लोकनेते यशवंतराव चव्हाण - ३२

“जनतेच्या मनात आपल्याविषयी विश्वास उत्पन्न होईल असे काम पोलीस दलाने केले पाहिजे. अडी-अडचणीच्या वेळी जनतेने पोलीस दलाच्या मदतीसाठी धावले पाहिजे असे ऋणानुबंध जनतेशी निर्माण करा. आपण सर्व पोलीस अधिकारी आपल्या हाताखालच्या पोलीस ठाण्यास अकल्पित भेट देऊन तपासणी करता की नाही मला माहित नाही. मला स्वतःला पोलीस ठाण्यात भेट देण्याची इच्छा होते. इन्स्पेक्टर जनरलनी आपल्या भाषणांत म्हटल्याप्रमाणे पोलीस ठाण्याचा अधिकारी हा हॉस्पिटलमधील डॉक्टरसारखा असला पाहिजे. त्यांच्याकडे कोणी तक्रार घेऊन गेला तर डॉक्टरकडे येणा-या रूग्णासारखी त्याची विचारपूस केली पाहिजे. त्याची तक्रार समजून घेण्यास मदत होईल असे प्रश्न विचारले पाहिजेत. मला वाटते असे अजून तरी घडत नाही. हा हेतू साध्य होण्यासाठी कोणते मार्ग व व्यवस्था करावी त्याचा शोध घेतला पाहिजे. पददलित म्हटल्या जाणा-या हरिजनांना आपण सर्व त-हेची मदत दिली पाहिजे. स्वतः वैयक्तिकरितीने तपास करून सत्य शोधून काढा. आपण लोकांत अशी जाणीव निर्माण केली पाहिजे की, चुकीच्या गोष्टी शासनाशिवाय सुटणार नाहीत. आपण लोकशाही जमान्यात रहात आहोत; मतामतांचे अंतर कितीही असो, पण समाजातल्या कुठल्याहि वर्गाला कोणी दहशत दाखविता कामा नेय. हरिजनांना असा विश्वास वाटला पाहिजे की, आपली छळवणूक होणार नाही. मी मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख केला. कारण मला या गोष्टीची बोच अतिशय तीव्रतेने वाटते. अशा प्रसंगी जरूरी वाटेल तेव्हा जिल्ह्याधिका-यांना सांगून सर्व पक्षीय शांतता कमिट्यांची स्थापना करावी.”

पोलीस खात्यातील लाचलुचपतीच्या तक्रारी यशवंतरावजींच्या कानावर ब-याचदा येत असत. यासंदर्भात कडक शब्दात त्यांनी अधिका-यांना सुनावले. याबाबत गर्भित स्वरूपाचा इशार देताना ते म्हणतात,

“मी अशा ठाम निर्णयाला आलो आहे की, जर लाचलुचपत थांबली नाही, निदान तिला पायबंद बसला नाही तर या देशाचे भवितव्य ठीक नाही. आर्थिक क्षेत्रात विकास होणार नाही की, वागणुकीत सुधारणा दिसणार नाही. तुम्ही ही जाणीव स्वतःमध्येच निर्माण करून भागणार नाही, तर तुमच्या हाताखालच्या लोकांमध्येही ही जाणीव निर्माण झाली पाहिजे. हाताखालच्या लोकांना शिक्षा करण्याचे कामी संयम ठेवू शकाल, त्यांना सुधारण्याची संधीहि देऊ शकाल. पण ही संधी एकदाच मिळावी. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाली तर त्याला माफी नाही. लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणा आपल्यामध्ये निर्माण करण्याचा विचार आहे. या प्रतिबंधक उपायांबाबत आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही. कारण प्रामुख्याने आम्ही पोलीस दलावर विसंबून राहिलो म्हणून या लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणेचा संबंध इतर खात्याशी ठेवण्यासंबंधी मी विचार करीत आहे. हा फार महत्त्वाचा प्रश्न असून मी त्यातून खात्रीने मार्ग शोधून काढीन.”

सरकारच्या प्रसिद्धी विभागाच्या संपर्क अधिका-याने आपली जबाबदारी कशारितीने पार पाडली पाहिजे याबाबत मार्गदर्शन करताना यशवंतराव सांगतात,

“प्रसिद्धी ही काही एकमार्गी वाहतुक नाही, ती दुहेरी आहे. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कल्पना घेऊन लोकांच्याकडे गेले पाहिजे, त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे अंतःकरण मोकळे ठेवले पाहिजे. कान उघडे ठेवले पाहिजेत; हे जर आपण करू शकलो नाही तर आपण जी प्रसिद्धी पत्रके किंवा साहित्य काढू ते सर्व निरर्थक होईल म्हणून प्रथमतः आपण लोकांना समजून घेतले पाहिजे. दुर्दैवाने अनेक वेळा मला असं पहावयास मिळते की, प्रसिद्धी अधिकारी आपल्या भोवतालच्या इतर नोकरशाही पद्धतीच्या मार्गानेच जाण्याचा प्रयत्न करतात. मला काही तरूणांची माहिती आहे, ते प्रसिद्धी खात्यात नोकरीस येण्यापूर्वी धाडशी, हुशार होते. चांगले चिकीत्सक होते आणि ते लिहितांना किंवा बोलतांना त्यांचे विचार मोठे परिणामकारक होते. परंतु ते प्रसिद्धी खात्यात नोकरीस लागल्यानंतर दोन-चार वर्षातच सरकारच्या इतर खात्यांतील अधिका-याप्रमाणेच ठोकळेबाज बनले. मला केवळ त्यांना दोष द्यावयाचा नाही. नोकरीच्या पद्धतीतील काही मूलगामी कारणेही या गोष्टीला जबाबदार असतील, म्हणून हे असं कां व कसे घडते, याचे कारण शोधून पहाणे अत्यावश्यक आहे. सातत्याने प्रयत्न करून का होईना याचा आपण शोध घेतला पाहिजे.”

शासनाची ध्येयधोरणे, कामे यांची पुरेपुर माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रसिद्धी विभागाची आहे. याबाबत मार्गदर्शन करताना ते म्हणतात,

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org