. काँग्रेसचे विसर्जन करायलाच का त्यांना काँग्रेसमध्येच अशी श्रेणी हवी आहे?) आजकाल अवलंबिला जातो, त्या विदूषकी थाटाचाही निर्देश मी केलाच आहे. (काँग्रेसचे विसर्जन न केल्याचा धिक्कार, म्हणून एका सद्गृहस्थाने मुंडणच करायचे ठरवले.) या देशात मूलभूत हक्क आहेत, हे मी जाणतो. व्याख्याने देण्याचे, संघटना करण्याचे व इतरही वैयक्तिक स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. आपले डोके तासायचा मूलभूत हक्क त्याला निश्चितच आहे. अर्थात खरे सांगायचे, तर आत्मपरीक्षण करायची वेळ आता निश्चितच आलेली आहे. पण ती वस्तुनिष्ठ व विधायक आत्मपरीक्षणाची. पण हा तर आत्महत्येचा घातक न्यूनगंड आहे. मी तरी त्याला आत्महत्येची वृत्तीच म्हणतो. आपल्याला आपला देश व पक्ष या आत्मघातकी वृत्तीपासून वाचवावाच लागणार आहे. या पक्षात काही तरी गतिमान, काही तरी ऐतिहासिक महत्त्वाचे आहे, हे आपण ध्यानात घ्यायला हवे. आज आपण अडखळत असूही. पण हे अडखळणे कसे सावरायचे, याचा मार्ग आपणच शोधून काढू या आणि भावी कार्यक्रमाची अंमलबजावणी आत्मविश्वास व भवितव्यावरील श्रद्धा यांची कास धरून करण्याचा प्रयत्न करू या.