आमचे मुख्यमंत्री -७१

मंत्री

बॅ. भोसल्यांनंतर २-२-१९८३ रोजी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. ह्या मंत्रिमंडळात विलासरावांना राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले. त्यांच्याकडे गृह व सर्वसामान्य प्रशासन ही खाती होती. वसंतदादांना पक्षांतर्गत विरोधामुळे मुख्यमंत्रिपद सोडावे लागले व त्यानंतर शिवाजीराव निलंगेकर पाटील हे मुख्यमंत्री झाले (१९८५). अर्थात राजकारणातही आवडता-नावडता असतो. निलंगेकरांच्या मंत्रिमंडळात विलासरावांना स्थान मिळाले नाही. परंतु मुख्यमंत्रिपद निलंगेकर-पाटलांना लाभले नाही. कारण मुलीच्या मार्कांच्या घोटाळ्यात त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. १२-३-१९८६ रोजी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले.

कॅबिनेट मंत्री

सुदैवाने शंकररावांच्या मंत्रिमंडळात विलासरावांना कॅबिनेट मंत्री होण्याचा मान मिळाला. त्यांच्याकडे अत्यंत महत्वाची खाती होती. महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम व संसदीय कामकाज अशी ती खाती होती. १९८८ साली शंकरराव केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री झाले. त्यावेळी शरद पवार विलासरावांना मंत्रिमंडळात घेतले व त्यांच्याकडे महत्वाची खाती सोपवली. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. कृषि-लाभक्षेत्र विकास, फलोद्यान व पर्यटन विकास ही खाती विलासरावांकडे सोपवली होती. १९९० च्या पवारांच्या मंत्रिमंडळात विलासरावांचा अंतर्भाव होता. त्यावेळीही ते कॅबिनेट मंत्रीच होते. त्यांच्याकडे शिक्षण, तंत्रशिक्षण, पशुसंवर्धन व दुग्धविकास ही खाती होती.

शरद पवारांना १९९१ साली केंद्रीय मंत्रिमंडळात जावे लागले. त्यावेळी नरसिंहराव पंतप्रधान होते. शरद पवारांनी आपली गादी सुधाकररावांकडे सोपविली. नाईकांनी विलासरावांचा मंत्रिमंडळात अंतर्भाव केला व त्यांच्याकडे उद्योग हे खाते सोपवले. सुधाकररावांना मुंबईच्या दंगलीतील असमाधकारक कामगिरीमुळे जावे लागले. शरद पवार हे १९९३ ला पुन्हा मुख्यमंत्री झाले व त्यांनी विलासरावांचा आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला. त्यावेळी त्यांच्याकडे (१९९५ पर्यंत) महसूल खाते होते.

मुख्यमंत्री

दुर्दैवाने कॉंग्रेसला १९९९ सालच्या निवडणुकीत बहुमत मिळाले नाही. विलासरावांची कॉंग्रेस पक्षाचे नेते म्हणून निवड झाली व १८-१०-९९ रोजी मुख्यमंत्री होण्याचे भाग्य त्यांना लाभले. १९६० ते १९९९ ह्या काळात महाराष्ट्रात तेरा मुख्यमंत्री झाले. विलासराव हे तेरावे. त्यावेळी पी.सी.अलेक्झांडर राज्यपाल होते व मुख्यमंत्रिपदावर विलासराव १८-२-२००३ पर्यंत होते. परंतु पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना आपले मुख्यमंत्रिपद सोडावे लागले व त्यांच्या जागी त्यांचे सन्मित्र श्री. सुशीलकुमार शिंदे हे पक्षनेते व मुख्यमंत्री झाले. पण सुशीलकुमार देखील पक्षांतर्गत राजकारणाचे बळी ठरले. त्यांची आंध्रचे राज्यपाल म्हणून निवड झाली व १-११-२००४ रोजी विलासराव हे पुन्हा मुख्यमंत्री झाले ते आजतागायत. महाराष्ट्राचा राज्यकारभार व भवितव्य मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच हातात आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org