लोकनेते यशवंतराव चव्हाण - ८

या काळात यशवंतरावांचे वाचन अखंडितपणे सुरुच होते. राजकारण, इतिहास, वाङ्मय या विषयांतील निवडक पुस्तकांचे वाचन सुरु होते. कॉलेजच्या लायब्ररीत वाचनामध्ये ते तासनतास गढून जात. इतिहासविषयक  अनेक पुस्तकांचे वाचन त्यांनी याकाळात केले. प्रांत, भाषा याच्या पलिकडे जाऊन देश व जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी त्यांना वाचनामुळे लाभली.  त्यांच्यात समाजवादी विचारांची रुजवणूक झाली. थोर इंग्रजी साहित्यिक एच. जी. वेल्स यांच्या 'आऊटलाईन ऑफ हिस्टरी' (Outline of History ) या ग्रंथाच्या वाचनाने मानव जातीच्या विकासाची नवी दृष्टी त्यांच्यामध्ये आली.

जॉर्ज बर्नार्ड शाँ ची इंग्रजी नाटके, फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्युगो यांच्या 'लॉ मिझराब्ल' व अन्य कांदब-या आदींचे वाचन केल्याने त्यांची दृष्टी व्यापक बनली. म. गांधींचे 'हरिजन' हे इंग्रजी साप्ताहिक यशवंतराव आवर्जून वाचत.  या साप्ताहिकातील गांधीजींचे साध्या, सरळ भाषेतील विचार यशवंतरावांना प्रेरक ठरले.

यशवंतरावांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक जडणघडणीत मोठे योगदान कोल्हापूरातील महाविद्यालयीन कालावधीत झाले. भविष्यात त्यांच्या हातून निर्माण झालेल्या विपुल साहित्यसंपदेची बिजे या महाविद्यालयीन जीवनातच पहावयास मिळतात. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वातील वैचारिक परिपक्वतेच्या दृष्टीने या काळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
थोर साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय, एस्. एम्. जोशी, श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचारांचा मोठा प्रभाव याकाळात यशवंतरावांवर होता. १९३५ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या समाजवादी पक्षामध्ये यशवंतरावांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकीच एक म्हणून यशवंतरावांचा समावेश होतो.

कॉलेज शिक्षण व स्वातंत्र्यचळवळीतील सहभाग या दोन्हीही क्षेत्रात यशवंतराव आघाडीवर राहिले. 'इतिहास' व 'राजकारण' या त्यांच्या आवडीच्या विषयातून त्यांनी १९३८ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी प्राप्त केली. शिक्षण केवळ एवढ्यावरच न थांबविता त्यांनी पुणे येथे लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांची ज्ञानाची भूक थांबण्यासारखी नव्हती. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणूनच त्यांनी आपल्या जीवनाची जडण-घडण केली. एल.एल.बी.ची पदवी चांगल्या गुणांनी प्राप्त करुन त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरु केला. शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावयचा हा त्यांचा ध्यास होता. वक्तृत्त्वावरील प्रभाव, निर्णयक्षमता, लोकसंग्रह या गुणांचा त्यांना वकिलीच्या व्यवसायात खूपच उपयोग झाला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org