आमचे मुख्यमंत्री -५७

ह्या काळात त्यांना प्रिमिअर ऑटोमोबाईल आणि एस.टी. कामगारांच्या संपाला तोंड द्यावे लागले. त्यांनी ते संप मिटविले. कोर्टातील मायलॉर्ड म्हणण्याच्या प्रथेऐवजी सर म्हणण्याची प्रथा पाडली. ज्युडिशियल ऑफिसरांकरता त्यांनी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन केली. त्याबरोबर महाराष्ट्र ॲडव्होकेट वेल्फेअर फंड ॲक्ट (१९८१) केला.

मुख्यमंत्री

श्री. बाबासाहेब हे संयुक्त महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री. ते ह्या पदावर फक्त एकच वर्ष होते (२२-१-१९८२ ते १-२-१९८३). अंतुल्यांना राजीनामा द्यावा लागला व कोणातीही अपेक्षा नसताना ते धूमकेतूसारखे ह्या पदावर येऊन पोहोचले. अर्थात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे नाव वर्षा ऐवजी रायगड ठेवले. विशेष म्हणजे नाटक व संगीत ह्यांची आवड असल्यामुळे त्यांनी सांस्कृतिक खाते आपल्याकडेच ठेवले. ह्याच वेळी ज्या हाजीअली शासकीय वसतिस्थानात ते राहत होते, त्या ठिकाणी एक हॉल बांधून दिला व त्या ठिकाणी कल्याण समितीची स्थापना केली.

एस. टी. बोर्डाची पुनर्रचना करून त्यात त्यांनी महिलेला स्थान दिले. अल्पसंख्यांकांच्या समाजातील लोकांच्या महामंडळावर नेमणुका करण्यात पुढाकार घेतला. दहावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण योजना सुरू केली. त्यांच्या काळात नव्या विधानभवनाच्या उत्तरेस महात्मा फुले यांचा पुतळा उभारला गेला. त्यांनी सावरकर स्मारकाला भरपूर निधी उपलब्ध करून दिला. अमरावती विद्यापीठाची मागणी केली. कोल्हापूर येथे मराठी चित्रसृष्टी निर्मिती, औरंगाबाद येथे न्यायालयाच्या खंडपीठाची सुरुवात व त्याच्या इमारतीची पायाभरणी ही त्यांची इतर कार्ये. गडचिरोली जिल्ह्याची स्थापना करून पहिल्या आदिवासी जिल्ह्याची निर्मिती केली. त्यांनी कल्याण शिवजयंतीची मिरवणूक पुन्हा सुरू केली. स्वातंत्र्यसैनिकांना निवृत्तीवेतनाची सोय केली. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांनी मंत्र्यांचे पगार कमी करून घेतले! लोकसेवा आयोगाची नेमणूक करताना गुण व लायकी ह्याला प्राधान्य दिले साहित्यिक कै. नरहर कुरुंदकरांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य दिले.

ट्रायब्युनलचे सदस्य असताना ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जसा त्यांनी हॉल बांधून दिला, त्याचप्रमाणे नेहरूनगर मतदार संघातून ते निवडून आले. त्या विभागाकरता भुयारी रस्ता करविला. त्यामुळे नेहरूनगर व चुनाभट्टी जोडले गेले. कुर्ल्यास एस.टी. डेपो आणला. त्या ठिकाणी स्वतंत्र रेशनिंग ऑफिसची सोय केली. स्वतंत्र पोलिस स्टेशन उभे केले. ट्रॅफिक सिग्नल बांधून घेतला.