आमचे मुख्यमंत्री -७८

विधिमंडळात प्रवेश

सुशीलकुमारजींची विधिमंडळाची कारकीर्द १९७३ पासून सुरू झाली. कारण १९७२ साली कॉंग्रेसकडून त्यांना तिकीट मिळाले नाही. वकिली चांगली चालत असताना सुध्दा त्यांनी विधिमंडळात जाण्याचे ठरविले. १९७३ साली त्यांना सोलापूर मतदार संघातून तिकीट मिळाले आणि ते प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यावेळी वसंतराव नाईकांचे मंत्रिमंडळ होते. नाईकांनी त्यांना राज्यमंत्री म्हणून नेमले (९ नोव्हेंबर १९७३). जवळजवळ १९७३ पासून आजतागायत ते मंत्री आहेत.

शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री झाले (२०-२-१९७५). त्यावेळी त्यांच्याकडे सहा खाती होती. समाजकल्याण, युवकसेवा, खेळ, सांस्कृतिक कार्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास ही ती खाती. ह्या काळात त्यांनी साहित्यिकांना आणि कलावंतांना खूप मदत केली. गरीब लेखक व कलावंत ह्यांना त्यांनी मानधन सुरू केले. तमाशासारख्या कलेला उत्तेजन देण्याकरता तमाशा उत्सव भरविले. कोल्हापुरात चित्रनगरी स्थापन करण्यात पुढाकार घेतला. इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाच्या त्यांनी अनेक गोष्टी कार्यरत केल्या., हुंडा विरोधी मोहीम.

त्यानंतर आणीबाणी आली. शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळाला जावे लागले. शंकररावांच्या जागी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. वसंतदादांनी शिंद्यांकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण ही खाती सुपूर्द केली. आरोग्यमंत्री असताना त्यानी ग्रामीण लोकांकरता वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जागा वाढविल्या. सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाला भरीव मदत केली. १९७४ साली शासनाने हे महाविद्यालय ताब्यात घेतले. तेथील खाटा आणि कर्मचारी ह्यांची संख्या वाढविली. बाह्यरुग्ण विभाग सुरू केला. १९७६ सालच्या चंद्रभागेच्या पुराच्या वेळी त्यांनी लोकांना खूप मदत केली.

वसंतदादांना काटशह देऊन शरद पवार ह्यांनी लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन केले (१८ जुलै १९७८). शिद्यांनी पवारांशी हातमिळवणी केली. ते पवारांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. त्यांच्याकडे कामगार, पर्यटन ही खाती होती. ह्यावेळी ते आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेला हजर राहिले. कामगारमंत्री असताना त्यांनी आजारी गिरण्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. काही धंद्यांमधील किमान वेतन निश्चित करण्याकरता समित्या नेमल्या, तर सामोपचाराने तंटे सोडविण्याकरता कामगार-मालक संघटनांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. गुणवंत कामगारांना पुरस्कार देण्याचा प्रघात पाडला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org