वसंतराव नाईक व कॉंग्रेस
नाईकांनी १९४२ साली कॉंग्रेस सदस्यत्व स्वीकारले. १९५१ साली ते विदर्भ कॉंग्रेस कार्यकारिणीचे सदस्य झाले. विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय कॉंग्रेस व महाराष्ट्र विभागीय कॉंग्रेस ह्यांत अनेक मानाची पदे भूषविली.
वसंतरावांचा १९५२ साली राजकारणात प्रवेश
वसंतराव जुन्या मध्यप्रदेशातील पुसद मतदार संघातून निवडून आले. जुन्या मध्यप्रदेशात श्री. रविशंकर शुक्ल ह्यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल खात्याचे उपमंत्री झाले. १९५६ साली द्विभाषिक महाराष्ट्र झाला. नाईकांना मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात सहकार व कृषीमंत्री म्हणून स्थान मिळाले. त्यावेळी त्यांचा शेतीशी निगडित असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंध आला. ह्याच काळात नद्यांना बांध घालून ओलिताच्या योजनेचा प्रसार त्यांनी केला. १९५७ च्या द्विभाषिकात नाईक शेतकी मंत्री होते. त्यावेळी यशवंतरावजी मुख्यमंत्री होते.
शेती हा नाईक ह्यांचा जिव्हाळ्याचा विषय. शेतक-याविषयी आस्था व ग्रामीण विकासाचा ध्यास ही नाईकांची वैशिष्ट्ये होती. महाराष्ट्रातील शेतक-याकरता शेतीमंत्री म्हणून नाईक ह्यांनी अनेक योजना आखल्या.
१) विहीर खणण्याकरता तकावी कर्जात वाढ.
२) वीज असलेल्या ठिकाणी तकावी कर्जाची उपलब्धता.
३) तलावाच्या दुरुस्तीला उत्तेजन.
४) त्यामुळे जास्त जमीन ओलिताखाली आणण्याची योजना.
५) जमिनीची धूप कमी करण्याकरता बांध-बंदिस्त योजना.
६) शेतीत नव्या नव्या तंत्राचा वापर करण्यास उत्तेजन.
७) संकरित बी-बियाणे वापरण्याकरता उत्तेजन.
वरील योजना प्रमुख होत्या. पाणी अडवा, पाणी जिरवा हे त्यांचे घोषवाक्य होते. शेती हा धंदा असून महाराष्ट्रातील शेतकरी कारखानदार झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती.
सहकारावर त्यांची दृढ श्रध्दा होती. म्हणून सहकारी शेती, सेवा सहकारी सोसायट्या, कृषि-औद्योगिक कारखाने, धान्य साठविण्यास गोदामे, सहकारी क्षेत्रात जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने ह्यांचे ते पुरस्कर्ते होते. आरे कॉलनीचा विकास त्यांच्याच कारकिर्दीत झाला. त्यांचा भूदान चळवळीवर समाज-परिवर्तनाचे साधन व जमिनीची उत्पादनशक्ती वाढविण्याचा पाया म्हणून विश्वास होता. त्यांनी भूदान चळवळीत कृतिशील भाग घेतला होता.