आमचे मुख्यमंत्री -६६

महानगरपालिकेतील कारकीर्द

ज्यावेळी मनोहरपंतांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी (१९६६) ते परळला अहमद सेलर चाळीत राहत होते. तेव्हा कॉंग्रेस हा एकमेव प्रभावी पक्ष होता. पण मनोहरपंतांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढ करण्याचे कार्य हाती घेतले. १९६८ साली त्यांनी बहुभाषिक बहुप्रांतीय अशा दादर मतदार संघातून श्रीमती प्रमिला दंडवते यांचा पराभव करून महापालिकेची निवडणूक जिंकली. ते शिवसेना गटाचे महाराष्ट्रातील नेते झाले. ते स्थायी व शिक्षण समितीचे सभासद होते. महापौर झाल्यानंतरही ते आपल्या जुन्या घरातच राहत होते. महानगरपालिकेत मराठीत उत्तरे देण्याची प्रथा त्यांनीच पाडली. महापौर असताना स्वच्छ मुंबई, हरित मुंबई ही घोषणा त्यांनीच दिली. गणेश विसर्जनाच्या वेळी महापौरांनी गणपतीवर पुष्पवृष्टी करण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली. झुणका भाकर केंद्रे स्थापण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे उद्योगनिर्मिती होणार होती. पहिले झुणका भाकर केंद्र सी.एस.टी. स्टेशनसमोर आहे.

विधानसभेतील कारकीर्द

१९७२ साली त्यांची विधानसभेतील कारकीर्द सुरू झाली. त्यावेळी ते महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेवर निवडून आले. ह्याच वेळी शिवसेनेचे पहिले राज्यव्यापी संमेलन सुरू झाले. १९९० साली ते दादर मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते व मनोहरपंत विरोधी पक्षनेते होते. पाणी, दुष्काळ, कापूस उत्पादकांच्या समस्या ह्यांबाबत त्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले.

१९९१ साली शरद पवार संरक्षणमंत्री झाले. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. मुंडे विरोधी पक्ष नेते होते. ह्यावेळी जोशी ह्यांना कै. भाऊराव पाटील ह्यांनी केलेल्या फिर्यादीमुळे सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. जाती व धर्माच्या नावावर मते मिळविली असा जोशांच्या विरुध्द आरोप होता.

मुख्यमंत्री

यानंतर युती सरकार आले. अयोध्येतील तापलेले वातावरण, मंत्र्यांचे जे. जे. रुग्णालयातील कथित आरोपींशी असलेले संबंध ह्यांमुळे कॉंग्रसविरुध्द वातावरण कलुषित झालेले होते. मनोहरपंत युती सरकारचे मुख्यमंत्री झाले. कॉंग्रेसला फक्त ८८ जागा मिळाल्या. परंतु ह्यावेळीही जोशी ह्यांना निवडणुकीबाबत कोर्टकचे-यांना तोंड द्यावे लागले. कारण त्यांनी निवडणुकीत भ्रष्टाचार केला, जातिधर्माच्या नावाखाली मते मिळविली अशी त्यांच्या विरुध्द सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेचा निकाल ११-१२-९६ रोजी लागला. परंतु काही काळ जोशी यांचे वर्णन टेंपररी मुख्यमंत्री किंवा नाईट वॉचमन असे केले जात असे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org