लोकनेते यशवंतराव चव्हाण - २५

यशवंतरावांनी सार्वजनिक जीवनात स्वतःच्या चारित्र्याला खूप जपले. आपल्या पदाचा गैरवापर आपल्या कुटुंबियांनाही त्यांनी करू दिला नाही. जे मिळवायचे ते स्वप्रयत्नाने व कष्टपूर्वकच हा त्यांचा दंडक होता. सारा देश त्यांना साहेब म्हणत होता, पण ते साहेबासारखे कधीच वागले नाहीत. केंद्रात संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांचा मुंबईतील सह्याद्री बंगला आठ दिवसांत सोडून आपल्या कुटुंबाची व्यवस्था त्यांनी एका खाजगी ठिकाणी केली. ते वेळेला व वचनाला खूप पक्के होते.

निवृत्त सनदी अधिकारी व माजी खासदार श्रीनिवास पाटील यशवंतरावांच्या आठवणी सांगताना म्हणतात,

“आम्ही यशवंतरावांना काका असे म्हणायचो. वयाच्या चौथ्या वर्षापासून मी त्यांना पहात आलो आहे.” यशवंतराव द्विभाषीक राज्याचे मुख्यमंत्री असताना पुण्यात शिकत असणा-या श्रीनिवास पाटील यांनी सातारा विद्यार्थी संघटना सुरू केली होती. याच्या उद्घाटनास यशवंतराव आले होते. त्यावेळी श्रीनिवास पाटील एस. पी. कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. डेप्युटी कलेक्टरची परीक्षा पास झाल्यानंतर ते पेढे घेऊन यशवंतरावांना भेटण्यास गेले. त्यावेळी यशवंतराव म्हणाले,

“हे पेढे एल. एल. बी. चे की उपजिल्हाधिकारी परीक्षेतील यशाचे श्रीनिवास लक्षात घे, शासकीय सेवेत जाण्यासाठी तुझा होकार असेल तर मी पेढा खाईन.”

श्रीनिवास पाटील यांना प्रशासकीय सेवेत जाण्याचा सल्ला यशवंतरावांनीच दिला. पुढे यशवंतरावांचे मानसपुत्र शरद पवारांच्या सहकार्यातून श्रीनिवास पाटील कराड लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. शरद पवार महाराष्टाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी यशवंतरावांचा पुतळा संसद भवनाच्या प्रवेश द्वारापाशी उभा केला. श्रीनिवास पाटील प्रथम खासदार झाले, त्यावेळे संसदेत प्रवेश करताना यशवंतरावांच्या पुतळ्यासमोर ते नतमस्तक झाले. जुन्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या.

१९५८ – ५९ मध्ये बेळगांव, निपाणी, कारवार सीमा भागात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन उग्र बनले होते. त्यावेळी बेळगांवचे तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख श्री. लुईस यांनी दिलेल्या आदेशाने आंदोलकांवर बेछुट गोळीबार करण्यात आला. नऊ आंदोलकांचा बळी गेला. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ बेळगांवला पाठवून घडलेल्या परिस्थितीची माहिती यशवंतरावांनी घेतली. याचा योग्य तो परिणाम होऊन श्री. लुईस यांची उचलबांगडी होऊन त्यांची रवानगी आसामला करण्यात आली.

यशवंतरावांचे साहित्यप्रेम सर्वश्रूत आहे. दिवसांत किमान ५० पाने वाचल्याशिवाय ते झोपत नसत. मोटार प्रवास व विमान प्रवासात ते आपला वाचनाचा छंद जोपासत. यशवंतरावांनी विकत घेतलेल्या पुस्तकांची निगा राखण्याचे काम वेणूताईंना करावे लागे. सध्याचा विचार करता राजकीय नेते वाचन, साहित्यप्रेम व साहित्यिक, विचारवंतापासून फटकून राहत असल्याचे दिसून येते. विचारवंत, साहित्यिक यापैकी कोणाचे निधन झाल्यास पांढरी वस्त्रे परिधान करून १५-२० मिनिटे सांत्वनासाठी अगर अंत्यदर्शनासाठी जायचे आणि मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा पद्धतीची ठोकळ प्रतिक्रिया व्यक्त करायची या पलिकडे आजच्या राजकारण्यांची फारशी मजल जात नाही. यशवंतरावांचे मात्र साहित्याजगताशी खूपच जवळचे संबंध होते. पु. ल. देशपांडेच्या विनोदी वक्तृत्वार ते पोट धरून हसत. ग. दि. माडगुळकरांच्या गीत रामायणातील काव्ये त्यांना तोंडपाठ होती. ना. धो. महानोर या ख्यातनाम कवीशी त्यांनी आयुष्यभर ऋणानुबंध जपले.

ख्यातनाम कादंबरीकार रणजीत देसाई यांच्या ‘स्वामी’ या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी यशवंतराव केंद्रीय गृहमंत्री होते. ज्यावेळी रणजीत देसाई ‘स्वामी’ची प्रत घेऊन यशवंतरावांच्या निवासस्थानी गेले त्यावेळी यशवंतराव म्हणाले, “माझ्याकडे ‘स्वामी’ची प्रत असून मी ती वाचली आहे. ‘स्वामी’ ला पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मला आनंद झाला आहे. पण, रणजीत तुम्ही एवढ्यावरच थांबू नका. यापेक्षाही अधिक दर्जेदार लेखन करा.” यशवंतरावांनी मोग-यांचा हार रणजीत देसाईंच्या गळ्यात घालून त्यांचे अभिनंदन केले. पुढे रणजीत देसाईंनी ‘श्रीमान योगी’ कादंबरी लिहिली. त्यावेळी मुंबईत स्वतः येऊन यशवंतरावांनी त्यांच्या हातात सोन्याचे कडे घातले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org