आमचे मुख्यमंत्री -२६

यशवंतराव व कॉंग्रेस

कॉंग्रेस ही त्यांची जननी होती. १९८० नंतर इंदिरा गांधींनी त्यांना आठव्या वित्तआयोगाचे अध्यक्ष नेमले. त्यामुळे जरी यशवंतरावांच्या नेतृत्वाला तात्पुरती उभारी आली तरी त्यांचे तेज मात्र गेले. त्यांतच सौ.वेणुताईंचे १-६-८३ रोजी निधन झाले. ते पूर्णतः सामाजिक व कौटुंबिक दृष्टीने एकाकी झाले. ह्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला. ते आजारी पडले. १९८४ च्या निवडणुकीचा फॉर्म त्यांना भरायचा होता, परंतु २५-११-१९८४ रोजीच महाराष्ट्राच्या ह्या ज्येष्ठ नेत्याचे निधन झाले.

यशवंतरावांना अनेक सन्मान मिळाले होते. पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी दिली होती.

यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व

यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाबद्दल एकाने लिहिले आहे- पहिल्या दर्जाचे सभ्य गृहस्थ, नम्र व सदभिरुचीयुक्त वागणे. समंजस स्वभाव, तडजोडी व वैचारिक देवाणघेवाण ह्यांना प्राधान्य अशी त्यांची वैशिष्ट्ये सांगितली जातात. दिलदार सामाजिक कार्यकर्ता हे त्यांचे स्वभावाचे गौरवपूर्ण अंग होते. जातिभेदाचे ते निष्ठुर टीकाकार होते. त्यांच्या आजूबाजूला मराठेतर व्यक्ती व विचारवंतच जास्त होते.

चांगली पुस्तके खरेदी करणे, ती वाचणे, त्यांच्यावर चर्चा करणे हा त्यांचा छंद होता. त्यांना लेखक होण्याची इच्छा होती, परंतु राजकारणाती धावपणीमुळे त्यांना वेळ झाला नाही. त्यांच्या आत्मचरित्राचा एकच भाग प्रसिध्द झाला. तरी त्यांच्या भाषणांचे चार संग्रह (ह्यांत वेणुताईंना लिहिलेल्या पत्रांचा समावेश होतो) व कृष्णाकाठ हे आत्मचरित्र एवढे लेखन त्यांनी केले.

राजकारणी म्हणून यशवंतरावांची अनेक वैशिष्ट्ये होती. ते ध्येयवादी होते. ते गुरू मानत नसत. त्यांनी सत्तेकरता राजकारण केले नाही. सत्यं, शिवं, सुंदरम् हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यामुळे त्यांना सर्व शास्त्रांत, कलांत रस होता व त्या विषयातील तज्ज्ञांच्या बरोबर त्यांचा वावर होता.

ते संघटनकुशल तर होतेच, पण त्याचबरोबर त्यांना सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण होती. त्यांची नेहरूंवर नितांत निष्ठा होती. चव्हाण ही व्यक्ती नसून एक विचार आहे असे म्हटले जात असे. म्हणूनच देशाचा विकास हा नेहरूंच्या आशीर्वादाशिवाय होणार नाही ह्या गाढ श्रध्देतूनच त्यांनी महाराष्ट्राचे द्विभाषिक राज्य चालवले. त्यांचा पक्षभेद व फूट ह्यांवर विश्वास नव्हता. म्हणूनच त्यांनी आयाराम गयाराम हा शब्दप्रयोग प्रचलित केला!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org