लोकनेते यशवंतराव चव्हाण - ६


३. स्वातंत्र्यलढ्यात सहभाग व तुरुंगवास

कराडमधील केंद्र शाळेतून व्हर्नाक्यूलर फायनल परीक्षा पास झाल्यावर १९२७ मध्ये यशवंतरावांनी कराडच्याच 'टिळक हायस्कूल' मध्ये प्रवेश घेतला. माध्यमिक शिक्षण सुरु असतानाच देशभर क्रांतीचा वणवा भडकलेला होता. क्रांतीकारकांच्या विचारांचा मोठा प्रभाव या दरम्यान यशवंतरावांवर होता.  वृत्तपत्रातील बातम्या वाचून राष्ट्रीय नेत्यांची चरित्रे वाचून यशवंतरावांचे मन देशप्रेमाने भारावून गेले होते. यतिंद्रदासांनी तुरुंगात केलेल्या आत्मबलिदानाने त्यांचे मन पेटून उठले. इ.स. १९२९ मध्ये भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी असेंब्लीत बॉम्ब फेकला. या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना पकडून फाशी दिले. 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत हसत हसत फासावर जाणा-या भगतसिंगाच्या कृतीतून प्रेरणा घेऊन यशवंतरावांनी निर्धार केला, 'येथून पुढचे संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्यासाठी अर्पण करावयाचे.' यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

इ.स. १९३०-३१ हा काळ संपूर्ण देशभर असहकार आंदोलनाने व्यापला होता. मिठावरील अन्यायकारक कराला विरोध करण्यासाठी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली देशाच्या कानाकोप-यात कायदेभंग चळवळ सुरु होती. विद्यार्थी वर्गही यामध्ये कोठे कमी नव्हता. यशवंतरावांनी आपल्या विद्यार्थी दशेतच असहकार चळवळीत उडी घेतली. १९३२-३३ मध्ये त्यांना १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. वयाच्या अवघ्या २० वर्षी भोगावा लागलेला यशवंतरावांच्या जीवनातील तो पहिलाच तुरुंगवास होता. त्यानंतर आंदोलने, चळवळी, भाषणे याने यशवंतरावांचे जीवन व्यापून गेले. प्रचंड वाचन, प्रभावी वक्तृत्व हे गुण याकाळात यशवंतरावांनी आत्मसात केले.

यशवंतरावांच्या जीवनात त्यांची पत्नी वेणूताईंचे योगदान खूपच मोठे मानावे लागले. २ जून १९४२ ला कराड येथे यशवंतराव वेणूताईंशी विवाहबद्ध झाले. वेणूताईंचे माहेर फलटण ( जि. सातारा ) येथील मोरे कुटुंबातील. सुसंस्कृत शेतकरी कुटुंबात संस्काराचे धडे वेणूताईंवर बालपणापासूनच झाले होते. नम्रता, शालीनता व गुणग्राहकता या गुणांचा अंतर्भाव वेणूताईंच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. यशवंतरावाच्या झंजावती वादळी जीवनाला साथ देण्याचे दिव्यकार्य वेणूताईंनी आयुष्यभर पार पाडले.

विवाहानंतर अवघ्या दोनच महिन्यात संपूर्ण देशभर 'चले जाव' आंदोलन भडकले होते. ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी मुंबईच्या 'गवालिया टॅंक' ( आझाद मैदान) मैदानावरुन देशवासियांना 'करा किंवा मरा' असा संदेश दिला. यशवंतरावांनी 'चले जाव' आंदोलनात सातारा जिल्ह्याचे नेतृत्व केले. प्रमुख राष्ट्रीय नेत्यांना अटक झाल्यावर यशवंतरावांनी भूमिगत राहून या लढ्याचे नेतृत्व केले. या लढ्यातील सहभागाबद्दल यशवंतरावांना तुरुंगात जावे लागले. यशवंतरावांचा एक पाय घरात तर दुसरा पाय तुरुंगात असायचा. या काळात पत्नी वेणूताईंनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. यशवंतराव भूमीगत असताना पत्नी वेणूताई खूप आजीर असल्याची बातमी त्यांना समजली. नुकतेच लग्न झालेले असताना आपण पत्नीकडे लक्ष देऊ शकलो नाही, याबद्दल अपराधीपणाची भावना यशवंतरावांच्या मनाला बोचू लागली. काही झाले तरी पत्नी वेणूताईंना भेटायचेच असा निर्धार यशवंतरावांनी केला. आपल्या अन्य सहका-यांशी चर्चा करुन यशवंतराव रात्री फलटणला जायला निघाले. मध्यरात्री फलटणला पोहचून, पत्नी वेणूताईंची विचारपूस करुन पहाटे साडेचारला फलटण सोडायचे असा बेत आखण्यात आला. गाडीचा अचानक खोळंबा झाल्याने फलटणला पोहचायला पहाटेचे साडेचार वाजले. तोपर्यंत यशवंतराव आल्याची बातमी पोलिसांना लागली. दुपारी वाड्याला पोलिसांचा वेढा पडला. यशवंतरावांना कैद करुन त्यांची तुरुंगात रवानगी झाली.

१९४३ मध्ये थोरले बंधू ज्ञानदेव यांचे निधन झाले. बालपणाचा वडिलांच्या मृत्युनंतर यशवंतरावांना आधार देण्याचे काम मोठ्या बंधूंनी केले होते. त्यांच्या निधनाने यशवंतरावांचा मोठा आधार हरपला. प्राप्त परिस्थितीचा स्विकार करुन येणा-या आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य यशवंतरावांनी बाळगले. देशाचे स्वातंत्र्य हे यशवंतरावांचे त्याकाळात प्रमुख उद्दिष्ट होते.  'राजकीय क्रांती' हा विषयावर कविता-लिहिल्याबद्दल यशवंतरावांना तुरुंगवास भोगावा लागल्या. १९५४ मध्ये त्यांची तुरुंगातून सुटाक झाली. अशा रितीने यशवंतरावांच्या तुरुंगातील फे-या सतत सुरूच होत्या.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org