यशोधन-१७

संरक्षण

भारताचे प्रतीक हिमालय आहे, तर महाराष्ट्राचे प्रतीक सह्याद्री आहे उंच उंच शिखरे असलेला बर्फाच्छादित हिमालय हे भारताचे प्रतीक आहे, तर दोनशे-दोनशे, तीनशे-तीनशे इंच पावसाचा मारा आपल्या डोक्यावर घेणारा काळ्या फत्तराचा सह्याद्री आमचे प्रतीक आहे; आणि जर कधी भारताच्या हिमालयावर संकट आलेच तर आपल्या काळ्या फत्तराची छाती हिमालयाच्या रक्षणाकरता महाराष्ट्राचा सह्याद्री उभी करील, असे मी आपणाला आश्वासन देऊ इच्छितो.
 
कुठे उत्तरेला कुणाच्या मनात पाप आहे, तर कुठे शेजा-यापाजा-यांच्या मनात पाप आहे; पण या पापांची मला भीती वाटत नाही. जोपर्यंत आमच्या मनगटामध्ये आणि आमच्या मनामध्ये सामर्थ्य आहे, तोपर्यंत इतरांच्या पापांची मला भीती वाटत नाही. तुमचे-माझे मन जर एकजिनसी झाले असेल, तुमच्या-माझ्या मनामध्ये जर काही सदभावना असतील, तर माझे मनगट जर एका सामर्थ्याने बांधले गेले असेल, तर मग आपल्याला कशाचीही भीती नाही.
 
शक्तीने कोठलाही प्रश्न सोडवून घेण्याचा यापुढे प्रयत्न झाला, तर हिंदुस्थानची प्रतिक्रिया काय राहील याचा विचार करावा; आणि त्यांनी ह्याही गोष्टीचा विचार करावा की, जागतिक शांततेच्या प्रश्नाला मदत आधारलेले, सर्व धर्मांना समान मानणारे असे कोणते राष्ट्र हिंदुस्थानशिवाय या आशिया खंडात आहे? या राष्ट्राच्या आणि ज्या मूल्यांवर हे राष्ट्र आधारलेले आहे त्या मूल्यांच्या रक्षमाकरिता त्यांची शक्ती आणि त्यांच्या सत्प्रवृत्ती, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे सदभाव, या राष्ट्राच्या पाठीमागे उभे राहणार आहेत की, हुकूमशाहीच्या राजवटीने झिंगलेल्या आणि लढाईची भीती दाखवून इतरांना सतत संकटात टाकण्याचा विडा उचलणा-यांना ते मदत करणार आहेत? आमच्या मते दुनियेतील पंचांच्या पुढे हाच आज खरा प्रश्न आहे.
 
तलवारीने लढाई जिंकावी असा काळ आज राहिलेला नाही. आजचा काळ, आजचा जमाना, आपल्या विचारांची तलवार साफ आहे की नाही, आपल्या मनातल्या भावना साफ आहेत की नाहीत, आपल्या प्रतिज्ञा साफ आहेत की नाहीत हे पाहण्याचा आहे. आजची लढाई ही विचारांची लढाई आहे, एका अर्थाने ती तत्त्वांची लढाई आहे.
 
आज आपणांपुढे पुष्कळच प्रश्न आहेत—विकासाचे प्रश्न आहेत, भाषांचे प्रश्न आहेत, विभागांचे प्रश्न आहेत; आणि अशाच प्रकारचे अनंत प्रश्न असेच सतत निर्माण होत राहणार आहेत; परंतु या सर्व प्रश्नांच्या पाठीमागे देशाच्या एकतेची जी भावना आहे, ती तुम्हांला कायम ठेवली पाहिजे, टिकवली पाहिजे. या भावनेला थोडासाही का होईना तडा गेला आहे असे ज्या दिवशी शत्रूला वाटेल, त्या दिवशी या देशावर पुन्हा निश्चित संकट येईल, हे आपण समजले पाहिजे.
 
पूर्वी ह्या सह्याद्रीच्या माथ्यावर राज्याच्या रक्षणासाठी ठिकठिकाणी दुर्ग बांधण्यात आले होते. या डोंगरावरच्या किल्ल्यांनी राज्ये जिंकता येणार नाहीत. त्यासाठी तुम्हां-आम्हांला, तुमच्या आमच्या मनामध्ये निर्धाराचे दुर्ग उभे केले पाहिजेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org