लोकनेते यशवंतराव चव्हाण - ४२

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी कराडला जाऊन प्रीतिसंगमावरील यशवंतरावजींच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण म्हणतात.

“मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी कराडला येऊन चव्हाणसाहेबाच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी किती मोठी आहे याची ख-या अर्थाने मला जाणीव झाली.”

पृथ्वीराज चव्हणांचे वडील आनंदराव व यशवंतराव हे दोघे महाविद्यालयीन जीवनापासूनचे जीवलग मित्र. आनंदराव चव्हाण हे पूर्वाश्रमीचे शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर कार्यकर्ते. यशवंतरावजींच्या बेरजेच्या राजकारणातून आनंदराव काँग्रेस पक्षात दाखल झाले. यशवंतरावांनी आपला हक्काचा कराड लोकसभा मतदारसंघ पुढील काळात आनंदरावांना दिला व स्वतः सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीला उभे राहिला. आनंदरावजी चव्हाण यांनी कराड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यशवंतरावजींच्या त्यागामुळेच आनंदराव चव्हाण, त्यांच्या पत्नी प्रेमलताताई चव्हाण व पुत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधत्व करण्याची संधी मिळाली. यानंतर या कुटुंबाची उत्तरोत्तर राजकीय प्रगती होत गेली. मिळालेल्या वारशाचा योग्य वापर करून केंद्रात मंत्रीपद व सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद या पदावर पृथ्वराज चव्हाण विराजमान झाले. यशवंतरावांप्रमाणेच आनंदरावजी चव्हाणांच्या कुटुंबाने काँग्रेस पक्षावर ठेवलेल्या निष्ठेचे योग्य फळ त्यांना मिळाले.

यशवंतराव चव्हाणांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. ‘कसेल त्याची जमीन’ या तत्वार नवा कूळकायदा त्यांच्या कारकीर्दीतच लागू झाला. त्यामुळे लहान गरीब शेतक-याला मोठा दिलासा मिळाला. १९६१ मध्ये पानशेत व खडकवासला धरण फुटून पुणे शहर जलमय झाले. या अत्यंत कठीण प्रसंगी यशवंतराव पुणेकरांच्या मदतीसाठी धावले. ही गंभीर परिस्थिती हाताळताना यशवंतरांच्या प्रशासनातील अनेक पैलू पुणेकरांना अनुभवायला मिळाले.

यशवंतराव मुंबई सोडून दिल्लीच्या राजकारणात गेले, तरी मुंबईशी संपर्क कायम होता. शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी बाळासाहेब ठाकरे ‘मार्मिक’ हे साप्ताहिक चालवित होते. शिवाजी पार्क, दादर येथील बालमोहन विद्यालयाच्या सभागृहात यशवंतरावजींच्या हस्ते या साप्ताहिकाचे प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून ‘मार्मिक’च्या प्रकाशन सोहळ्यास हार्दीक शुभेच्छा दिल्या.

१९८० च्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेवर आली. बॅरिस्टर ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यावेळी यशवंतराव केंद्रात विरोधी बाकावर होते. यावेळी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विरोधी पक्षांनी शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी दिंडी आयोजित केली होती. यशवंतराव या दिंडीत सहभागी झाले. यशवंतराव व अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करून बसमधून अन्यत्र सोडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षांनी शेतक-यांच्या प्रश्नावर आंदोलन करून पूर्वीचीच जिद्द कायम असल्याचे यशवंतरावांनी दाखवून दिले.

महाराष्ट्र विधानपरिषदेवर साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक यांना घेण्याचा पायंडा यशवंतरावांच्या कारकिर्दीतच पाडण्यात आला. प्रारंभी साहित्यिक ग. दि. माडगुळकरांना विधानपरिषदेवर घेऊन या प्रथेचा प्रारंभ करण्यात आला. पक्षीय हस्तक्षेप बाजूला सारून योग्य व पात्र व्यक्तिंची नेमणूक व्हावी याची दक्षता यशवंतरावीं घेतली. कुटुंबनियोजन क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल शकुंतला परांजपेंना विधानपरिषदेवर घेण्यात आले. सभागृहात श्रीमती परांजपेंनी विरोध प्रजा समाजवादी पक्षाचे सभासदत्व स्वीकारले तरीही यशवंतरावांनी त्यास हरकत घेतली नाही. पानशेत पूर आपत्ती यशस्वीरित्या हाताळल्याची दखल घेऊन माजी सनदी अधिकारी स. गो. बर्वे यांना १९६२ साली पुणे शहरातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. निवडणुकीतील विजयानंतर त्यांच्याकडे राज्याच्या अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. भारतीय लष्करातील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी एस. पी. पी. थोरात यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. बडोदा संस्थानचे राजकवी यशवंत यांना महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर लगेचच ‘महाराष्ट्र कवी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले विविध क्षेत्रातली रत्ने शोधून त्यांचा उच्चीत सन्मान करण्याची गुणग्राहकता यशवंतरावांजवळ होती हे यावरूनच दिसून येते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org