आमचे मुख्यमंत्री -८३

मुख्यमंत्री व त्यांच्या जाती

आपण कितीही धर्मनिरपेक्ष वा जातनिरपेक्ष प्रतिपादन केले तरी राजकारणात एवंच आपल्या कोठल्याच क्षेत्रात स्वजात-परजात ही वैचारिक धारणा अजून मागे पडलेली नाही. जर त्रिभाषिक महाराष्ट्रापासून सुरुवात केली तर अंतुले (मुस्लीम), सुशीलकुमारजी (दलित), बाळासाहेब खेर व मनोहर जोशी (ब्राह्मण) आणि वसंतराव नाईक व सुधाकर नाईक (बंजारा) ह्या बिगर मराठा जातीच्या व्यक्ती मुख्यमंत्री झाल्या. मोरारजी (गुजराथी) व कन्नमवार (तेलगू) हे अन्य भाषिक मुख्यमंत्री झाले. पारशी समाजातून धनजी शा. कूपर हे एकच मुख्यमंत्री झाले. बाकीचे आठजण मराठा जातीतील आहेत. त्यातील शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, व शंकरराव चव्हाण हे मराठवाड्यातील तर बाकीचे पाच पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाबासाहेब भोसले आणि नारायण राणे हे ते पाच.

विभागवार वाटणी

मुख्यमंत्र्यांची विभागवाल वर्गवारी केली तर असे दिसते की ह्या चौदा मुख्यमंत्र्यांपैकी कोकणातले तीन (नारायण राणे, मनोहर जोशी आणि अंतुले), विदर्भातले तीन (वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक आणि कन्नमवार), मराठवाड्यातील तीन (शंकरराव चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर पाटील आणि विलासराव देशमुख) आणि पाच पश्चिम महाराष्ट्रातील आहेत (यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाबासाहेब भोसले आणि सुशीलकुमार शिंदे).

वरील विवेचनावरून असे दिसते की एकूण मुख्यमंत्रिपदाच्या जागेवर मराठ्यांचे वर्चस्व आहे. ह्याचे कारण असे असू शकेल की ते महाराष्ट्रात बहुसंख्य मराठा समाज असून कळीच्या क्षेत्रांत त्यांचे नेतृत्व मान्य झालेले आहे. तिसरे कारण असेही असू शकेल की श्रेष्ठींच्या विचारधारेप्रमाणे महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्रीच टिकू शकेल व त्याला जनादेश मिळणे सोपो जाईल.

विभागवार वर्गवारी पाहिली तर एकाच विभागाचे पूर्ण वर्चस्व आहे असे म्हणता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात कोकण धरले तर एकूण आठ मुख्यमंत्री झाले. ह्याचा अर्थ असा नव्हे की श्रेष्ठींनी जाणीवपूर्वक समतोल वाटणी केलेली आहे. जे श्रेष्ठींच्या जवळ आहेत, जे त्यांच्या म्हणण्यापुढे मान झुकवतील अशांनाच श्रेष्ठींनी नेतृत्व दिलेले आहे आणि ही परंपरा अशीच पुढे चालू राहणार आहे. कारण परस्परांतील हेवेदावे, पक्षादेश, स्वतःच्या बळावर उच्च स्थान मिळविणा-या नेत्यांची वाण. जोपर्यंत वरिष्ठ पदाची नेमणूक श्रेष्ठींच्या कृपाप्रसादावर अवलंबून आहे तोपर्यंत अमुकच जातीतील, अमुक प्रदेशातील मुख्यमंत्री येईल असे सांगता येत नाही. नांदेड ते सोलापूर व सोलापूर ते नांदेड असे बदल श्रेष्ठींच्या मर्जीप्रमाणे सहज होऊ शकतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org