लोकनेते यशवंतराव चव्हाण - ३०

लोकसभेतील विरोधी पक्षाच्या नेतृत्वात झालेल्या बदलासंबंधी आपले विचार स्पष्टपणे मांडताना ख्यातनाम राजकीय विश्लेषक वि. ना. देवधर लिहितात, “दिल्लीच्या राजकारणात स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ३० वर्षात प्रभावीपणे गाजलेल्या महाराष्ट्रीय नेत्यांची नावे मी सहज आठवली. हाताची बोटे काही पुरी भरली नाहीत. पहिले नाव आले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे. भारतीय घटनेचे शिल्पकार व पहिल्या राष्ट्रीय सरकारातील कायदामंत्री म्हणून त्यांचे नाव इतिहासात नमूद झाले आहे, त्यांचे समकालीन काकासाहेब गाडगीळ हे ही नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे मंत्री. त्यांच्यापाठोपाठ नाव पुढे येते चिंतामणराव देशमुख आणि त्यानंतर कुणाचे नाव पुढे येत असेल तर ते यशवंतराव चव्हाण यांचे. ही संसदेतील महत्त्वाची मंडळी झाली. संसदेत व त्यातही लोकसभेत विरोधी बाकावर बसून नाव गाजविणारे आणखी एक नेते म्हणजे बॅ. नाथ पै, ह. वि. पाटसकर, र. के. खाडिलकर, अण्णासाहेब शिंदे, मोहन धारिया, विठ्ठलराव गाडगीळ, शिवाजीराव देशमुख आदींनी आपल्या परीने कर्तृत्व गाजविले, पण राष्ट्रीय महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून मी वर उल्लेखिल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काकासाहेब गाडगीळ, चिंतामणराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, बॅ. नाथ पै या महाराष्ट्राच्या सुपत्रांचा उल्लेख करावा लागेल.”

नागपूर दीक्षा मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कोनशिला समारंभप्रसंगी दि. ३० ऑगस्ट १९६१ रोजी भाषण करताना यशवंतराव म्हणतात, “हे दीक्षा मैदान सरकारने दिले ते मेहेरबानी म्हणून दिले असे मी कधीच मानले नाही. महाराष्ट्र राज्याचे ते कर्तव्यच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्या राज्याचे नागरिक होते, याचा महाराष्ट्र राज्याला अभिमान आहे. त्यांचे हे जे येथे स्मारक होत आहे, याबद्दलही महाराष्ट्र राज्याला अभिमान वाटतो.”

१९६६ साली संरक्षणमंत्री असताना स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सैनिकांना व जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात यशवंतराव म्हणतात, “भारतीय सैनिकांनी या देशातील नागरिकांविषयी जशी राष्ट्रीय भावनेने आस्था बाळगली पाहिजे. तसेच नागरिकांनीही सैन्याकडे कौटुंबिक भावनेने पाहिले पाहिजे. रक्त गोठविणा-या हिमालयाच्या थंडीत, उष्णतेने भाजून काढणा-या राजस्थानच्या सीमेवर किंवा आसामच्या किर्र झाडीत आपल्या सीमेचे रक्षण करीत उभा असलेला भारतीय सैनिक आपल्या विशाल कुटुंबाचा घटक आहे, ही भावना भारतीयांनी मनात जागविली पाहिजे. त्यांच्याशी आपले नाते कृत्रिम नाहीतर, कौटुंबिक जिव्हाळ्याचे आहे असे मानले, तरच भारतीय सैनिकांच्या खडतर जीवनात त्याला मोठा आधार वाटेल.”

यशवंतरावांचा आपल्या वाणीवरील ताबा विलक्षण होता. खरे सांगायचे तर ते लोकोत्तर पुरूष होते. मोजके, मृदु, मुद्देसूद बोलण्यात ते अग्रेसर होते. आपले मत ठामपणे मांडताना ते प्रतिपक्षावर वाणीचे जखमी प्रहार करत नव्हते. मुद्याने मुद्दा खोडून, ते वस्तुस्थितीने विरोध हाणून पाडत. प्रांजळपणाने प्रतिपक्षाची सत्यता पटकन मान्य करत.

यशवंतराव चव्हाणसाहेबांबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना वरील शब्दात व्यक्त केल्या. त्यांच्या त्या प्रतिक्रियेतून चव्हाणसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समाजासमोर आले. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे आधारवड असलेले यशवंतराव हे त्यांचे प्रेरणास्थानच होते. त्यांच्या संपर्कात जे जे आलेत त्यांच्या जीवनाचे यशवंतरावांनी सोने केले. ते प्रत्येक वेळी प्रसंगानुरूप विविध विषयावर बोलत. समोर असणारा विषय समजून घेऊन त्या समस्येतू मार्ग दाखवत. कोणाचे उणेदुणे काढणे यशवंतरावांच्या स्वभावातच नव्हते. मोकळ्या मनाने बोलणे, सल्ला देणे, समस्येच्या मूळाशी जाऊन त्यातून मार्ग काढणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायिभाव होता. आपल्या धर्मपत्नी वेणूताईंच्या निधनानंतर अवघ्या वर्षभरातच यशवंतरावांचे निधन झाले. कृष्णा-कोयनेच्या संगमावर कराडला असणारी यशवंतरावांची समाधी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील असंख्य बुजुर्गांना मार्गदर्शक ठरली.

चव्हाणसाहेबांचे राष्ट्र उभारणीत असलेले योगदान विचारात घेऊन त्यांचा पुतळा भारताच्या संसदेच्या आवरात बसविण्यात आला ३ मे १९९४ रोजी पुतळ्याचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तत्कालीन उपराष्ट्रपती के. आर. नारायन, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, लोकशभा सभापती शिवराज पाटील, केंद्रीय गृहमंत्री शंकराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यशवंतरावांचे राष्ट्र उभारणीतील योगदान कथित करताना पी. व्ही नरसिंहराव म्हाणाले,

“आधुनिक भारतातील एक महान संसदपटू व नेते असलेल्या यशवंतरावांचा पुतळा अनावरण करण्याची मला मिळालेली संधी आपणास फार भाग्याची वाटते. यशवंतराव हे एक दूरदृष्टीचे नेते होते. त्याचबरोबर त्यांचे पाय भक्कमपणे वास्तवात रोवलेले होते. तळागाळातील माणसाबद्दलची करूणा त्यांच्याजवळ होती. यशवंतरावांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत महत्त्वाची समजली जाणारी बहुतेक खाती सांभाळली; परंतु यशवंतरावांच्या संरक्षण, गृह व अर्थ या खात्यातील कामगिरीचा विशेष उल्लेख करायला हवा. अत्यंत कठीण अशा काळात यशवंतरावांनी ही तीन खाती सांभाळली. १९६२ मध्ये चीनने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यशवंतरावांनी संरक्षंणखात्याची जबाबदारी सांभाळली. १९६६ ते ७० या काळात त्यांनी गृहमंत्रीपद सांभाळले. या काळात अनेक राज्यांत काँग्रेसत्तर आघाडीची सरकारे सत्तेवर आली होती. एक प्रकारची अनिश्चितता व अस्थिर राजकीय परिस्थिती त्यामुळ निर्माण झाली होती, परंतु ही अस्थैर्याची राजकीय परिस्थिती यशवंतरावांनी कौशल्याने हाताळली. १९७० ते ७४ या अर्थमंत्रीपदाच्या कारकीर्दीत विविध आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम त्यांनी राबविला. या तीन खात्यांमार्फत त्यांनी देशाला नवी दिशा देण्याचे काम केले.”

यशवंतराव चव्हाणसाहेबांच्याबद्दल विविध क्षेत्रातील समाजधुरिणांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रियेतूनच त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची प्रचिती येते. यशवंतरावांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा त्यातून साक्षात्कार होतो. नेता कसा असावा याचा आदर्श नव्या पिढीसमोर त्यातून उभा राहतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org