लोकनेते यशवंतराव चव्हाण - ४१

काहींनी दोनशे जागा मिळतील तर काहींनी दोनशे दहा जागा मिळतील असे सांगितले. यावर यशवंतराव मार्मिक शब्दात बोलले, “याचा अर्थ ७० ते ८० मतदारसंघात आपला पराभव होणार हे निश्चित. त्यामध्ये आणखी एका पराभवाची भर घालू व शरदला संधी देऊ.”

यशवंतरावांनी अशारितीने ज्येष्ठांचा विरोध डावलून शरद पवारांना संधी दिली. त्या निवडणूकीत शरद पवार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मताने निवडून येऊन त्यांनी यशवंतरावांचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविला. जणू शरद पवारांच्या राजकीय वाटचालीच प्रारंभच यशवंतरावांच्या योगदानातून झाला. पहिली पाच वर्षे आमदार म्हणून शरद पवारांनी आपल्या कार्याचा ठसा महाराष्ट्र विधानसभेत उमटविला. १९७२ च्या विधानसभा निवडणूकीनंतर नवे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी संभाव्य मंत्रिमंडळाची यादी तयार करून तिला काँग्रेस अध्यक्षांची मंजुरी घेतली. शरद पवारांचे या यादीत नाव नव्हते. यशवंतरावांनी ती यादी पाहताच इंदिराजींना तातडीने दूरध्वनी करून, ‘युवक पिढीचे नेतृत्व म्हणून शरद पवारांचे नाव यात असले पाहिजे,’ असे आग्रहाने सांगितले. इंदिराजींची मान्यता मिळताच शरद पवारांचे मंत्रिमंडळात नाव समाविष्ट करून त्यांच्याकडे गृह व सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले. यशवंतराव पुढील काळात दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक वर्षे राहिले, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ बनविताना त्यांचा निर्णय हा अंतिम मानला गेला.

यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाबद्दल शरद पवार म्हणतात, “राजकारणात लोक जोडले पाहिजेत, समाजाच्या विविध घटकांशी सुसंवाद ठेवला पाहिजे. साहित्य, संगीत, नाटक, कला-क्रीडा जगत यांच्याशी जवळीक ठेवली पाहिजे. कितीही मोठ्या पदावर गेलो, तरी सभ्यता, सुसंस्कृतपणा व नम्रता यांचे विस्मरण होता कामा नये, याची शिकवण मला चव्हाणसाहेबांमुळेंच मिळाली.”

१९८० च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी काँग्रसचे विभाजन इंदिरा काँग्रेस व स्वर्णसंगि काँग्रेस या दोन गटात झाले. शरद पवारांनी यशवंतरावांच्या पाठोपाठ स्वर्णसिंग (एस) काँग्रसेमध्ये प्रवेश केला. यशवंतरावांच्या उत्तरार्धातील प्रत्येक बारीकसारीक घटनांचे साक्षीदार शरद पवार होते. म्हणूनच त्यांना यशवंतरावांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जाते.

शरद पवार यांच्या साथीने सुशिलकुमार शिंदे राजकारणात आले. काँग्रेस फोरम फॉर सोशॅलिस्ट अक्शनचे महासचिवपदी प्रारंभी सुशिलकुमार शिंदेंनी काम पाहिले. यशवंतरावांशी सुशिलकुमार शिंदेची ओळख शरद पवारांनी करून दिली. नाईट हायस्कूलमध्ये कष्टातून शिक्षण, कोर्टात ‘बॉय प्यून’ अशा विविध क्षेत्रात काम केल्याचे सांगण्यात आले. यशवंरावांना सुशिलकुमरांच्या धडपडीबद्दल आत्मियता वाटली व त्यांना भविष्यात कायमचेच जवळ केले.

पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे खासदार व ज्येष्ठ नेते मोहन धारिय यांनाही यशवंतरावाजींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यशवंतरावजींची पक्षनिष्ठा, तत्त्वाशी असणारी बांधिलकी हे गुण मोहन धारियांना जवळून पहावयास मिळाले. वेणूताई – यशवंतरावांच्या सहजीवनाविषयी मोहन धारिय सांगतात.

“यशवंतराव आणि वेणूताईंचे जे सहजीवन आम्ही बघितले, ते पाहिल्यावर माथा आदराने झुकतो. वेणूताईंबद्दल असलेली त्यांची निष्ठा प्रेम यांना शब्दचा नाहीत. त्या काळी टी. बी. सारख्या असाध्य आजाराने वेणूताईंना ग्रासले होते. ज्येष्ठ स्नेही किसन वीर व खुद्द वेणूताईंना यशवंतरावांना दुसरे लग्न करण्यचा आग्रह धराल. यशवंतरावांनी हा सल्ला मानला नाही आणि वेणूताईंना कधीही अंतर दिले नाही. म्हणूनच त्यांना ‘पत्नीव्रती’ मानावे लागेल.”

१९७१ मध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेल्या व नंतर आमदार व अन्य महामंडळावर काम केलेले उल्हास पवार, केंद्रात विविध मंत्री पदे भूषविलेले व सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर काम करणारे पृथ्वीराज चव्हाण, अहमदनगरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार यशवंतराव गडाख, नाशिकचे वनाधिपती विनायकराव पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. केशवराव धोंडगे अशा कितीतरी नेत्यांचे राजकीय जीवन यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने फुलले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org