लोकनेते यशवंतराव चव्हाण - ३४

“उन्हाळ्यामध्ये जाऊन तिथला चांगला आंबा खाण्याकरिता आणि दौरे करण्याकरिता मी कोकणामध्ये पुष्कळच फे-या मारल्या आहेत. परंतु, पावसाळ्यांत पुराने वेढलेले, पीक वाहून गेलेले कोकण मी अगदी अलिकडेच म्हणजे गेल्याच वर्षी पाहिले आणि त्यावेळी असे लक्षांत आले की, सगळी कर्तबगार माणसे जिल्हा सोडून बाहेर गेली आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या आर्थिक जीवनामध्ये एक प्रकारची अगतीकता निर्माण झाली आहे.”

“समुद्र किना-यावरच्या मच्छीमारीचा धंदा, विचार करण्यासारखा आहे. छोट्या छोट्या ठिकाणी उद्योगधंद्याची वाढ करतां येण्याची शक्यता आहे. मोठ्या उद्योगधंद्यांची वाढसुद्धा करता येण्याची शक्यता आहे. मोठ्या उद्योगधंद्याचा विचार श्री. वर्देंनी मांडला. ते त्यातले तज्ज्ञ आहेत. ते याबाबत विचार करतील. परंतु, छोट्या-छोट्या शहरांत छोट्या उद्योगधंद्यांना लागणारी साधने पुरविण्याची गोष्ट महत्त्वाची आहे, असं मी मानतो.”

ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांनी सांगली येथे सहकारी साखर कारखाना सुरू केला. त्याच्या उद्घाटन समारंभास यशवंतरावांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी सहकारी साखर कारखानदारी व वसंतदादांचे परिश्रम याबाबत यशवंतरावांनी बहुमोल मार्गदर्शन केले. ते म्हणतात,

“गेल्या दोन-तीन वर्षात आमच्या नेहमीच्या कामाच्या धांदलीमध्ये वसंतदादा कोठे दिसत नसत. काही लोक विचारीत होते, वसंतराव राजकारणास कंटाळले आहेत काय? आम्ही त्यांना सांगत होतो, ते राजकारणाच्या नव्या प्रवाहात शिरले आहेत. सभा, संमेलने-मोर्चे, मिरवणुका हा एक राजकारणाचा अविभाज्य भाग होता. आता अशा परिस्थितीत राजकारण राहिले नाही. मोठ्या कड्यावरून उडी घेतांना धबधबा असतो, नदी मात्र धबधब्यातून उडी टाकून जेव्हा जेव्हा जमिनीवर उतरले तेव्हा जमिनीच्या पातळीवर येते. त्याचे अवती-भोवतीची जमीन काळी करीत पुढे जात असते. राजकारण्यांनी धबधब्यासारख्या उड्या घेतल्या. वसंतरावांनी मात्र नदीसारखी जमिनीशी एकरूप होणारी पातळी गाठली. राजकारण देशाचे हित करण्याच्या मार्गाला लागले आहे. त्यामुळे मोर्चे आणि घोषणा ज्यांना करावयाच्या असतील त्यांना बंदी नाही. त्यांच्याकरिता परवानगी आहे. परंतु आज लोककल्याणाचा मार्गा स्विकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करण्याकरिता त्याची जरूरी नाही. कोठेतरी शांतपणाने ठरलेल्या योजनेची अंमलबजावणी कशी करावयाची याचा मार्ग शोधणे गरजेचे आहे. गेली दोन वर्षे अशा अज्ञातवासात वसंतरावदादा होते असे माझे मत आहे. या बुधगावच्या आणि सांगलीच्या माळावरती एक नवीन दुनिया निर्माण करण्याच्या कामात ते गुंतले होते. या नवीन दुनियेचे कुलूप त्यांचे संमतीने मी खोलीत आहे. बरेच दिवस आम्ही या गोष्टींची स्वप्ने पहात होतो की, शेतक-यांचे एक नवीन आर्थिक जीवन तयार केले पाहिजे. मोठ्या-मोठ्या घोषणा आम्ही करीत होतो. परंतु या घोषणांचा अर्थ आता आम्हांला समजू लागला आहे. शेतक-यांचे राज्य आले पाहिजे. हे वाक्य ऐकलं म्हणजे मनाला बरं वाटतं. अंग जरासे शहारून येते. परंतु त्याची जबाबदारी, त्याची अडचण काय? त्यांच्यासाठी काय केले पाहिजे? शेतक-यांच्या या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रातील शेतीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रातील शेतीच्या प्रश्नांची काय स्थिती आहे. मी या सहकारी कारखान्याच्या दृष्टीने हे विचार अवश्य बोलून दाखविले पाहिजेत. कारण मी माझ्या मनातील विचार स्पष्ट करतो. स्वतः माझेसाठी जमलं तर दुस-यासाठी!”

“आमच्या कोयनेच्या आणि कृष्णेच्या काठी माणसे जरा तिखट आहेत. पण त्या पाण्यामध्ये साखर जास्त आहे, असं शास्त्रज्ञांचे मत आहे. आता ही साखर कारखानदारी आम्ही उभी केली. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी प्रथम सुरू केली त्यांना मी धन्यवाद देणार आहे. कोणी खाजगी उद्योजकांनी ही गोष्ट केली म्हणून तर ती आम्हांला कळू शकली. त्यांना तर आपण शाब्बासकी दिलीच पाहिजे. परंतु त्यांच्या हाताला साथ देऊन त्याची जोखीम ही बाकीच्या लोकांनी हाताशी घेतली पाहिजे. दहानी-पाचांनी-शंभरांनी-हजारांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या मालकीची कारखानदारी म्हणजे काय चीज आहे ते महाराष्ट्रात उभे करायचे ठरले तर दहा-पंधरा कारखाने उभे राहिले. त्यातला एक कारखाना सांगलीच्या शिवारामध्ये मला पहावयास मिळतो. एक अतिशय चांगली गोष्ट येथे घडली आहे.”

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org