लोकनेते यशवंतराव चव्हाण - ३

जन्म

महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत अनेक दिग्गज थोर पुरुष होऊन गेले. ज्यांनी देशाला राजकीय, सामाजिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले. स्वातंत्र्य चळवळीत मोठा लढा उभारून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे क्रांतिकारक, नेते यांचा वारसा लाभलेली अशी ही महाराष्ट्र भूमी. सातारा जिल्ह्यामध्ये प्रतीसरकारची स्थापना करुन ब्रिटीश सत्तेला मोठा हादरा देण्याचे काम क्रांतीसिंह नाना पाटलांनी केले. याच सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या आजोळी देवराष्ट्रे येथे १२ मार्च १९१३ रोजी यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर देवराष्ट्रे हे गाव सांगली जिल्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सातवाहनांच्या काळात देवराष्ट्रे हे एक छोटेसे राज्य होते, असे मानले जाते. या गावात अनेक प्राचीन मंदिरे असून दह्यारी, तुपारी, ताकारी, लोणारी, यासारखी स्निग्ध सात्त्विक नावाची गावे आजूबाजूला आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन परिश्रम व लढाऊबाणा या गुणांच्या आधारे देशाच्या 'उपपंतप्रधान' पदापर्यंत मजल मारण्याचे दिव्य काम यशवंतरावांनी केले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, देशप्रेमाने भारावलेले वातावरण, महात्मा गांधी, पंडित नेहरु आदी नेत्यांकडून घेतलेली प्रेरणा या जोरावर यशवंतरावांनी आपल्या जीवनाला आकार दिला. पुढील काळात राजकीय व सरकारी कामानिमित्त यशवंतरावांचा देशांतर्गत व सर्व जगात खूप प्रवास झाला, पण कृष्णाखो-याची त्यांच्या मनातील ओढ मात्र कायमच राहिली. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी तसे नमूद करुन ठेवलेही आहे.

यशवंतराव चव्हाण (वंशवृक्ष) (पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा)

मुळगांव : ढवळेश्वर ( ता. खानापूर, जि. सांगली)
जन्मगाव : देवराष्ट्रे, जि. सांगली ( आजोळी)

बालपण व शिक्षण

यशवंतरावांच्या पूर्वजांचे मूळगांव खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर हे होते. गावातील एका व्यक्तिला सावकराकडून कर्ज हवे होते. या कर्जासाठी चव्हाण कुटुंबातील एक पूर्वज जामीन झाला. कर्जदाराने कर्ज न भागविल्याने सावकाराने जामीनदाराचा जमीन-जुमला ताब्यात घेतला. जमीन गेल्याने निराधार झालेल्या चव्हाण कुटुंबाने ढवळेश्वर सोडले व उदरनिर्वाहासाठी विट्याला येऊन स्थायिक झाले. हा प्रसंग यशवंतरावांच्या पणजोबांच्या अगोदरचा आहे. यशवंतरावांच्या आजोबांना दोन मुलगे. यापैकी थोरले रामचंद्र व धाकटे बळवंतराव. रामचंद्र चार पुस्तके शिकल्यामुळे त्यांना 'बेलिफ' म्हणून सरकारी नोकरी मिळाली. पुढे काही वर्षांनी शेतीवर भागत नसल्याने त्यांनी आपले लहान बंधू म्हणजेच यशवंतरावांचे वडील बळवंतराव यांनाही बेलिफाची नोकरी मिळवून दिली. नोकरीनिमित्त यशवंतरावांच्या वडिलांनी विटे, दहिवडी, कराड या ठिकाणी जावे लागले. यशवंतरावांचा जन्म झाला त्यावेळी वडील कराड येथे नोकरीस होते. त्यांनी कराड येथे बरीच वर्षे नोकरी केल्यामुळे चव्हाण कुटुंब कराडला कायमचेच स्थायिक झाले. महाबळेश्वरमध्ये उगम पावून व कराडच्या उत्तरेकडून वहात येणारी कृष्णा व दक्षिणेकडून वहात येणारी कोयना या दोन बहिणींचा संगम कराड येथे होतो. पुढे त्यांचा एकच प्रवाह बनून तो पूर्वेकडे वहात जातो.

कराडला प्लेगची साथ आल्याने यशवंतरवांच्या वडिलांनी आपल्या पत्नीला व मुलाबाळांना आपल्या सासूरवाडीला 'देवराष्ट्रे' येथे पाठविले. देवराष्ट्रे येथील आजोळच्या लहानशा घरात ही सर्व मंडळी राहू शकणार नाहीत म्हणून यशवंतरावांच्या मामाने गावातीलच महिंदवाड्याच्या शेजारी असणा-या एका वाड्यात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. मामाच्या घरापासून हे घर जवळच असल्याने यशवंतराव व त्यांच्या अन्य दोन भावडांचे दिवसभराचे वास्तव्य मामाच्या घरीच असायचे. यशवंतरावाचे वय त्यावेळी अवघे चार वर्षांचे होते. दुपारच्या वेळी मामाच्या दारासमोर यशवंतराव खेळत असताना त्यांना समोरुन येत असणारे त्यांचे वडील दिसले. वडिलांच्या दर्शनाने सुखावलेल्या यशवंतरावांनी अत्यानंदाने त्यांना मिठी मारली. प्लेगच्या साथीत सापडलेले बळवंतराव आपल्या मुलाला कडेवर घेऊ शकले नाहीत. ते फक्त उद्गारले,
"बाळ, आपण घरी जाऊ या. मला बरं नाही."

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org