यशोधन-७

स्वतंत्र झाल्याबरोबर आम्ही आमच्या घरचे मालक झालो या भावनेने म्यानातली तलवार बाहेर काढून ती आम्ही आमच्या अंगाभोवती फिरवीत राहिलो असतो. तर आमच्या अवतीभवती आम्ही असंख्य शत्रू निर्माण केले असते. तेव्हा तसे काही न करता मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आमच्या स्वत:च्याही कल्याणासाठी आम्हांला दुनियेमध्ये शांतता हवी, असे आम्ही जाहीर केले.
 
जी माणसे देशाच्या स्वातंत्र्याची किंवा देशाच्या जीवनात घडणा-या क्रांतीची आखणी करतात, बांधणी करतात त्यांनाच ती क्रांती पुरी करण्याचा किंवा त्या क्रांतीतून निर्माण झालेल्या शक्तींचा आणि साधनांचा वापर करून, देशाची पुनर्रचना करण्याचा योग लाभतो, पण तोही क्वचितच!
 
एकपक्ष लोकशाही हे काही आपले ध्येय नाही. देशामध्ये जे विविध पक्ष आहेत, ते चालत राहणार आहेत. संसदीय लोकशाही चालवावयाची असेल, तर याशिवाय मला दुसरा मार्ग दिसत नाही. अर्थात विरोधी पक्ष वाढण्यासाठी मी थोडीच त्यांना मदत करणार आहे? ते त्यांच्या शक्तीने वाढतील. पण ते तसे वाढावेत, असे मात्र मला वाटते.
 
धर्म हा व्यक्ती आणि परमेश्वर यांच्यामधला संबंध आहे. हिंदू आपल्या मंदिरात परमेश्वराला आळविण्याचा प्रयत्न तरतो, तर मुसलमान आपल्या मशिदीत अल्लाशी संभाषण करण्याचा प्रयत्न करतो. ख्रस्ती आपल्या चर्चमध्ये परमेश्वराला हाक मारतो, तर शीख गुरूव्दारामध्ये परमेश्वराची प्रार्थना करतो; परंतु हे सर्व संपल्यानंतर, मंदिरातून, मशिदीतून, गुरूव्दारातून किंवा चर्चमधून जो माणूस बाहेर पडतो तो हिंदू नाही, मुसलमान नाही, शीख नाही आणि ख्रिस्ती नाही. तो फक्त भारतीय आहे, भावना आपल्या मनात रूजली पाहिजे.
 
लोकशाहीमध्ये आज्ञा नाही. लोकशाहीमध्ये डायलॉग आहे, संभाषण आहे. विचारांची आणि मतांची देवाण-घेवाण आहे हे आपण विसरता कामा नये.
 
माझा एक आवडता सिध्दांत आहे. लोकशाही सांभाळण्यासाठी दोन मते नसतील, तर मग लोकशाहीचे कारणच राहणार नाही; आणि त्यातला मुद्दा असा आहे की, ती दोन्हीही मते खरी असण्याचा संभव आहे. नुसतीच दोन मते असतात असे नव्हे, तर एखादे वेळी दोन्हीही मते बरोबर असण्याचा संभव असतो. म्हणून तर लोकशाहीची गरज आहे.
 
देशामधे असलेली लोकशाही या देशाला एक मोठा नेता होता म्हणूनच आहे, यावर माझा पूर्वीही विश्वास नव्हता आणि आजही नाही. नेहरूंनंतरही या देशात लोकशाही टिकवली. नेहरूंनंतर आलेल्या कर्तृत्ववान पुढा-यांच्या मृत्यूंनंतरही आम्ही या देशात लोकशाही टिकवू शकतो, असा या देशाला पुन्हा एकदा अनुभव आला, बाहेरच्या देशांनाही आला. हिंदुस्थानचा हा एक मोठा विजय आहे, असे आम्ही मानले पाहिजे.
 
घेतलेले निर्णय बदलू नयेत, असे कोणी सांगितले? शेवटी निर्णय जे घ्यावयाचे असतात ते लोकांच्या हिताकरिता, लोकांच्या इच्छेला मान देऊन घ्यावयाचे असतात. निर्णय महत्त्वाचे की लोक महत्त्वाचे असा प्रश्न निर्माण झाला, तर लोक महत्त्वाचे असेच मी म्हणेन आणि जेव्हा लोक आणि निर्णय यांच्यात संघर्ष निर्माण होतो तेव्हा लोक विजयी होतात, असा इतिहास आहे.
 
राष्ट्राला राष्ट्र बनविण्याचे काम अजूनही चालू आहे. कुंभाराच्या चाकावर असणारे मडके पक्के नसते. कुंभाराच्या भट्टीत जेव्हा ते भाजून निघते, तेव्हा ते पक्के बनते. अजूनही आमचे कुंभाराचे चाक फिरते आहे, आमच्या देशात एकतेचे चाक फिरते आहे. त्यावरील मडके अद्यापी पक्के बनावयाचे आहे. देशाच्या निरनिराळ्या भागांत आज जे काही घडते आहे, ते याचे घ्योतक आहे. निदर्शक आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org