सभोवतालचे जीवन आज झपाट्याने बदलत आहे, या बदलाची गती वाढविण्याचे प्रयत्नही आपण करीत आहोत. विज्ञान आणि तंत्रविद्या यांच्या योगाने आजच्या जगात प्रचंड क्रांती होत आहे. जग लहान होत आहे. जीवनाची सर्व अंगोपांगे तंत्रविद्येने व्यापली आहेत. सर्व क्षेत्रांत होत असलेल्या या बदलांची गती पाहिली, म्हणजे मन क्षणभर भांबावून जाते. या घटनेचा एक साधा अर्थ असा, की यापुढे भविष्यकाळातील प्रश्न सोडविताना भूतकाळाचा फारसा उपयोग होऊ शकणार नाही. परंपरेचे प्राबल्य असलेल्या आमच्या समाजात परंपरेचा अर्थ पुन्हा नव्याने तपासण्याची गरज निर्माण होईल आणि भविष्याकडे अधिकाधिक दृष्टी वळवावी लागेल. आजची श्रद्धास्थाने समूळ नाहीशी होती, असे नाही, परंतु आजवर चालत आलेल वाद, कलह, भेदाभेद हे सारेख अप्रस्तुत व अयोग्य म्हणून सोडावे लागतील, यात मुळीच शंका नाही. श्रद्धांचा अर्थ पुन्हा नव्याने लावावा लागेल, ध्येयसृष्टी नीट पारखावी लागेल. ही जबाबदारी नव्या तरुणांना घ्यावी लागणार आहे - हे सर्व सापेक्षाने साधता यावे, यासाठी केवळ ज्ञानाची उपासना वा बुद्धीची जोपासनाच करून चालणार नाही, तर भावनांची प्रगल्भता आणि अंत:करणाचा मोठेपणा अंगी असणे आवश्यक आहे. या दृष्टीने आजच्या शिक्षणक्रमातील खेळ, सांस्कृतिक कार्य इत्यादींचा व त्याचबरोबर राष्ट्रिय छात्रसेना, नॅशनल स्टुडंटस् सर्व्हिस किंवा महाराष्ट्रातील भूसेना अशांसारख्या उपक्रमांकडे पाहिले पाहिजे. तरुण विद्यार्थी मित्रांना सामाजिक परिस्थितीचे ज्ञान यथार्थ आकलन व्हावे आणि त्यांच्या भावनांचे शुद्धीकरण होऊन सामाजिक समता-स्थापनेच्या तीव्रतेची त्यांच्या मनात वाढ व्हावी, हा या उपक्रमांमागील हेतू आहे. कोण उत्तम खेळतो, याला महत्त्व आहेच, परंतु त्या बरोबरच जिंकला किंवा पराभूत झाला असताना तो कसा वागतो, याला तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्व आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे.
शिक्षणक्षेत्राची स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या गेल्या सत्तावीस वर्षांत पुष्कळच वाढ झाली आहे. शिक्षणसंस्थाही वाढल्या आहेत. येथील दरडोई उत्पन्नाच्या मानाने प्राथमिक शिक्षण घेणाऱ्यांची संख्या पाहिल्यास आपल्यासारख्या इतर विकसनशील राष्ट्रांच्या तुलनेने ती दुपटीहून अधिक आहे. विज्ञान क्षेत्रातील दरवर्षी तयार होणा-या स्नातकांची (पदवीधरांची) संख्या पाहिल्यास जगात आमचा तिसरा क्रमांक लागतो. आमच्या आजच्या समस्या अत्यंत कठीण आहेत, हे मान्य केलेच पाहिजे. त्यातून उपाय काढण्याचे आमचे आजवरचे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे सफल झाले नाहीत, हेही नाकारता येत नाही. यामुळे आमची तरुण पिढी आज रागावलेली आहे, हे मला माहीत आहे. शिक्षणाच्या साहाय्याने सामाजिक प्रश्नांचे आकलन झाल्यामुळे त्यांना राग आला आहे, हे उघड आहे. आणि म्हणूनच हे आकलन व्यर्थ जाणार नाही, अशी आशा बाळगण्यास आधार आहे. जमिनीत टाकलले बी एकदा अंकुरले, की वरच जाणार, खाली नव्हे ! गेल्या सत्तावीस वर्षांत पेरलेल्या शैक्षणिक बीजाला आता अंकूर फुटू लागले आहेत. आजच्या-एरवी निराशाजनक वाटणा-या परिस्थितीत हा एक महत्त्वाचा आशेचा किरण आहे, असे मानणारा मी आहे.