यशोधन-१५

आज साडेतीन कोटी एकर जमीन महाराष्ट्रात अशी आहे की, जी गळक्या भांड्यासारखी आहे. मथुरेची गवळण पाणी भरून डोक्यावर हंडा घेऊन निघाली आणि घरी येऊन पाहते तो आपल्या डोक्यावरच्या हंड्यामध्ये पाणी नाही. तसेच आपल्या शेतीचे झाले आहे. दरपर्षी मृग नक्षत्रापासून हस्त नक्षत्रापर्यंत भरलेल्या नक्षत्रांच्या बाजारामध्ये आपल्या डोक्यावर भांडे घेऊन जाते बिचारी आमची शेती. पण त्यात शेवटी काही शिल्लक राहत नाही. आमच्या महाराष्ट्राच्या शेतीचा हा मथुरेचा बाजार झालेला आहे.
 
जसेजसे उत्पादन वाढेल, तसतसा राष्ट्रीय भाकरीचा (नॅशनल केक) आकारही वाढेल. जीवन-कलहाची तीव्रता कमी होईल आणि दुस-याच्या तोंडातून घास काढल्याशिवाय आपल्या तोंडात घास जाणार नाही, ही परिस्थिती बदलेल. दोघांचीही  कमाई वाढते, कारण उत्पन्न वाढलेले असते. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की, केवळ उत्पादनवाढ झाल्याने दारिद्र्याचा प्रश्न आपोआप सुटेल. विकासाच्या लाभाचे न्यायोचित वाटप झाले पाहिजे, अशी दक्षता घेणारे राष्ट्रीय धोरण आम्ही आखले पाहिजे, विकसनशील अर्थव्यवस्थेत सामाजिक संघर्ष अधिक सुलभतेने मिटविता येतात अशी माझी धारणा आहे. या देशाची उत्पादनप्रक्रिया गतिमान होईल व समग्र राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होईल, या माझ्या आशावादाशी तुम्हीही सहमत असाल, तर भारतातील वर्गसंघर्ष दिवसेंदिवस कमी होतील असे तुम्हांलाही वाटेल. असे हितसंघर्ष उदभवले असता, सरकारने उदासीन राहिले पाहिजे असे मला वाटत नाही. दुबळ्या जनतेला शक्ती देण्यासाठी सरकारने धावून गेले पाहिजे आणि कमजोर व शक्तिवान यांच्यामध्ये सुरू असलेल्या विषम लढतीचे तुल्यबळ लढतीत रूपांतर केले पाहिजे. कुठल्याही राज्यात संपूर्णपणे सामाजिक शांतता नांदेल अशी कल्पना करणे अवास्तव आहे. संघर्ष सतत उदभवत राहतीलच. संघर्षात सरकारने धटिंगणांविरूध्द गरिबांची बाजू घेतली पाहिजे; परंतु त्याचबरोबर कार्यक्षमता वाढीचीही दक्षता घेतली पाहिजे. कमजोराला कुबड्या देऊन नव्हे, तर त्याच्या अंगात कार्यक्षमतेची धमक निर्माण करून त्याला सहाय्यभूत होणे ही सरकारची जिम्मेदारी आहे. ‘परिश्रमनीतीचा’ सर्वांत:करणाने स्वीकार केल्यानेच देशाला ऐश्वर्य व समृध्दी प्राप्त होत असते.

उत्पादनाच्या बाबतीत ज्याला एक प्रकारची शिस्त म्हणतात, ती आपण स्वत:च घालून घेतली पाहिजे. कारखानदारांमध्ये, कामगारांमध्ये आणि शासनामध्ये खराखुरा शांततेचा कारार होऊन ‘बंद’ची भाषा बंद झाली पाहिजे. जर काही बंदच करावयाचे असेल, तर हे बंद करण्याचे धोरण बंद केले पाहिजे. संप होऊन नयेत, पण त्याबरोबर संप नाहीत म्हणून कामगारांवर अन्याय करण्याचे एखाद्या मालकाने ठरविले, तर त्यालाही चोरवाट सापडता कामा नये. त्याचाही विचार झाला पाहिजे.

आर्थिक गुंतागुंतीतून निर्माण होणारे तणाव व दबाव यांमुळे आम्ही आमच्या राष्ट्रीय एकतेचे किंवा राष्ट्रीय सुरक्षिततेचे महत्त्व कमी मानणार आहोत किंवा काय; आणि आज हे बंद करून आणि उद्या ते बंद करून आम्ही आमचे नशीबच बंद करून घेणार आहोत किंवा काय, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.
 
तांत्रिक जगाची आज जी झपाट्याने प्रगती होत आहे तिचे वर्णन करताना एक गृहस्थ म्हणाले होते की, “To remain where you are, you have to very fast.” तुम्ही जेथे आहात तेथेच तुम्हांला जरी थांबावयाचे असले, तरी त्यासाठीसुध्दा तुम्हांला फार वेगाने धावावे लागेल. तुम्ही अजिबात धावला नाहीत, तर पुढे जाण्याची गोष्टच सोडून द्या. तुम्ही आहात तिथे तर तुम्हांला राहता येणार नाहीच, उलट एकसारखे तुम्ही मागे पडत राहाल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org