यशवंतराव हे एक विचार होते. त्या विचाराचा प्रभाव कमी झालेला दिसतो. ह्याबाबत महाराष्ट्र टाईम्सच्या १-५-२००६ च्या अंकात केलेले विश्लेषण मर्मभेदक आहे. प्रश्नांची ज्यांना जाण आहे वा ज्यांना जाण असून कार्य करण्याची उत्कटता आहे अशा नेतृत्वाची महाराष्ट्रात वाण आहे. सत्ता, भूखंड व इतर पैशांच्या नद्या ह्यावर सर्वांचे जाणीवपूर्वक लक्ष आहे. मुंबईचा पैसा आपल्या मतदारसंघात खर्च करून मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात सर्वच पक्षांचा अंतर्भाव होतो. ह्याबाबत कुमार केतकरांनी एक सिध्दांत मांडला आहे. तो असा की महाराष्ट्रातील राजकारणावर अर्थकारणाचा मोठा प्रभाव आहे. साखर कारखाने, सहकारी बॅंका, महाविद्यालये ह्यांच्यावर लोक अवलंबून असतात. ही साखळी आता तुटू लागली आहे. साखर कारखान्यांची पकड ढिली झाली आहे. ज्या अर्थकारणाच्या पायावर कॉंग्रेसचा डोलारा उभा होता तो पाया ढासळू लागला आहे. १९६३-१९७५ ह्या काळात फक्त वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, तर १९७५-१९८७ ह्या बारा वर्षांच्या काळात ११ वेळा मुख्यमंत्री बदलले गेले. ग्रामीण भागात अस्वस्थता निर्माण झाली व म्हणून सत्ता दोलायमान झाली.
यशवंतराव आणि बाळासाहेब खेर ह्यांना पाहिल्यावर मी मुख्यमंत्री पाहिला असे कौतुकाने लोक उद्गार काढत असत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची एक पुरोगामी, प्रगतिपर, उद्योगशील व जनताभिमुखी शासन ह्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती. यशवंतरावांच्या शिकवणुकीचा व आदर्शांचा प्रभाव कमी झाला. म्हणूनच महाराष्ट्राच्या भविष्याबद्दल चिंता वाटण्यासारखी परिस्थिती आहे असे तज्ज्ञ सांगतात.
ह्या परिस्थितीवर मात करायची असेल तर जनजागृती ही चळवळ झाली पाहिजे. राज्यकर्त्यांना जनतेची भीती वाटली पाहिजे. जनता आपणास क्षमा करणार नाही ही भावना त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे.
People get the government which they deserve ह्या म्हणीच्या संदर्भात मान वर करता आली पाहिजे. महाराष्ट्राला रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, विनोबा, एस.एम.जोशी अशी मोठी परंपरा आहे. ती त्यांनी उगवत्या पिढीकडे सुपूर्द केली आहे. उगवत्या पिढीने हे आव्हान स्वीकारून महाराष्ट्र राज्यात घुसलेल्या दुष्ट प्रवृत्ती हाकलण्याकरता जनजागृतीची चळवळ उभारली पाहिजे. हीच ह्या नेत्यांना श्रध्दांजली आहे. सज्जनांचा पुरस्कार, दांभिकांचा धिक्कार, दीनदुबळ्यांचा कैवार आणि भ्रष्टाचारावर प्रहार अशा तत्वाने स्फुरलेले नेतृत्व महाराष्ट्रात आले पाहिजे.
संदर्भः
१) प्रकाश अकोलकर – यशवंतराव ते विलासराव दीपलक्ष्मी दिवाळी अंक, २००६.
२) महाराष्ट्र टाईम्स – १-५-२००६.
३) पुण्यनगरी – रविवार दि, २४-१२-०६, पृष्ठ ६.
४) कुमार केतकर – महाराष्ट्राचा अर्थ अनर्थ, लोकसत्ता, दि. १७-१०-२००४, पृष्ठ १,३.