आमचे मुख्यमंत्री -७२

विलासरावांचे कार्य

विलासरावांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ हा महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न असलेला व ही सर्व आव्हाने पेलणे तसे संसदीय लोकशाही व नोकरशाहीचे प्रभुत्व ह्या वातावरणात कठीणच! परंतु विलासरावांनी अशा अनेक प्रश्नांना तोंड देऊन अनेक प्रश्नांना तोंड देऊन अनेक प्रश्न तडीसही लावले.

सर्वांत महत्वाचा प्रश्न होता तो राज्याच्या कर्जाचा मोठा बोजा. त्याकरता सर्व क्षेत्रांत खर्चाची काटकसर करण्याची गरज होती. विलासरावांनी त्या दिशेने महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले.

महाराष्ट्र ही सत्तेच्या विकेंद्रीकरणाची जननी. त्याच धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची गरज होती. लोकशाहीची विश्वविद्यालये म्हणून जिल्हा परिषदा, ग्राम पंचायती, तालुका पंचायती ह्यांकडे लोक बघत असत. अर्थात ही सर्व स्थाने राजकारणाचे अड्डे झाले असून त्यांत घराणेशाहीने प्रवेश केलेला आहे. तरीपण विलासरावांनी विकासाच्या कळीचे घटक – म्हणजे शिक्षण, आरोग्य, रस्ते, समाजकल्याण हे जिल्हापरिषदांकडे सोपवून त्यांना ह्याकरता पुढाकार घेण्यास उत्तेजन दिले.

श्री. गाडगे महाराज हे ग्राम स्वच्छतेचे शंकराचार्य. गाव स्वच्छ तर मन स्वच्छ ही गाडगे महाराजांची भूमिका. विलासराव गाडगे महाराजांना मानतात. त्यांच्या कार्याचे मूल्य त्यांना कळते. म्हणून त्यांनी ग्राम अभियान व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या कार्याला गती दिली व मोठे साहाय्यही दिले.

संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञान हे आज परवलीचे शब्द आहेत. कै. राजीव गांधी ह्यांनी ह्या क्षेत्रांची वाढ होण्याकरता पुढाकार घेतला होता. विलासरावांनी राजीव गांधी ह्यांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन संगणकीकरण व माहिती तंत्रज्ञानाच्या (आय.टी.) योजनांना उत्तेजन दिले. प्रशासनात संगणकीकरणाचा संदेश दिला. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला उत्तेजन देण्याकरता त्यांनी माहिती तंत्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला चालना व उत्तेजन दिले.

शिक्षकांचा तुटवडा भरून काढण्याकरता त्यांनी शिक्षक सेवा योजनेस प्राधान्य दिले व अंशतः सुशिक्षित बेकारांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.

आज आपल्या देशातील अत्यंत अवघड प्रश्न म्हणजे लोकसंख्येची वाढ. हम दो हमारे दो हा संदेश फक्त शहरी भागातच पोहोचला आहे. ग्रामीण भागातील लोकांत पूर्णतः जागृती करण्यात आपण अजूनही यशस्वी झालेलो नाही. लोकसंख्यावाढीच्या प्रमाणात रोजगारी वाढत नाही व दरडोई वा राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत नाही. म्हणून लोकसंख्येचे नियंत्रण हे आपले राष्ट्रीय धोरण आहे व ते राबविण्याचा विलासरावांचा प्रयत्न आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org