लोकनेते यशवंतराव चव्हाण - ३८

बिळाशी येथे झालेल्या जंगल सत्याग्रहात पोलीसांनी केलेल्या अनन्वीत अत्याचारात लोकांना धीर देण्यासाठी यशवंतराव आपले जोडीदार राघूअण्णा लिमये यांच्या बरोबरीने सहभागी झाले. बिळाशीच्या आजूबाजूच्या ४०-५० गावात या सत्याग्रहाचे लोण पसरले होते. सरकारी कायद्याचा अंमल करणा-या तलाठी, गाव पाटील या मंडळींना सहकार्य करायचे नाही, असे या सत्याग्रहे स्वरूप होते. कराड ते पेठनाका हा प्रवास सर्व्हिस मोटारने करून तेथून पुढे वाटेत एका गावात मुक्काम करून सुमारे ३५ मैलाचा प्रवास पायी करून यशवंतराव व राघूअण्णा बिळाशीला पोहचले. रात्री खूप उशिरा बिळाशीच्या एका चौकातील पारावर सभा झाली. यशवंतराव व राघूअण्णा लिमयेंनी जमलेल्या लोकांना आपल्या भाषणांतून प्रेरणा दिली. बिळाशी पंचक्रोशीतील लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही यशवंतरावांनी दिली.

१९३४ च्या कायदेभंग चळवळीनंतरचे काँग्रेसचे अधिवेशन १९३५ मध्ये मुंबई येथे होणार होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली. काँग्रेसच्या या राष्ट्रीय स्तरावरली पहिल्याच अधिवेशनाला जाण्याची संधी यशवंतरावांना मिळाली. यापूर्वी यशवंतरावांनी मुंबई पाहिली नव्हती. डॉ. राजेंद्र प्रसादांचे मुंबईत झालेले भव्य स्वागत यशवंतरावांना पहावयसा मिळाले. जातीय निवाडा, मुस्लीमांसाठी स्वतंत्र मतदार संघ या दोन प्रमुख मुद्यावर पं. मदनमोहन मालवीय व अन्य नेत्यांची भाषणे यशवंतरावांनी लक्षपूर्वक ऐकली.
यशवंतरावांचे एक मित्र दयार्णव कोपार्डेकर यांच्यामुळे त्यांना सानेगुरूजींची भेट या अधिवेशनादरम्यान लाभली. गुडघे पोटाशी धरून एकटेच एका चटईवर चिंतनात व्यस्त होऊन साने गुरूजी बसले होते. दयार्णिवने यशवंतरावांची ओळख साने गुरूजींना करून दिली. त्यावेळी ते स्मितहास्य करून म्हणाले,

“फार फार छान, दयार्णवचे चांगले मित्र म्हणूनच रहा!”

साने गुरूजींची ही भेट यशवंतरावांच्या चांगलीच स्मरणात राहिली. पुढे साने गुरूजींनी लिहिलेली ‘श्यामची आई’ या कादंबरीचे हस्तलिखित कोल्हापूरला आल्यावर दयार्णव कोपार्डेकरने यशवंतरावांना वाचण्यास दिले. त्यावेळी ही कादंबरी अद्याप प्रकाशित व्हावयाची होती. तोपर्यंत साने गुरूजींचे लेखक म्हणून नाव अद्याप प्रसिद्धीस आले नव्हते. दयार्णव साने गुरूजींच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने आपल्या कादंबरीचे प्रकाशन करण्याची जबाबदारी त्यांनी दयार्णववर सोपविली होती.

एका मोठ्या वहीत स्पष्ट हस्तक्षरांत साने गुरूजींनी ही कादंबरी लिहिली होती. तीन दिवसांत यशवंतरावांनी ही कादंबरी वाचली. मराठी वाङ्मयात आपण नवीन काही वाचतो आहोत, याची जाणीव त्यांना झाली. ‘श्यामची आई’ वाचत असताना त्यांचे डोळे अनेकवेळा पाणावले गेले. या कादंबरीतील साने गुरूजींचे प्रत्येक वाक्य भावनेने ओथबून गेलेले होते. आईच्या अमर प्रेमाची व महानतेची जाणीव यशवंतरावांना यावेळी झाली. भावनावश झालेल्या यशवंतरावांनी दयार्णवला मिठीच मारली. हृदय भरून आले. यशवंतराव दयार्णवला म्हणाले,

“साने गुरूजींसारख्या फार मोठ्या साहित्यिकाचे हस्तलिखित मला वाचायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो. तुझे हे प्रकाशन यशस्व होईल, याची मला खात्री वाटते.”

साने गुरूजींच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीचा अशा रितीने ऋणानुबंध यशवंतरावांशी जोडला गेला.

१९३८ मध्ये बी. ए. ची पदवी घेतल्यानंतर एखादी शिक्षण संस्था काढून राष्ट्रीय वृत्तीचा शिक्षक होणे अगर एखादे वृत्तपत्र सुरू करून संपादक म्हणून काम करणे असा यशवंतरावांचा विचार होता. त्यांच्या काही मित्रांनी सांगितले, “शिक्षक किंवा संपादक होण्यासाठी कायद्याचे ज्ञान काही तुझ्या आडवे येणार नाही. फक्त पदवीधरच राहिलास तर अर्ध्यावर लोंबकळत राहशील.”

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org