लोकनेते यशवंतराव चव्हाण - ७

४. महाविद्यालयीन जीवन

१९३१ मध्ये यशवंतराव मॅटिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर पुढे उच्च शिक्षण घेण्याची त्यांची खूप इच्छा होती. घरच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांची प्रारंभीची तीन वर्षे वाया गेली. त्यांचे एक जवळचे मित्र गौरीहर सिंहासने यांनी केलेल्या अर्थिक सहकार्यामुळे यशवंतराव उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. जून १९३४ मध्ये त्यांनी जुन्या राजवाड्याशेजारी असणा-या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शहराचे मध्यवर्ती ठिकाण, उत्तम शिक्षणवर्ग, समुद्ध लायब्ररी, प्रशस्त व भव्य इमारत यामुळे यशवंतराव राजाराम कॉलेजमध्ये चांगलेच रुळले. डॉक्टर बाळकृष्ण हे कॉलेजचे प्राचार्य होते. इतिहास विषयाचे अभ्यासक , पल्लेदार वक्तृत्त्व, राष्ट्रीय वृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख गुण होते. प्राचार्यांना खास भेटण्यासाठी एक दिवस यशवंतराव त्यांच्या निवासस्थानी गेले. आपला पूर्वइतिहास त्यांच्यासमोर कथन केला. डॉ. बाळकृष्ण म्हणाले,  "लक्षात ठेव. हे संस्थानी राज्य आहे. मी पंजाबहून येथे आलेलो आहे. तू जोपर्यंत शैक्षणिक कामात प्रगती करत राहशील. तोपर्यंत माझा तुला पाठिंबा राहील, पण कृपा कोल्हापूर संस्थानच्या राजकारणात भाग घेऊ नकोस." प्राचार्यांच्या सूचनेप्रमाणे यशवंतरावांनी अभ्यासात प्रगती केली. प्राचार्यांशी त्यांचा चांगला स्नेहसंबंध प्रस्थापित झाला. कोल्हापूरात असताना प्रजापरिषदेच्या कार्यकर्त्यांशी यशवंतरावांचा संबंध येऊ लागला. त्या काळात राजाराम कॉलेजमध्ये यशवतरावांना डॉक्टर उपाध्ये, ख्यातनाम कादंबरीकार ना.सी. फडके, प्रा. माधवराव पटवर्धन (कवी माधव ज्युलियन), डॉ. बोस या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. १९३४ ते १९३८ दरम्यान चार वर्षाच्या कोल्हापूरच्या वास्तव्यात त्यांनी शिवाजी पेठ, भुसारी वाडा व अन्य ठिकाणी स्वतंत्र खोली घेऊन शिक्षण पूर्ण केले.

प्रा. डॉक्टर उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव अर्धमागधी शिकले. थोर साहित्यिक ना. सी. फडके यांच्याकडून तर्कशास्त्र हा विषय यशवंतराव शिकले. त्या काळात प्रा. फडकेंच्या 'जादूगार' आणि 'दौलत' या कादंब-या यशवंतरावांनी वाचल्या होत्या. खुद्द लेखकच आपल्याला शिकवायला असल्याने यशवंतराव त्याचा तास कधीच चुकवत नसत. विषय सोपा करुन मनोरंजकपणे शिकविण्याची वेगळी हातोटी त्यांच्याकडे होती.  त्यामुळे मराठी, इतिहास या विषयांबरोबरच तर्कशास्त्र हा विषय यशवंतरावांच्या आवडीचा बनला. प्रा.फडकेंच्या कोल्हापूरात होणा-या अन्य व्याख्यानांनाही यशवंतराव आवर्जून उपस्थिती लावत. प्रा. फडक्यांनी कॉलेजमध्ये स्थापन केलेल्या संगीत मंडळाचे यशवंतराव सभासद झाले. त्यावेळी कॉलेजच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये झालेल्या प्रसिध्द गायिका हिराबाई बडोदेकर यांच्या संगीत मैफलीच्या आठवणी त्यांच्या स्मरणात चिरंतन कोरल्या गेल्या. प्रा. ना. सी. फडकेंमुळे यशवंतरावांच्यात साहित्याची अभिरुची निर्माण झाली. यातूनच त्यांच्या साहित्यिक मनाचा विकास झाला. पुढील काळात त्यांच्या हातून निर्माण झालेल्या साहित्यसंपदेचा पाया महाविद्यालयीन जीवनातच
रचला गेला.

प्रा. माधवराव पटवर्धन उर्फ कवी माधव ज्युलियन यांनी यशवंतरावांना इंग्रजी कविता शिकविल्या. आपल्या विषयात तज्ज्ञ म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. वक्तशीर असणा-या प्रा. पटवर्धनांची विद्यार्थ्यांशी मात्र फारशी जवळीकता नव्हती. परिणामी यशवंतराव त्यांच्या फारसे जवळ जाऊ शकले नाहीत. बी. ए. च्या वर्गात असताना डॉ. बोस या इंग्रजीवर प्रभुत्त्व असणा-या प्राध्यापकाकडून यशवंतराव इंग्रजी कविता शिकले. हायस्कूलमधील जीवनांत श्री. दत्तोपंत पाठक  व कॉलेजमध्ये प्रा. डॉ. बोस हे दोनच इंग्रजीचे शिक्षक यशवंतरावांना खूप भावले. त्यांच्या इंग्रजी शिकविण्याच्या कौशल्यामुळे तो विषयही यशवंतरावांना आवडीचा वाटू लागला. भविष्यकाळात यशवंतराव देशाचे संरक्षणमंत्री असताना आपले गुरु प्रा. डॉ. बोस दिल्लीमध्येच वास्तव्यास आहेत याची माहिती यशवंतरावांना मिळाली.  डॉ. बोस यांच्याशी फोनवरुन यशवंतराव बोलले, "मी तुमचा राजाराम कॉलेजचा विद्यार्थी आहे. तुम्ही माझ्याकडे चहाला याल का?"

प्रा. डॉ. बोसनी निमंत्रण स्विकारले व दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक असणा-या आपल्या मुलग्याला घेऊन ते यशवंतरावांच्या निवासस्थानी आले. सुमारे तासभर चाललेल्या संवादातून कोल्हापूरातील कॉलेज जीवनाला उजाळा मिळाला. एक थोर गुरु व तितकाच महान शिष्य यांच्यातील हा संवाद म्हणजे सुवर्णक्षणच मानावा लागेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org