लोकनेते यशवंतराव चव्हाण - १०

प्रत्यक्ष गडावर कार्यक्रमप्रसंगी रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते नेहरुंच्या स्वागताचे फलक घेऊन उभे होते, तर दुस-या बाजुला संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यकर्ते नेहरुंच्या निषेधाच्या घोषणा देत उभे होते. घोषणांचा गजर वाढला तेव्हा यशवंतराव सहजपणे फिरत जावे तसे समितीच्या नेत्यांजवळ पोहोचले. काही एक न बोलता त्यांनी आचार्य अत्रेंच्या बुशकोटाचे खुले राहिलेले वरचे बटण लावून दिले. सारा जमाव अवाक् झाला. यशवंराव जसे गेले तसेच परत आपल्या जागी आले. यशवंतरावांच्या स्वभावातील विनम्रता, सहजता व विरोधकांना नकळत आपलेसे करण्याचे त्यांच्यातील कसब या प्रसंगातून सहज दिसून येते. या कौशल्याआधारेच यशवंतरावांनी प्रथम मुंबई मग मराठवाडा, विदर्भ व संपूर्ण महाराष्ट्रच आपलासा करुन घेतला.

विदर्भाला स्वतंत्र राहून नाही तर महाराष्ट्रात समाविष्ट होऊनच विकास साधता येईल अशी भूमिका यशवंतरावांनी घेतली. महाराष्ट्र व विदर्भाची सांस्कृतिक नाळ जुळावी या उद्देशाने फेब्रुवारी १९५८ मध्ये विसावे 'विदर्भ साहित्य संमेलन' संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटन यशवंतरावांच्या हस्ते करण्यात आले. या दरम्यानच 'बेळगाव-कारवार' हा मराठी भाषिक भाग  महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीच्यावतीने चळवळ, आंदोलने सुरु होती. नवी दिल्ली येथेही या मागणीसाठी सत्याग्रह सुरु होता. 'द्विभाषिक राज्याच्या कारभार यापुढे जास्त काळ चालविणे केवळ अशक्य आहे.' असे मत यशवंतरावांनी काँग्रेस श्रेष्ठींना कळविले. यशवंतरावांच्या या भूमिकेमुळे द्विभाषिक मुंबई राज्याच्या पुनर्रचनेसंबंधी विचारविनीमय सुरु झाला. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ९ सदस्यीय समिती काँग्रेस वर्किंग कमिटीकडून नेमण्यात आली. मराठी भाषिकांचे मुंबईसह महाराष्ट्र राज्य व गुजराती भाषिकांचे गुजरात अशी दोन राज्ये निर्माण करण्याचा ठराव नऊ सदस्यीय समितीकडून करण्यात आला. यशवंतरावांनी या ठरावाला दुजोरा दिला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा टप्पा होता.

एप्रिल १९६० मध्ये लोकसभेत एक ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्ये निर्माण करण्यास लोकसभेने मंजुरी दिली. दीर्घकाळ सुरु असलेल्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मूर्त स्वरुप प्राप्त होण्याचा तो एक महत्त्वाचा क्षण होता. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान यशवंतराव चव्हाणांना मिळाला. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी राज्याच्या विकासासंदर्भात अनेक धोरणात्मक निर्ण घेतले. महाराष्ट्र विधिमंडळाचे दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा निर्णय यशवंतराव चव्हाणांनीच घेतला. विदर्भ विकास परिषदेचे उद्घाटन करुन त्यांनी विदर्भाच्या विकासाला गती दिली. प्रशासनाच्या व लोकांच्या सोयीसाठी राज्याचे सहा विभाग पाडण्यात आले. मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ यांच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला.  देशातील पहिले सैनिक स्कूल सातारा येथे स्थापन केले. शिक्षणाची गंगा आदिवासींच्या दारी पोहचविण्यासाठी आश्रमशाळांचीही स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजविण्यातही यशवंतरवांचे योगदान खूपच मोठे राहिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org