विकास
जहाजांच्या तांड्याची गती सर्वांत कमी वेग असणा-या जहाजाने नियंत्रित होते, अथवा साखळीचा बळकटपणा हा जसा तिच्या दुव्यातील सर्वांत कमजोर अशा दुव्यावरच अवलंबून असतो, त्याप्रमाणे सबंध देशाच्या दृष्टीने विचार केल्यास देशाचे सामर्थ्य हेही त्यातील सर्वांत दुबळ्या घटकानेच नियंत्रित होते असे दिसून येईल. अविकसित विभागांचा व प्रदेशांचा आपण प्रथम विचार केला पाहिजे.
गतिमान विकासासाठी कोणते तंत्र स्वीकारावे याचा विचार आपण केला पाहिजे. देशात ज्यावेळी काही वस्तूंची तीव्रतेने टंचाई भासू लागते, त्यावेळी त्या वस्तु आम्हांला मिळाल्याच पाहीजेत, अशा घोषणा करून चालत नाही, रागावून भागत नाही, तर आहेत त्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. त्या वस्तूंची कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. हे करीत असताना काही शिस्त स्वीकारावी लागते. याचा अर्थ केवळ अधिक कष्ट करा आणि कमी खा असा नाही. जेव्हा विकासाच्या मोठ्या यात्रेमध्ये तुम्हां-आम्हांला या देशाला पुढे घेऊन जावयाचे आहे तेव्हा काही कठोर शिस्त या देशाने स्वीकारली पाहिजे. प्रगत देशामध्ये आढळणा-या सुखसोयींचा हव्यास आणि गरिबी हटविण्याची गरज, या दोम्हींचे लग्न विकसनशील देशात लागत नाही हे आपण ओळखले पाहिजे.
आजच्या हिंदुस्थानच्या संदर्भात त्याने आपल्या नियोजनाची दोन सर्वांत महत्त्वाची साधने सांगितली आहेत. त्यातले पहिले साधन म्हणजे मनुष्यबळ आणि दुसरे साधन म्हणजे वेळ. चाळीस कोटी लोकांचा हा देश काही न करता जर फुकट एक वर्ष बसून राहिला, तर आमची फार मोठी शक्ती वाया गेली असे होईल. कारण त्या श्रमाच्या बळावर आम्ही कितीतरी पुढे गेलो असतो; आणि दुसरे म्हणजे जग त्या काळात आमच्या कितीतरी पुढे निघून जाईल.
सहकार चळवळीत आर्थिक सत्ता आहे याचीही जाणीव लोकांत आणि त्याचप्रमाणे सहकारी कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे. ही चळवळ एका अर्थाने सत्तेचे एक केंद्र आहे आणि सत्तेचे केंद्र म्हटले म्हणजे लोकशाहीचा अंकुश त्यावर ठेवलाच पाहिजे. तसे न केल्यास अनियंत्रित सत्तेमुळे विकासाचे हे शस्त्र दुधारी ठरेल अशी मला साधार भीती वाटते.
महाराष्ट्राच्या भवितव्याची ही मोठीच मोठी, लांबच लांब सफर आहे... त्या सफरीतील आम्ही प्रवासी आहोत... ही सफर तुम्हांआम्हांला पुरी करावयाची आहे... ती सफर आज मला माझ्या डोळ्यांसमोर दिसते आहे, विजेच्या प्रकाशाने लखलखल्यासारखी मला दिसते आहे... ती लांबची सफर आहे, कष्टाची सफर आहे, उद्योगाची सफर आहे... पण ती पुरी केलीच पाहिजे... कारण त्यात जनतेचे कल्याण आहे...
जगातील अविकसित देशांपुढे असलेल्या या सर्व अडचणींत आणखी एका अडचणीची भर पडली आहे. ती म्हणजे या देशामधील लोकांत सामाजिक दृष्टिकोण व जीवनप्रवृत्ती यांत फार मोठी तफावत पडल्यामुळे, देशाच्या आर्थिक प्रगतीच्या आणि सामाजिक व राजकीय ऐक्याच्या मार्गांतील एक धोंड ठरली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी कोणती उपाययोजना करावी, हा प्रश्न या अविकसित देशांना गेली अनेक वर्षे भेडसावीत आहे. आता हे देश लोकांच्या राहणीच्या मानात कमीत कमी काळात वाढ करण्याच्या विचारांनी प्रेरित झाले असल्यामुळे, आर्थिक विकासाचे काम सर्वस्वी खाजगी क्षेत्राच्या हाती ते सोपवू शकत नाहीत.