दुस-या बाजूला आहेत उजवे कम्युनिस्ट व मार्क्सवादी. भारतातले कम्युनिस्ट व त्यांचे पक्ष आपल्या स्वत:च्याच विसंगतीला बळी पडत असल्याचे मला आढळून आले. उजवा कम्युनिस्ट पक्ष आपण चांगला ओळखतो. मला तशी कोणत्याही राजकीय पक्षावर टीका करायची नाही. पण आपल्यातल्या प्रत्येकाने राजकीय वातावरणाचे पृथक्करण करून त्यांच्या-आपल्यांत काही तरी समान गोष्टी आहेत का, हे पाहावे, हे फार बरे. वीस वर्षे काम केल्यानंतर उजव्या कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. आणि तेही नेतृवर्ग देशाबाहेरून कुठून तरी - मॉस्कोकडून - मार्गदर्शन स्वीकारू लागला, म्हणून ! त्यांतल्या काहींना तर मॉस्कोच्या आज्ञा पाळणेही पुरेसे वाटेना ! त्यांना बहुधा त्यात पेकिंगच्याही आज्ञांची भर पडायला हवी होती ! यामुळेच त्यांच्यांत फूट पडली. मार्क्सवादी उजव्या कम्युनिस्टांची पाठ धरतात, तर त्यांच्या शेपटाला धरून आता तिसराच एक गट डोके वर काढू लागला आहे - नक्षलबारी लांडग्यांचा. ते स्वत:च स्वत:मधील विसंगतीला बळी पडत आहेत. तुम्ही त्यांच्याशी सहकार्य करायला जाऊ पाहता का? खरे सांगायचे, तर उजव्या कम्युनिस्ट पक्षाची सारी लोकप्रियता नष्ट झाली आहे. गेल्या दोन निवडणुकांतील सर्वसाधारण प्रवृत्ती पाहाल, तर हे पूर्णपणे स्पष्ट दिसून येईल. काँग्रेसमधील फूट आणि सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखाली चालणा-या राजनैतिक घडामोडी यांवरच ते अधिक अवलंबून आहेत, हेच त्यांचे राजकारण !
मार्क्सवादी कम्युनिस्ट सशस्त्र क्रांतीची भाषा बोलत असले, तरी तिची कास धरण्याचा काळ हा नव्हे, अशी त्यांची भावना आहे. म्हणून वर्तमान परिस्थिती वर्गीय संघर्षासाठी मुत्सद्देगिरीने राबवण्याचा आणि तीतूनच भावी काळात सशस्त्र संघर्ष निर्माण व्हावा, या दृष्टीने प्रयत्न करण्याचा त्यांचा खटाटोप असतो. सशस्त्र क्रांतीला वर्तमानकाळ अनुरूप आहे, असे स्पष्ट सांगण्याइतका प्रामाणिकपणा नक्षलबाऱ्यांजवळ असून ते साहसवादाचीच भाषा बोलत असतात. आता हे झाले डावीकडचे चित्र.
उजवीकडच्या दृश्याचा निर्देश मी मागे केलाच आहे. वाद घालणारे - त्यांचा प्रामाणिकपणा मला मान्य आहे - म्हणतात, 'आपण सर्वसाधारण व मुदतपूर्व निवडणुका हरलो, याचे एकटे एक कारण म्हणजे विरोधी पक्षांनी अवलंबलेले आघाड्यांचे नवे मुत्सद्दी धोरण.' ही मुत्सद्देगिरी हळूहळू काँग्रेसला सर्व पक्षांनी घातलेल्या एक प्रकारच्या घेरावात परिणत होत आहे. हा एक राजकीय घेराव आहे खराच. भारतातील लोकशाही समाजवाद सुरक्षित राहायला हवा असेल, तर दृढनिश्चय, योजनाबद्ध कार्यक्रम आणि आत्मविश्वास यांच्या बळावर हा घेराव मोडून काढणे हे आपले कर्तव्य होय, असे मला वाटते. पण हा राजकीय गराडा मोडायचा कसा? कोणी म्हणतात 'ही फळी फोडायची असेल, तर स्वत:च जाऊन तिच्यात सामील होणे, हा उत्तम मार्ग.' मोठा अपूर्व तर्कवाद आहे हा ! आणखीही दोन पक्ष आहेत. ते म्हणतात, 'डाव्यांनाही मिळू नका आणि उजव्यांनाही मिळू नका. पण आपले दोन समाजवादी पक्ष आहेतच. एक प्र. सो. प. आणि दुसरा सं. सो. प.'. या दोन पक्षांना काँग्रेसशी कसलाच संपर्क नको आहे, हे मी जाणून आहे. मग त्यांच्याशी संपर्क साधायला हवा, अशी भाषा आम्ही का बोलावी, तेच मला कळत नाही. प्र. सो. प. काय आहे आणि सं. सो. प. काय आहे, ते आपण ओळखून आहोत. वस्तुत: ते दोषैकदृष्टी आहेत. काँग्रेसचे दोष हुडकीत राहून ती चुकली, असे सिद्ध करणे, हेच त्यांचे एकमेव तत्त्वज्ञान. हा एक प्रकारचा अकरणात्मक काँग्रेसवाद, हेच त्यांचे एकमेव तत्त्वज्ञान होय. अशा लोकांचे आपण करणार काय? हे दोन पक्ष देखील आपापल्या क्षेत्रात आपल्याच काँग्रेसविरोधी मतप्रणालीखाली पिचत चालले आहेत. त्यांची संगत धरून आपण स्वत: सामर्थ्यवान बनू शकू व जनतेला आणि देशातील राजनैतिक जीवनाला वा लोकशाहीला सामर्थ्याचे लेणे चढवू शकू, असे का (तुम्हांला) सुचवायचे आहे? याहून अधिक करुणार्ह आत्मवंचना मी दुसरीकडे कुठेच, कधीच पाहिलेली नाही.